RSS

” तादात्म्य ” – भावार्थ

31 जुलै

तादात्म्य

हलकाच दे सहारा,
जोरात असा अट्टहास नको
वेगळाच रे शहारा,
वेडात असा लपंडाव नको

हे विधात्या, तुझा नित्य सहारा हवाय आम्हाला.. पण तो तो अगदी हलकासा असला तरी चालेल.. आमचा आयुष्य-झुला थांबून न रहाता त्याला हलकासा वारा लागला अन गती मिळाली तरी चालेल.. अगदी जोरात झोका घ्यावा असाही हट्ट नाही आमचा… तुझ्या आमच्या आयुष्यात असण्यातच एक वेगळा असा शहरा आहे.. अन तो शहारा, ते वेडं हे फक्त अनुभवता येते.. पण त्यात असा विचित्र लपंडाव नकोसा झालाय आता.. सुख काही क्षणांवर समोर दिसतंय, पण अजूनही गवसत नाहीये.. त्या सुखाशी आता डोळ्यावर पट्टी बांधून खेळलेली आंधळी कोशिंबीर नाही सहन होत..

सांडलाच जो फुलोरा,
रानात असा गर्भपात नको
सुकलाच तो डोलारा,
फुलांत असा भेदभाव नको

तुझ्या कृपेने रानात फुलांचा सडा पडतो.. अन मनात विचारांचा.. पण त्या विचारांच्या फुलोर्‍यात मूक कळ्यांचा गर्भपात करु नकोस.. अजून वास्तवाचे दर्शनही न झालेल्या (प्रत्यक्षात न अवतरलेल्या) कल्पनांचा गर्भपात नको करुस… अन आज ना उद्या त्या कळ्यांच्या नशिबी सुकणे आहेच, पण आजतरी त्यांच्यात भेदभाव करु नकोस.. सगळ्याच विचारांना उमलु दे.. सगळ्या कळ्यांना एकच न्याय मिळु दे..

मोहरला हा किनारा,
दारात असा पारिजात नको
लाडकाच हा पसारा,
श्वासांत असा पक्षपात नको

फक्त किनाराच मोहरुन जाईल असा पारिजात मला नको.. केवळ बाह्य इंद्रियांना मोहरुन टाकतील अशा कल्पना असे विचार नकोत मला… माझे मनही सुगंधित करुन जाईल असा वृक्ष अंतरंगात फुलु दे.. बहरु दे…
हा तूच सजवलेला, तूच साकारलेला पसारा तुझा लाडकाच आहे.. हे विचारही तूच दिलेली देणगी.. अन त्या विचारांचे, कल्पनांचे प्रत्यक्षात अवतरणे हेच माझे श्वास, माझे जगण्याचे बळ.. तेव्हा, त्या ‘श्वासात’ असा पक्षपात करु नकोस..

टाकलाच तो उतारा,
व्यथांत असा बेबनाव नको
उघडाच तो पेटारा,
उगाच असा मोलभाव नको

एखाद्या समस्येवर उतारा टाकणारच असशील तर मग त्यामुळे व्यथांमधे बेबनाव नको होऊ देऊस.. माझ्यासाठी कुठलीच व्यथा लहान नाही अन कुठलीच मोठी नाही.. ह्या सार्‍या व्यथांनीच जपलेय आजवर मला.. त्यांच्यामुळेच मला तुझ्याकडे येता आलेय.. त्या व्यथाही मला तेवढ्याच जवळच्या आहेत..
माझ्या आयुष्याचा पेटारा आता उघडाच तर आहे तुझ्यासमोर.. उगीच त्यातल्या जुन्या व्यथा, अनुभव, कल्पनांना किंमतीचे लेबल लावण्यात काय अर्थ?? कदाचित त्या किंमती अपुर्‍या वाटतील किंवा अनाठायी, अवास्तव पण वाटतील.. त्यापेक्षा नकोच ते तसले काही.. तो आहे तसाच उघडा पेटारा राहू दे तुझ्यासमोर.. जसा भूतकाळ तुझ्यासमोर खुला केला आहे तसं वर्तमानातही जगता येईल… म्हणजे इथून पुढे माझी प्रत्येक कृती तुझ्यासमोर खुल्या दिलाने ठेवता येईल.. तुझ्या साक्षीनेच करता येईल.. काहीही लपलेले नाही राहणार त्यात…

गावलाच तो मनोरा,
ऐन्यात असा पाठलाग नको
देहबुद्धीचा तो बंधारा,
पुरात असा दुजाभाव नको

आता कल्पनेत दिसलेला, पाहिलेला ‘सुखाचा’ मनोरा खरेच सापडला तर आरशात दिसणार्‍या प्रतिबिंबासारखा त्याचा पाठलाग नको करायला लावूस… ते प्रतिबिंब कितीही धरायला गेले तरी काही अंतर उरतेच मधे.. आता आरश्यातल्या प्रतिबिंबाप्रमाणे तो सुखाचा मनोरा नको देऊस.. तर खराखुरा समोर दिसु दे.. मधे हा काळाचा आरसासुद्धा नको..
आता हा देहबुद्धीचा बंधाराही तुझ्या कृपेच्या पुरात वाहून जाऊ दे.. त्या कृपेच्या पुरात कसलाही दुजाभाव ठेऊ नकोस.. सगळ्याच अडथळ्यांसह, मायेच्या बंधांसह माझी देहबुद्धीही वाहून जाऊ दे.. अन तुझ्याशी एकरुपता येऊ दे… तुझ्या कृपेच्या पुरात मलाही सामावून जाऊ दे.. ‘तू अन मी’ हा दुजाभावच संपू दे…

 

टॅग्स:

One response to “” तादात्म्य ” – भावार्थ

 1. वैभव

  ऑगस्ट 11, 2009 at 06:59

  अतिशय सुंदर विश्लेषण केलंय….
  खरंतर तुम्हा दोघांचे मनापासून आभार 🙂
  धन्यवाद

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: