RSS

गुरुपौर्णिमा – एक स्मरणांजली

01 ऑगस्ट

आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा..

ह्यदिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी, अनेक घटना अन अनेक पूजनीय व्यक्तींचे स्मरण होते..

आयुष्याच्या अनेक वळणांवर प्रवास सुरु असताना कधी अचानक एखादी व्यक्ती मोलाचा सल्ला देऊन जाते, तर कधी वाचलेली एखादी ओळ, एखादे वचन मार्ग दाखवून जाते.. कधी लहान मुलाकडून निघालेले एखादे बोबडे बोल काही नवे सुचवून जातात, तर कधी आज्जीचा सल्ला हवाहवासा वाटतो..

लहानपणी आईकडून को-या पाटीवर काढलेला श्रीगणेशा आठवतो, तर कधी वडिलांनी काढून दिलेली सरस्वतीची प्रतिमा आठवते.. आजोबांनी शिकवलेली स्तोत्रंही अचानक कुठल्याशा निवांत वेळी स्मरुन जातात..

लहानपणी शिकलेली रामरक्षा, मारुतीस्तोत्र, अथर्वशीर्ष…. अगदी साधेच आठवायचं तर शुभंकरोति….. कधी रोज सकाळ संध्याकाळ ही स्तोत्रं कानावर पडतात म्हणून सहज पाठ झालेली तर कधी आईने देवासमोर बसवून पाठ करुन घेतलेली..

तेव्हा कधी त्यांचे महत्व नाही लक्षात यायचे.. वय अन अक्कल दोन्हीने लहान ना.. पण आता हरेक प्रसंगात जाणवते ह्या स्तोत्रांचे बळ.. त्यांचे आपल्या आयुष्यातले महत्व… त्या शब्दांचे सामर्थ्य….

मग हळुहळू शाळा, कॉलेज.. हे टप्पे आयुष्यात येतात, अन मग गुरु म्हणजे काय ह्याचा अजून एक पैलु उलगडत जातो.. कधी गैरहजर राहिले तर मायेने चौकशी करणारे शिक्षक नजरेसमोर येतात.. तर कधी आपल्या क्षुल्लक चुकीमुळे एखादा मार्क कमी पडला म्हणून हलकेच दटावून जाणारे शिक्षक आठवतात…

कॉलेजमधून बाहेर निघालो की ख-या अर्थाने जगणं सुरु होते.. तोपर्यंत होत असते ती उबदार सावलीतील रोपट्याची वाढ.. उन्हाचे चटके सहसा न जाणवलेली..

पण त्या उबदार सावलीतून बाहेरही जायचे असते, बाहेरचे जग स्वतः अनुभवायचे असते.. कुठल्याही खांद्यांशिवाय झेप घ्यायची असते.. कुणाच्याही सल्ल्याशिवाय अनेक निर्णय घेण्याची खुमखुमी असते… अन अशाच वळणांवर अनेक जुन्या नव्या गोष्टी, घटना आपल्या गुरु होतात.. कधी एखादी चूक नवा आयुष्यभराचा अनुभव देऊन जाते, तर कधी स्वतःच्या हिमतीने पूर्ण केलेला प्रोजेक्ट नवी हिम्मत देऊन जातो…

ह्या टप्प्यावर कधी कधी नकळत अशा व्यक्ती भेटतात ज्या आपले अवघे आयुष्यच बदलवून जातात.. कधी त्यांचे सामाजिक काम भारुन जाते, तर कधी त्यांच्या भाषणाने प्रभावित व्हायला होते.. कधी कुणाचे पुस्तक आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते..

 
तर कधी आपल्याही नकळत कुणाचे केवळ व्यक्तिमत्वच आपल्या जहाजाला दिशा देऊन जाते… अन मग ते जहाज कितीही वारा आला तरी डगमगत नाही.. कुठल्याही लाटेने फेकले जात नाही.. आयुष्याच्या समुद्रात तसेच तग धरुन उभे तर रहातेच पण त्यातूनही पुढे वाटचाल करुन अंतिम ध्येय गाठते..

जेव्हा यशाचे शिखर सर होते तेव्हा अशा घटना नेहमीच आठवतात असे नाही.. कितीतरी खांदे आपल्या यशाच्या निर्मितीसाठी राबलेले असतात.. त्यांची जाणीव होतेच असे नाही.. पण अपयशाच्या वेळी किंवा संकटांच्या वेळी अशा व्यक्तींचे सल्ले, अशा व्यक्तींचे आचरण हमखास आठवते.. त्या स्तोत्रातली एखादी ओळ बळ देऊन जाते.. पुस्तकातले एखादे वाक्य एक नवी उभारी देते… अन त्यातूनच पुन्हा यशाकडे, ध्येयाकडे नव्या जोमाने वाटचाल सुरु होते..

 
दुःखाचे प्रसंग आपल्या दीर्घकाळ स्मरणात रहातात, पण त्या प्रसंगातून सहज सोडवणारे अनेक अनामिक हात नाही आठवत नंतर.. त्या जगन्नियंत्याने आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला सोडवणारी माणसं नाही आठवत.. एवढेच काय पण आपण आपल्या नित्यकर्मात एवढे अडकून जातो की खुद्द त्या परमेश्वराचेही कालांतराने विस्मरणच होते… पण अशाच वेळी ह्या सर्वांच्या अस्तित्वाची जाणीव कायम जपली गेली पाहिजे.. आपल्या आयुष्याचा सेतू उभारण्यात ते दगड पेलणारे जसे लक्षात राहिले पाहिजेत तसेच, त्यात खारीचा वाटा उचलणारेही आठवले पाहिजे.. अन त्या सेतूसाठी लागणारे साहित्य पुरवणारा, चार हात मदतीला देणारा, अन योग्य ती निर्मिती घडवणारा, त्या निर्मितीची जाणीव देणारा सद्गुरु तर नित्य स्मरणात असावा… त्याच्या कृपेशिवाय ह्यापैकी एकही गोष्ट केवळ अशक्य…
 
ह्या सगळ्यात ज्याचे नेहमी विस्मरण होते, तो म्हणजे निसर्ग.. ह्याच्याकडून तर आपण शिकावे तेवढे कमी.. सजीव चरांपासून ते निर्जीव धरेपर्यंत प्रत्येक घटक आपला गुरुच… आपल्यातला हरेक सद्गुण निसर्गाकडून घेता येतो, जोपासता येतो..
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा गुरुंचे, सद्गुरुंचे स्मरण होणंही तेवढेच आवश्यक..
( ७ जुलै २००९)
 

3 responses to “गुरुपौर्णिमा – एक स्मरणांजली

 1. rajendra bhandari

  जुलै 22, 2010 at 09:18

  Medha tai, tumacha lekh vachala, atishay sunder lihila aahe.tumhala tumachya pudhil ujwal yashasathi khup khup
  SHUBHECCHHA.

   
 2. utkarsha

  जुलै 25, 2010 at 14:19

  khup chan ahe.

   
 3. aruna deepak kambli

  जुलै 16, 2013 at 07:36

  वाचताना मन भरुन आले

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: