RSS

अर्जुन विषाद १

03 ऑगस्ट

अर्जुन उवाच –
 
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥ (भगवद्गीता अध्याय पहिला)
 
भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात हे श्लोक येतात.. सगळे स्वजन युद्धात आपल्या विरुद्ध लढण्यासाठी उभे ठाकले आहेत हे पाहून अर्जुनाची झालेली स्थिती वर्णन करणारे हे श्लोक आहेत..
 
ह्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे सारे त्राण संपल्यासारखी स्थिती आहे, तोंडाला कोरड पडलीये, अंगावर रोमटे उभे राहिलेत, शरीर कंप पावतेय, अन मुख्य शस्त्र असलेले गांडीव धनुष्य हातातून गळून खाली पडलेय… मन भ्रमिष्ट झालेय…
 
भितीमुळे आहे का ही स्थिती, तर अजिबात नाही.. ज्याने खुद्द शंकराला हरवले त्या पराक्रमी शूराला कसली भिती.. साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्याचे सारथ्य करताहेत, शक्ती-गती-भक्तीचे प्रतिक असलेला हनुमान ज्याच्या रथावर आहे त्याला भिती वाटेल का कधी…
 
मग केवळ मोहामुळे ही स्थिती.. आश्चर्य वाटते ना.. अन हे सगळे वाचताना मनाची अवस्था विलक्षण होते.. युद्ध काय अचानक सुरु झाले का? की अर्जुनाला युद्ध सुरु होणार हे माहीतच नव्हते? की आपण कुणाविरुद्ध लढतोय हे अज्ञात होते?
 
प्रत्यक्ष रणांगणावर दोन्ही सैन्यांच्या मधोमध कृष्णाने रथ नेऊन उभा केला तेव्हा प्रतिस्पर्धी हे स्वजन असल्याचा साक्षत्कार झाला का? असे एक ना अनेक प्रश्न मनात उभे राहतात.. अन मग दुसरीकडे त्या अर्जुनाला असेही विचारावेसे वाटते की हे जर तुझे स्वजन आहेत तर जिच्यावर भरसभेत अन्याय झाला ती द्रौपदी तुझी कुणीच नाही का?
 
एकीकडे असेही वाटते की एवढा पराक्रमी वीर, पण मोहाने ग्रासला गेला.. हा मोह म्हणजे तरी काय.. तर एखाद्या नात्यातले अंध प्रेम.. एखाद्या व्यक्तीवरची अंध माया.. अन स्वजन शब्दाची स्वतःपुरती करुन घेतलेली चुकीची व्याख्या… ह्या अन अशा अनेक गोष्टींच्या स्वरुपाबद्दलचे खोटे ज्ञान किंवा व्यर्थ समज म्हणजे मोह…
 
महाभारतातल्या अर्जुनाला काही काळ बाजुला ठेऊया.. अन आपल्यात असलेल्या अर्जुनाला जरा बाहेर काढून पाहुया.. काय सत्य बाहेर येते ते..
 
आपल्यात अर्जुन?? कसे शक्य आहे ना.. प्रत्येकाचे उत्तर असेच येईल की आमच्यात नाहीये अर्जुन.. आम्ही अर्जुनाच्या जागी असतो तर आम्ही नसतो असे गळून गेलो.. पण एकदा एकटे असताना खरेच हा प्रश्न स्वतःला विचारुन पहावा की माझ्यात हा असा अर्जुन अजिबात नाहीये????
 
मग हळुहळु एक एक प्रसंग समोर आणून पहावा.. कसे वागलो आपण त्यावेळी.. कृष्णासारखे की अर्जुनासारखे??
 
समाजहितासाठी जे जे काही करणे आवश्यक असेल ते ते करावे, निष्काम भावनेने करावे हा उपदेश देणारी भगवद्गीता आमच्याजवळ नित्य असते.. महाभारतात अर्जुनाला भगवंताने दिलेले उपदेशस्वरुपी ज्ञान.. त्याला ते रणांगणावर मिळाले.. पण आपल्याला तर लढाईची सुरुवात होण्याआधीच मिळालेय.. पण खरेच ते समजून घेऊन त्याचा वापर करतो का कधी?
 
समाजहित.. पण समाज म्हणजे काय.. केवळ बाहेर जो मला दिसतो तोच समाज का? की समाज माझ्या घरातूनच सुरु होतो.. दैनंदिन आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींशी माझा संबंध येतो त्या सगळ्या समाजाचाच भाग..
 
अन अशा समाजात आपण कधीच अर्जुनासारखे वागलेलो नसतो का? योग्य अन अयोग्य, न्याय्य अन अन्याय्य अशा दोन्हीचा निर्णय देणारा भगवद उपदेश आपल्यासोबत आहे.. तो जाणीवरुप भगवंत नित्य आपल्यातच आहे.. पण तरी न्यायाची लढाई लढताना आपण कितीतरीवेळा अर्जुन होतो.. झालोय…
 
आपणही एखाद्या व्यक्तीबद्दलच्या मायेपोटी, नात्यापोटी अर्जुनाच्या भूमिकेत शिरलेले असतो.. हरकत काहीच नसते, जोपर्यंत ह्या मोहामुळे अन्य कुणाला काही त्रास होत नसेल.. पण जर आपल्या ह्या भूमिकेचा कुणालाही कळत वा नकळत त्रास होऊ लागला तर.. मग आपल्यातल्या ह्या अर्जुनाचीही धर्मयुद्धासाठी तयारी व्हायलाच हवी.. नव्हे, आपण करुन घ्यायला हवी…
 
आपणही एखाद्या व्यक्तीबद्दलच्या मायेपोटी, नात्यापोटी अर्जुनाच्या भूमिकेत शिरलेले असतो.. हरकत काहीच नसते, जोपर्यंत ह्या मोहामुळे अन्य कुणाला काही त्रास होत नसेल.. पण जर त्या व्यक्तीमुळे कुणालाही कळत वा नकळत त्रास होऊ लागला तर.. मग आपल्यातल्या ह्या अर्जुनाचीही धर्मयुद्धासाठी तयारी व्हायलाच हवी.. नव्हे, आपण करुन घ्यायलाच हवी…
 
ह्या युगात धर्मयुद्धासाठी गांडीव वा तत्सम शस्त्रांची गरज नक्कीच नाहीये.. मग ह्या युगात आपली शस्त्रास्त्रे कुठली?? प्रत्येकाला ह्याचे उत्तर स्वतःच शोधावे लागते.. कारण प्रत्येकाला स्वतःची बलस्थाने अन कमकुवत भाग व्यवस्थित माहीत असतात.. प्रत्येक जण गदा नाही पेलु शकत किंवा धनुष्यविशारद नाही असु शकत.. पण आपल्याजवळ एकतरी शस्त्र असतेच.. आपण ओळखायला तरी विसरतो किंवा वापरायला तरी विसरतो.. किंवा आपल्यातला मोह, आपल्याला ते विसरायला भाग पाडतो..
 
आठवा असेही प्रसंग, ज्यात आपण ‘स्वजन’ ह्या शब्दाच्या भ्रामक कल्पनेला बळी पडलो आहोत.. आपले स्वजन कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर खरेच सापडलेय का आपल्याला?? जे आपल्याला आपल्याच योग्य निर्णयापासून परावृत्त करत असतात त्यांना स्वजन म्हणता येते का? जे केवळ नात्याने आपल्याशी जोडलेले असतात, पण अन्य कुणावर तरी अन्याय करत असतात ते स्वजन?? अर्जुनही तर ह्याच मोहात सापडला होता ना.. अन त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी भगवंतांना गीतेतून उपदेश करावा लागला..
 
आपल्याला अर्जुनाच्या स्थितीवर बोलायचा काय अधिकार उरतो.. गीतेचा उपदेश त्याला मोहाच्या अंधःकारात सापडल्यावर मिळाला होता.. पण आपली अवस्था अर्जुनापेक्षा भिन्न हवी ना.. आपल्याजवळ भगवंताचा उपदेश आहे.. मोहाला ओळखण्याचे साधन आहे.. अन दूर करण्याचे उपायही आहेत…
 
धर्मयुद्ध म्हणजे फक्त रणांगणावर होणारी दोन सैन्यातली लढाई नव्हे.. तर आयुष्याच्या रणांगणात प्रत्येक निर्णय नीतीमत्तेला धरुन घेताना करावा लागणारा संघर्ष हेही धर्मयुद्धच… अन नेमक्या अशाच निर्णय घेण्याच्या क्षणी हा मोह आपल्यासमोर उभा ठाकतो.. अन आपल्याला शस्त्र खाली टाकायला भाग पाडतो..
 
कितीतरी प्रसंग आपल्यासमोर घडत असतात.. पण आपल्या नजरेसमोर असलेला मोहाचा पडदा आपल्याला सत्यापर्यंत जाण्यापासून परावृत्त करत असतो.. अन हा मोहच वारंवार जिंकत राहतो… अन पराभव स्वीकारताना आपणच स्वतःला समर्थनं देण्याची सवय लावत जातो.. आपल्याही आयुष्यात काही व्यक्ती पूजनीय असतात, वंदनीय असतात.. पण त्यापलिकडे जाऊन आपण त्यांना देवत्व बहाल करु पाहतो.. हेही विसरुन जातो की त्या व्यक्ती पण मर्त्य मानवच.. त्यांच्यातही मानवी विकार असणारच.. अन त्या विकारांमुळे त्यांच्याकडूनही चुका होणार.. पण इथेच तो मोह त्याचे काम करत असतो.. हे असे विचार करण्यापासून आपल्याला रोखतो.. अन मग अर्जुनासारखी आपली गत होते.. भीष्म अन द्रोणांसारख्या वंदनीय स्वजनांशी लढण्याची इच्छा नष्ट होऊन मन विषादाने भरुन जाते.. मूळ उद्देश विसरला जातो.. स्व-कर्तव्य मागे पडते…
ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु |
 

टॅग्स:

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: