RSS

समर्पण भाव (अर्जुन विषाद – २)

03 ऑगस्ट

ज्ञान भक्ती कर्म हे मार्ग वरवर पाहता भिन्न वाटतात.. पण नीट विचार केल्यास असे आढळते की, ज्ञानयोग हा मार्ग बुद्धीसाठी, भक्तीयोग हा मार्ग मनासाठी अन कर्मयोग हा मार्ग देहासाठी आहे.. प्रत्येक मार्ग अनुसरताना अन्य दोन सोबत असतातच… आपण आधी ज्या भूमिकेत प्राधान्याने असतो त्याला अनुसरुन आपल्याला एखाद्या मार्गाने सुरुवात कराविशी वाटते.. म्हणजे आपल्यमधे जर बुद्धी प्रधन असेल किंवा आपण बुद्धीला प्रमाण मानून वागत असु तर आपल्याला ज्ञानयोग अधिक जवळचा वाटतो.. आपला कल आपल्या मनाकडे अधिक असेल, आपण जास्त भावनिक असु तर विनायास आपण भक्तियोगाकडे झुकतो.. अन आपण आपल्या कामात अधिक गुंतत असु, तर आपण कर्मयोगाकडे वळतो… संतांचे जीवन आपण नीट पाहिले तर असेच आढळते की त्यांना तीनही योग सहज साध्य झाले होते.. किंवा त्यांनी ते करुन घेतले होते अन म्हणूनच ते संतपदाला पोचले… पण हे सारे काही समर्पण भावनेतून झाले पाहिजे.. नाहीतर अहंकार जागा व्हायला वेळ लागत नाही…

सर्वसमर्पण भाव हा प्रत्येक मर्गाचा मूळ गाभा आहे.. समर्पण भाव नसेल तर ह्यापैकी कुठल्याही मार्गावर आपण वाटचाल करत असलो तरी भरकटलेले असतो.. दिशाहीन असतो.. अंधरात चाचपडत असतो..

समर्पण भावाचा अभाव ज्ञानमार्गात असेल तर स्व-बुद्धीविषयी अहंकार उत्पन्न होतो.. हा अभाव कर्ममार्गात असेल तर आपली कर्मे निष्काम न राहता सकाम होतात, अन त्यातून स्व-कर्तृत्वाचा, स्व-अस्तित्वाचा अहंकार उत्पन्न होतो.. अन भक्तीमार्गात समर्पण नाही करता आले तर मन अधिकाधिक हट्टी होत जाते.. अन जे मला हवे तेच अन त्याचवेळी झाले पाहिजे इकडे कल होतो..
समर्पण भाव सुद्धा २ प्रकारचा असु शकतो.. एक अज्ञानातून आलेला.. अन एक निरपेक्ष भावनेतून आलेला.. आपण जेव्हा अडचणीत असतो, कुठल्यातरी विचित्र संकटात सापडलेले असतो, निर्णयहीन स्थितीत असतो तेव्हा आपण अज्ञानी भूमिकेत असतो.. अन अशावेळी केवळ स्वतःपाशी उत्तरे नसते म्हणून अन्य कुणालातरी शरण जावे ह्या भावनेने परमेश्वराला शरण गेलेलो असतो.. कारण अशावेळी आपण परमेश्वराबद्दल आपली जी मतं असतात त्या चष्म्यातून त्याला शोधायला जात असतो.. सर्वशक्तीमान असा परमेश्वर.. ही आपली भूमिका.. अन जो सर्वशक्तीमान आहे तोच माझे संकट निवारण करु शकेल ह्या भावनेने आपण ईश्वराला शरण जातो.. इथेही समर्पण असतेच, पण ते अज्ञानातून केलेले असल्याने तात्कालिकच असते.. संकटाचे निवारण झाले की आपली समर्पण भावना पुन्हा ओसरत जाते…

 कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥ (भगवद्गीता. अ. २ रा)

(अर्थ -करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥ – अर्जुन)

आपली पण स्थिती अशावेळी काहीशी अशीच असते, नाही का… आपणही जेव्हा दैन्याने, शोकाने त्रासलेले असतो तेव्हाच त्या प्रभुला शरण जातो.. अन अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी योग्य अयोग्याचा निर्णयही त्याच्याजवळ मागतो.. संकट वा दैन्य निवारणाचा उपायही त्याच्याकडून लगेच हवा असतो आपल्याला….

प्रश्न असा पडतो की, ह्यापूर्वी काय अर्जुनाने एकही निर्णय घेतला नव्हता का? त्याच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाहीये का? त्याने घेतलेला एखादा निर्णय चुकीचा ठरून त्याला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागले होते का? तर ह्यापैकी कुठल्याच प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येत नाही.. मग ह्याच युद्धाच्यावेळी ही अवस्था का आली? त्याला स्वतःला सारे काही माहीत असूनही निर्णय का घेता नाही आला??

पण इथे नेमके काय वेगळे झाले त्याचे उत्तरही पुढच्याच श्लोकात मिळते,

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ ।
अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥

 (अर्थ -कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥)

मोहामयी अंधारातून उत्पन्न झालेला शोक.. अन ह्यामुळे हे धर्माला अनुसरुन असलेले युद्ध करणे ह्या क्षत्रियधर्माचाच त्याला विसर पडला… अन जेव्हा स्व-धर्माचा आपल्याला विसर पडतो तेव्हा निर्णय घेण्यास आपण असमर्थ ठरतो… अन मग आपल्याहून बलवान, समार्थ्यवान अशा व्यक्तीला आपण शरण जातो.. हे अज्ञानातून झालेले समर्पण असते… कारण इथे अजूनही अर्जुनाला भगवंताच्या ख-या स्वरुपाचे ज्ञान झालेले नाही… पण स्वतः निर्णय घेताना हतबल झाल्याने तो शरण गेला..
मोह कसा अन कशाचा होता हे ह्या आधी स्पष्ट झाले आहे.. अन ‘मी’ कर्ता ह्या चुकीच्या भूमिकेत शिरुन विचार केल्याने झालेला शोक.. हीच ‘मी कर्ता’ भूमिका आपणही जगत असतोच.. ‘मी केले’, ‘मी ठरवले’, मी विचार केला’, ‘मी निर्णय घेतला अन सार्थ ठरवून दाखवला’.. अनेक प्रसंगी आपल्याही नकळत हा ‘मी’ एक एक पडदा आपल्यासमोर उभा करत असतो.. अन आपल्यालाही त्या पडद्यामागे रहायला आवडते.. पण तेव्हाच आवडते, जेव्हा आपली कृती योग्य ठरलेली असते.. आपला निर्णय योग्य ठरलेला असतो.. किंवा आपल्या कृतीमुळे आपल्याला सुख मिळालेले असते…

पण जर आपल्या निर्णयामुळे काही वाईट, विपरित घडले असेल तर?? किंवा भलतेच काही, अनपेक्षित असे घडले असेल तर?? किंवा आपण सुरु केलेले एखादे कार्य आपली इच्छा असतानाही बंद पडले असेल किंवा चुकीच्या दिशेने जात असेल तर??? आपण घेतो का त्याची जबाबदारी?? स्वीकारतो का त्यातले आपले ‘कर्तेपण’? स्वीकारतो का घेतलेल्या निर्णयाचे अधिकारत्व??

कधी अशावेळी स्वतःला असे प्रश्न विचारुन पाहतो का की, जर हे सगळे मीच करत असेन तर मग प्रत्येक गोष्टच माझ्या इच्छेनुसार घडतेय असे का दिसत नाही?? कधी कधी एखाद्याचे मरण थांबवून त्याला जीवन का देऊ शकत नाही?? एखाद्याचे नुकसान का थांबवू शकत नाही?? प्रत्येक जीवाला सुखी का करु शकत नाही किंवा दुस-याचे दुःख वा संकट स्वतःवर का घेऊ शकत नाही??

जेव्हा आपण कर्तेपणा स्वतःकडे घेतो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटनेची जबाबदारीही आपली असते.. प्रत्येक भल्या-बु-याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर असते… पण काही प्रसंग असे येतातच ना जे आपल्याला पूर्ण हतबल करुन जातात… अन अशावेळी अचानक एखादी व्यक्ती तीच समस्या सहज सोडवून जाते… अन मग जाणवते, की कर्ते आपण नाही… करणारे आपण असतो तर, प्रत्येक समस्येला आपल्याकडे उत्तर तयार असते, ती व्यक्ती स्वतःहून आली नसती तर आपण शोधून काढली असती.. आपण स्वतः त्या योग्य व्यक्तीला शोधून उत्तर मिळवले असते… पण ह्यातले काहीही झाले नाही किंवा आपल्याला करता आलेले नाही…

हे असे निरुत्तर करणारे प्रश्न आपण नेहमी स्मरणात ठेवले असते तर हा ‘मी’ एवढा व्यापून गेला नसता.. हा ‘मी’ चा पडदा, अहंकाराचा पडदा कधीच गळाला असता किंवा आपल्याला हा ‘मी’ डोके वर काढता क्षणीच जाणवला असता…

ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु |

 

टॅग्स:

2 responses to “समर्पण भाव (अर्जुन विषाद – २)

 1. nileshsakpal

  ऑगस्ट 3, 2009 at 16:29

  उत्कृष्ठ लिहीले आहे मेधा… यातील सर्वसमर्पण भाव अन त्यामागील विश्लेषण अगदी अचुक जमले आहे.. सुक्ष्मातील हा अहंकार आपल्या ज्ञानमार्गातील वा भक्तीमार्गातील खुप मोठा अडथळा असतो… तो जाणवणे अन तो अशा शब्दात विषद करणे हे दोन्ही तू मस्त साधले आहेस… या लिखाणातील लय मनाला घट्ट बांधुन ठेवते व ते संपुर्ण वाचण्यासाठी उद्युक्त करते… कुठेतरी स्वतःचा अन स्वतःबरोबर घडलेल्या कितीतरी घटनांचा नकळत आढावा यामुळे घेता आला…

   
 2. SNN

  ऑगस्ट 5, 2009 at 04:57

  Priy Medha

  Writing through original thinking i.e. Chintan. Everybody is interpreting Geeta in his own original thinking way. Your analysis is fine. Some doubts :
  What is Karm-Svatantrya then? If everything, every karm is done and designed by destiny, then there is no independence.
  In such case how to apply Karm-Vipak siddhant?
  Wherefrom Prarabdha gets generated? Wherefrom the Sanchit gets nullified? How to surrender fully when every common man is not Dnyani? How he will get habituated to total surrender? How the saints and sacred Sadhus nullify the sanchit and uplift you on the right track?
  everybody is not in a position to see God like Parth. Then how he will understand whether his surrender is pure or impure?

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: