RSS

एका लहान मुलीच्या आत्मचरित्रातील काही प्रसंग…

04 ऑगस्ट

martha 

“Ma, He Sold Me For a Few Cigarettes”
By Martha Long
 
अंगावर काटा आणणारे एकापेक्षा एक भयंकर प्रसंग, जे वाचत असतानाही डोळ्यातले पाणी कधी पापण्यांची मर्यादा सोडून बाहेर वाहू लागते हेही कळत नाही, त्याला जी मुलगी प्रत्यक्ष सामोरी गेली आहे, तीही वयाच्या ६व्या ७ व्या वर्षी, तिने एवढे तटस्थपणे लिहावे !! कुठली ताकद असेल ही, कुठून येते हे बळ, सारे सोसूनही कुणालाच दोष नाही, दैवाचा उद्धार नाही, तर स्वतःवरच्या क्षमतेवरील विश्वासाचे नेहमी असलेले भान हेच प्रत्येक प्रसंगात गवसत जाते, प्रेरणा देत जाते.

आयुष्यात न मिळालेल्या कितीतरी गोष्टींचा हिशोब मांडण्यातच आपले अर्धेअधिक जगणे खर्ची पडत असते. कधीतरी आपले जेवण ३-४ तास उशीरा झाले असेल किंवा काही कामामुळे उपास घडला असेल असा दिवस आठवून बघावा, पोटात भूकेचा डोंब उसळलेला असतो, अन पावले स्वयंपाकघराची (घराबाहेर असतो तेव्हा हॉटेलकडे) वळतात.

अशावेळी ३ दिवस उपास घडलेली लहान मुलगी हातात मिळालेली कष्टाची कमाई स्वतःच्या आईला नेऊन देते. त्याच आईला जिने स्वतःला आधार मिळावा, वेळप्रसंगी शारीरिक भूक भागवी ह्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या पुरुषांची सोबत स्वीकारलेली असते; त्या पुरुषांच्या भावना जपताना, त्यांच्याकडून मिळणारा मार चुकवण्यासाठी कितीतरी वेळा ह्या पोटच्या लेकीची प्रसंगी उपासमारही केलेली असते. अशा आईबद्दलही कुठलाच राग, कसलाच दुराग्रह मनात न ठेवता हातत आलेली कमाई केवळ तिच्या चेह-यावर फुलणारे हसु पाहण्यासाठी ही लहानगी आईच्या स्वाधीन करते. कुठून येतो हा एवढा समजूतदारपणा, केवळ परिस्थितीने आलेलं शहाणपण की अंगात उपजत असलेली परिपक्वता.

असाच एक काळजाला भोके पाडणारा प्रसंग, (आणि त्या प्रसंगात त्या मुलीच्या मनात आलेले विचार)ह्यानंतर त्याच दिवशी ती शिक्षिका सगळ्या विद्यार्थ्यांना दुस-या दिवशी शाळेत येताना विणकामासाठी सहा पेनीज आणायला सांगते. ह्याच दिवशी मार्थाच्या घरातील कोळसा, दूध, ब्रेड सारे काही संपलेलं असते. आणि बाप सिगारेटसाठी कासावीस झालेला असतो. तो मार्थाला व तिच्या चवथ्यांदा गरोदर राहिलेल्या आईला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवतो. प्रीस्टकडून पैसे मागून आणायचे अन त्या पैशात हे सगळे सामान घेऊन जायचे असे ठरते.

पहिला प्रीस्ट जेवढे पैसे देतो त्यातून दूध, ब्रेड, कोळसा एवढे सामान खरेदी होते. पण घरी सिगारेटशिवाय गेलो तर बाप जीवही घेईल ह्या भितीने मार्था अजून एका प्रीस्टकडे जाऊन थोडे पैसे घेते. सिगारेट्ससाठी पुरेसे असतात तेवढे पैसे. पण तिच्याजवळ शाळेत नेण्यासाठी काहीच शिल्लक रहात नाहीत.

 दुस-या दिवशी शाळेत गेल्यावर ती शिक्षिका विचारते कुणी कुणी पैसे आणले नाहीत ते. मार्थाजवळ अर्थातच पैसे नसतात. शिक्षिका तिला त्याचे कारण विचारते, तर “आईने पैसे दिले नाहीत” हेच खरे असलेले कारण मार्था आधी सांगते. पण आईजवळ पैसे का नव्हते किंवा तिने का दिले नाहीत हे मात्र सांगत नाही. मात्र शिक्षिकेला हे कारण खोटे वाटते, ती मार्थाला दरडावून विचारते, सगळ्या वर्गासमोर पुन्हा पुन्हा खरे कारण काय आहे असे विचारत रहाते. तिच्या मानेला धरुन गोल गोल फिरवून रागने तिला धमकावत रहाते.

शेवटी आदल्या दिवशी मिळालेल्या माराची आठवण होऊन मार्था भितीने तिला सांगते की, “मीच आईला विचारले नाही, मी विसरले.” मग पुन्हा, “तू माझ्याशी आधी खोटे बोललीस” असे म्हणत ती शिक्षिका पुन्हा मार्थाला त्या वेताच्या छडीने सपासप मारायला सुरुवात करते. तिच्या दोन्ही हातांवर छडीचे वळ उठतात. पण शिक्षिकेने सांगितलेलं असते की, “हात मागे केलास तर प्रत्येकवेळी ६ फटके वाढत जातील.” त्यामुळे ती सारे सहन करत रहाते.

पण त्याच वेळी तिच्या मनात मात्र असे विचार चालु असतात,

पुढचा संपूर्ण आठवडा ही लहानगी मार्था शाळेत न जाता लोकांना सामान आणून देऊन, त्यांची इतर कामे करुन सहा पेनीज जमवते अन दुस-या दिवशी शिक्षिकेला नेऊन देते व आईने दिले असे सांगते [मार्थाच्या मनात असा विचार येतो की, if I told her tha (that), I would be ashamed of meself (myself), cos then they would all know their mammies are better than my mammy. Cos all the mammies are poor, but still manage to give their children (children) the sixpence, an (and) mine can’t.].

  तेव्हा हे पैसे तिला तिच्या आईने देणे शक्यच नाही, कारण जर ते द्यायचेच असते तर ह्यपूर्वीच दिले असते, असे म्हणून ती शिक्षिका मार्थावर चोरी केल्याचा आरोप करते. त्या चिमुरडीच्या दोन्ही हातांवर वेताच्या छडीचे सपासप मारलेले फटके हीच तिच्यासाठी योग्य शिक्षा आहे असेच त्या निर्दयी शिक्षिकेला वाटते.

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना पण त्या छोटीच्या मनात मात्र

ह्या प्रसंगानंतर एक वेगळेच प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभे राहते. आता जॅक्सर काय म्हणेल? कारण आपल्याजवळ एवढे पैसे होते आणि तरीही त्याला काहीही न पत्ता लागु न देता शाळेत शिक्षिकेला आणून दिले हे जर त्याला कळले तर तो आपल्याला मारुन टाकायलाही कमी करणार नाही ही भिती. सिगारेटसाठी त्याचे वेडं असणे तिला पुरते माहित होते. कुठल्या परिस्थितीतून गेली असेल ही चिमुरडी. नुसते वाचताना अंगावर काटा येतो, मग हे सारे त्या कोवळ्या वयात भोगताना तिचे काय झाले असेल….

 हातावर वेताची छडी ओढली जात असतानाही हात अजिबात मागे न घेता सारे सहन करणं, बापाची भिती सतत असतानाही मनात अतिशय संयत विचार असणं, हे सारेच विलक्षण. मनोधैर्य याहून काही वेगळं नसावे. वयाच्या ६-७ व्या वर्षी कुठून येते हे बळ? ही सोसण्याची जिद्द? हे अचाट मनोधैर्य? ही निव्वळ परिस्थितीने आलेली समज तर नक्कीच नाही. हे मनोधैर्य अंगभूत असतेच, पण परिस्थितीला शरण न जाता ते सिद्ध करायची वेळ असते तेव्हाच माघार न घेता ठाम उभे राहणे ज्यांना जमते तेच भविष्यात काहीतरी करुन दाखवतात, मोठ्या पदाला पोचतात.

तिचे सावत्र वडील जॅक्सर, ज्यांना सिगारेट्सचे अतोनात व्यसन. त्यासाठी ते मार्थाला वा तिच्या लहान भावाला मारायलाही कमी करत नाहीत. ते तिला एका शाळेत घालतात जिथे ते पूर्वी स्वतः शिकलेले असतात. त्या शाळेतला मार्थाच्या आयुष्यातला हा प्रसंग,

पहिल्याच दिवशी तिथली एक शिक्षिका विद्यर्थ्यांना काही वाक्य लिहायला सांगते. मार्थाचे आधीचे शिक्षण सलग व पुरेसे झालेले नसल्याने तिला ती वाक्य नाही लिहिता येत. ह्यासाठी ती शिक्षिका तिचा भर वर्गात सगळ्यांच्या समोर अपमान करते, तिला छडीने मारते. पण हा अपमान त्या मार्थाच्या मनात कुठेच रागचे रुप धारण करत नाही. ती हा अपमानही सहन करते. जे काही घडलेय त्यात वेगळं काहीच घडले नाहीये असे वाटून सगळ निमूटपणे केलेला स्वीकार जास्त जाणवतो इथे.

एका लहान मुलीचे आत्मकथन अशा स्वरुपात हे पुस्तक आहे. अतिशय सहज सोप्पी भाषाशैली पण थेट काळजाला हात घालणारे अगणित प्रसंग. म्हणजे सहज, साधे, अगदी नेहमीच्या बोलण्यातले शब्दही कसे जिवंत होतात, त्यातल्या भावना कशा बोलक्या होऊ लागतात हे अनुभवायचे असेल तर हे पुस्तक प्रत्येकानेच वाचावे. स्वतःबद्दल लिहिताना कुठेही अवास्तव कारुण्य नाही, सहानुभूती मिळावी ही अपेक्षा नाही, अजिबात आक्रस्ताळेपणा नाही, स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतेय असा कुठलाही अनाठायी आव नाही. जे जसे झालेय ते तसेच मांडण्याचा निव्वळ प्रामाणिक प्रयत्न. आणि म्हणूनच त्या सांगण्यातली हीच निरागसता अधिक भावते.

 

2 responses to “एका लहान मुलीच्या आत्मचरित्रातील काही प्रसंग…

 1. महेंद्र

  ऑगस्ट 5, 2009 at 08:37

  खुपंच सुंदर.. अगदी रिव्ह्यु वाचतांना शहारे आले अगावर. ( खरं तर काटा आला लिहायचं होतं ) नक्कीच वाचतो हे पुस्तक या रविवारी.. इथे शेअर केल्याबद्दल आभार..

   
 2. D.D.Patil, sangli 9689886624

  जुलै 12, 2011 at 15:51

  khup sunder rudhaysparshi review aahe. mazangraji khup changla nahi. pustakacha anuwad zalay ka? nasala tari wachavach lagel pustak kuthe milel. i am in sangli. pl sanga.
  ddpatil2000@gmail.com

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: