RSS

समर्पण भाव (अर्जुन विषाद – ३)

06 ऑगस्ट

(अर्जुन विषाद २ मधे प्रतिक्रिया आली होती.. त्या अनुषंगाने व समर्पण भाव ह्याबद्दल जे सुचले ते ह्या भागात पोस्ट करतेय..)

 बुद्धीचे सात्विक, राजसी अन तामसी असे ३ प्रकार भगवंतांनी अठराव्या अध्यायात सांगितले आहेत…

 कर्माचे स्वातंत्र्य आपल्याला आहे असे जी बुद्धी मानते ती राजसी बुद्धी.. कारण त्यात कर्तेपणा स्वतःकडे घेतला आहे.. अन हा अहंकार रजोगुणी असतो.. कर्म हे आपोआप घडत असते असे समजणारी बुद्धी ही तामसी.. कारण कर्म, कर्माचा हेतू अन फल ह्याबद्दल ही बुद्धी अनभिज्ञ असते… त्यमुळे अज्ञानातून ही तमोगुण प्रधान बुद्धी असे मानून बसते की हे सगळे आपोआप होतेय..

 धर्म अन अधर्म ह्यातला फरक राजसी बुद्धीला करता येत नाही.. अहंकाराने युक्त अशी बुद्धी असल्यास धर्म काय अन अधर्म काय ह्याचा निश्चय नाही करता येत… तसेच रजोगुण हा चंचल असल्यानेही निर्णय घेताना त्यात स्थिरत्व नसते…

 कर्म, कर्म हेतू, फल ह्याबाबत अनभिज्ञ असल्याने तामसी बुद्धी धर्माला अधर्म ठरवून बसते तर अधर्माला धर्म मानून निर्णय घेते…

 ह्यासाठी बुद्धीची सात्विकता महत्वाची.. सत्व गुण प्रभावी झाला म्हणजे हा अहंकार आपोआप नष्ट होतो.. सत्वगुणाचे छानसे उदाहरण म्हणजे निरागस, निष्पाप असे लहान मूल.. अगदी काही महिन्यांचे बाळ आई किंवा बाबा समोर दिसले तरी झेपावते.. कसलाही विचार न करता… कुणी आपल्याला धरेल का हाही विचार न करता… निव्वळ विश्वासाने घेतलेली निरागस झेप असते ती… असेच तर असते ना लहान बाळ.. सारेकाही मात्यापित्यांवर सोपवून देणारे.. अगदी निश्चिंत… अन विश्वासाने ते सांगतील ते ऐकणारे.. किती निष्पाप हसू असते त्या निरागस चेह-यावर… आपण जेव्हा त्याच भूमिकेत ईश्वरासमोर जाऊ शकु तेव्हा तीच सात्विकता आपल्यातही नक्की येते… हीच सात्विकता संतांमधेही आढळते… सर्वच संतांच्या भक्तीत हाच निरागस, निष्पाप भाव, हेच प्रेम ईश्वराबद्दल दिसते…

 आपल्यातला हा अहंकार आपल्यला अनाठायी मोठा करत जातो.. अन त्या परमेश्वरापासून दूर करत नेतो.. ह्या ब्रह्मांडाच्या पसा-यात आपले अस्तित्वच किती?? आपण कुठून सारे काही योजणार? कुठून योग्य ती मणसे शोधणार?? आपल्या नियत कार्यासाठी जे काही आवश्यक आहे ती स्थिती, ती माणसं कुणीतरी योजत असते म्हणून आपल्या अवतीभवती राहू शकतात… अन त्यांना प्रेरणा देणारे तत्वही तेच जे आपल्यात आहे..

 कधी अचानक आपली कुणाशीतरी गाठ पडते, एखादी समस्या सुटून जाते.. किंवा ती व्यक्ती विशिष्ट कालावधीपुरतीच आपल्या सोबत असते अन नंतर कितीही प्रयत्न केले तरी सापडत नाही.. त्या व्यक्तीची पुन्हा कधीच भेट होत नाही.. ती नेमकी त्याचवेळी का भेटली, त्या आधी का नाही भेटली, त्यानंतर कुठे गेली ह्यासारखे अनेक अनुत्तरीत प्रश्न आपल्या मनात राहतात… हा अनुभव प्रत्येकालाच कधी ना कधी नक्कीच येतो… अन अशाच कितीतरी प्रसंगातून जाणवून जाते.. कर्ता ‘मी’ नाही…

कर्माचे स्वातंत्र्य आपल्याला असते का?

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥

(भगवद्गीता अ. ३)

अर्थ – तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. (नियत – नेमून दिलेले.. )

भगवंतांनी गीतेच्या अठराव्या अध्यायात ह्याचे उत्तर दिले आहे.. कर्माचे स्वातंत्र्य आपल्याला असते असे मानणे ही अज्ञानातली अवस्था किंवा रजोगुणी अवस्था…

 यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ १८-५९ ॥
(भगवद्गीता अ. १८)

 अर्थ – तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही, असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील.

 ह्या श्लोकातून यथार्थपणे स्पष्ट होते की आपली इच्छा जरी नसली तरी नियत कार्य आपल्या हातून होणारच आहे.. आपल्या स्वभावाला अनुसरुन जे कार्य आपल्याला आखून दिलेले आहे ते निश्चितच आपल्याला करणे भाग आहे.. किंबहुना आपल्याकडून ते करवले जाणार आहे…

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्‌ ॥ १८-६० ॥
(भगवद्गीता अ. १८)

 अर्थ -हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील.

 फक्त आपल्यातील मोहामुळे आपण ते कर्म करण्याचे प्रारंभी नाकारतो.. पण नियती ते आपल्याकडून करुन घेते.. कारण पूर्वजन्मातील कर्मांचे /  कर्मफलांचे सोबत आलेले गाठोडे अन स्वभाव यामुळे आपण त्याच्याशी बद्ध झालेले असतो..

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥
(भगवद्गीता अ. १८)

 अर्थ – हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

ईश्वराला बाह्य जगात शोधण्याची वेगळी गरज नाही.. कारण तो प्रत्येकाच्यातच आहे / आपल्याही हृदयात तो आहेच.. त्याच्या अस्तित्वाची प्रचिती प्रत्येक प्रसंगात येत असते.. पण मोहाने व्याप्त झाल्याने आपण ही गोष्ट विसरुन जातो किंवा स्वतःशीच नाकारत राहतो.. काहीतरी चमत्कार किंवा साक्षात्कार होईल अन मग देव दिसेल ह्या कल्पनेत आपल्याला येणा-या प्रचितीकडे दुर्लक्ष करत राहतो…  अनेक सुखाचे, समाधानाचे क्षण तोच तर देतो ना, दुःखातून बाहेर काढताना समोरुन आलेला एक मदतीचा हातही त्यानेच धाडलेला असतो ना….

समर्पण हे दोन प्रकारचे असते हे मागच्या भागात आलेच आहे.. मोह अन परिणामी झालेल्या शोकामुळे युद्धापासून परावृत्त व्हावे अशी इच्छा मनात आलेला अर्जुन अज्ञानातून परमेश्वराला शरण जातो, तेही मला ह्या संकटातून सोडव एवढ्याच अपेक्षेने… मी निर्णय घेण्यास असमर्थ आहे म्हणून तू मला बाहेर काढ ह्या भावनेने…

पण जेव्हा विश्वरुप दर्शन झाले, सर्व योग मार्ग समजून घेतले, मन – बुद्धी – अहंकार ह्याची नीट ओळख झाली, त्रिगुणांचे स्वरुप कळले अन आत्मज्ञान मिळाले तेव्हाही पुन्हा शरणागत अवस्थाच आली.. पण हे समर्पण ज्ञानातून.. परमात्म्याची खूण पटल्याने.. ‘स्व’ची ओळख झाल्याने…

अर्जुन उवाच
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ १८-७३ ॥
(भगवद्गीता अ. १८)

अर्थ – अर्जुन म्हणाला, हे अच्युता (अर्थात श्रीकृष्णा), आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.

जेव्हा हा मोह नाहीसा झाला तेव्हा स्व-रुपाचे स्मरण झाले. संदेह फिटला… अन ख-या अर्थाने सर्वसमर्पण भाव अंतरी आला…

ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु |

 

टॅग्स:

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: