RSS

कर्मयोग १ (अर्जुन विषाद – ४)

07 ऑगस्ट

समर्पण हे २ प्रकारे होते हे मागच्या भागात आलेच आहे.. जेव्हा निरपेक्ष, निर्हेतूक भावनेतून समर्पण झाले असेल अन ते अज्ञानातून जरी झाले असेल तरी ज्ञान प्राप्त होतेच…
 
आपण एक साधे उदाहरण बघुया, कधीतरी एखाद्या नवीन ठिकाणी आपण जायचे असते.. महत्वाच्या कामासाठी वेळेत पोचायचे असते.. रस्ता आपल्या माहीत नसतो.. अशावेळी एखाद्या रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसाला किंवा दुकानदाराला आपण रस्ता /  पत्ता विचारतो.. तो आपल्याला पुढचा रस्ता / पत्ता सांगतो, कुठून कसे जायचे, कुठे वळायचे वगैरे… आपणही त्याच्यावर विश्वास ठेऊन पुढे जातो…
 
ह्या प्रसंगात आपल्या मनात कुठलीच शंका का येत नाही? त्या माणसाला आपण ह्यापूर्वी कधीच पाहिलेले नसते, आपली त्याच्याशी काही ओळख नसते.. तरी आपण त्या क्षणी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकतो… इथे आपल्या मनात हा विश्वास का येतो?? कुठून येतो? आपली बुद्धी एवढ्या सहज सारे ऐकायला कशी तयार होते??
 
उत्तर एकच, आपण अडलेले असतो.. गरजवंत असतो.. आपल्याजवळ दुसरा मार्ग नसतो.. मग अशावेळी जर आपली बुद्धी त्या माणसाचे सांगणे सहज मान्य करायला तयार होते तर ती इतर वेळेला का आडमुठेपणा करते?? परमेश्वाराला शरण जाताना का हट्टी बनते?? की आपल्यातल्या अहंकाराला त्यवेळी प्रबळ होतो?? की आपण खरे ‘गरजवंत’ नसतो?? परमेश्वराला शरण जाण्याची खरी ओढ आपल्याला ‘जाणवत’ नाही.. ती आपली ‘गरज’ होत नाही??
 
ज्याने आपल्याला ह्या जगात आणले, एका मार्गावर आजवर सुखरुप कायम नेले त्यावर आपण विश्वास का ठेऊ शकत नाही?? आजवर झालेल्या ह्या सुखरुप प्रवासाबद्दल आपण कधी त्याचे आभार मानतो का? प्रत्येक पाऊल व्यवस्थित पडावे म्हणून ज्याने सतत आतून ‘जाणीव’ दिली त्यालाच विसरुन जातो अन म्हणू लागतो की हा ‘माझा प्रवास’ होता.. ह्या प्रवासात त्याची साथ नसती तर काय झाले असते, एकदा स्वतःशीच विचार करुन बघावा प्रत्येकाने…
 
एकदा रस्ता चुकला तर सैरभैर होणारे आपण, आयुष्यात एवढ्या टप्प्यांना पार करत होतो ते कशाच्या आधारावर??
 
आता कर्मयोगात समर्पण भाव कसा असतो ते पाहुया..
कर्मयोग सांगताना भगवंतांनी सांगितले आहेच, कर्म हे हेतू (कारण) अन फल ह्या दृष्टीने निरपेक्ष असायला हवे..
 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
(भगवद्गीता अ. २)
 
 अर्थ – तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
 
हा टप्पा खुप कठीण वाटतो ना.. हेतू अन फल दोन्ही बाबत निरपेक्ष रहायचे.. हे कसे जमणार? किंवा हे कसे जमवायचे? प्रत्येक कामात, ते का करतोय अन त्यातून काय निष्पन्न होईल हाच विचार करायची सवय असते आम्हाला..
 
ही सवय ‘मी’ कर्म करतो ह्या भावनेमुळे जडते.. एक साधा विचार, आपण एखाद्या नातलगाकडे रहायला गेलो अन एखाद्या दिवशी घर झाडायचे कम केले तर लगेच आपल्यात अशी भावना येते का की, ‘मी झाडले म्हणून हे घर स्वच्छ झाले’? आपण तर त्या घरात फक्त १-२ दिवस असतो.. अन त्यातही एकदाच ते घर आपल्याला झाडावे लागलेले असते.. मग आपण झाडण्यापूर्वी ते घर अस्वच्छ होते का? अन आपण तिथून गेल्यावर ते घर पुन्हा खराब होणार आहे का?? तर नाही.. आपण रहायला जाण्यापूर्वी हे काम कुणीतरी करत होतेच.. अन आपण गेल्यावर अजून कुणीतरी ते काम करणार आहेच…
 
मग हाच विचार आपण ह्या देहाच्या बाबतीत का नाही करु शकत.. ह्या देहात माझा वास जन्मापसून मृत्यूपर्यंत.. मी येण्यापूर्वी हे जग चालत होते अन मी नसतानाही हे तसेच चालु राहील.. फक्त आज मी तिथे आहे म्हणून माझ्या वाट्याला विशिष्टं कामं आली आहेत.. अन ती मला पार पाडत राहायची आहेत… ती माझ्या वाट्याला का आली हे जसे मला माहीत नाही तसेच त्यातून काय निष्पन्न होणार हेही मला माहीत नाही.. गणिताच्या भाषेत बोलायचे झाले तर कर्माचे फल चांगले की वाईट (आपल्या हवे असेल ते चांगले ह्या अर्थाने चांगले अन वाईट इथे अभिप्रेत आहे..) ह्याची probability ५०-५०%… पण फल मिळणार ह्याची probability ही १००%.. मग आपण ह्या १००% वर निश्चिंत का राहु शकत नाही..
 
एकदा हे काम ’मी’ करतोय ही भावना गेली की मग त्याचे जे काही फल मिळणार असेल त्यावरही माझा हक्क उरतोच कुठे? माझ्याकडूनच का करवून घेतले जातेय हे मला माहीत नाही अन करणारा ’मी’ नसून अन्य कुणी आहे हे जर स्पष्ट झाले तर मग त्या कर्माचा हेतू अन फल दोन्हीपासून वेगळे होता येते… माझ्याकडून का करवले जातेय हे माहीत नसतानही ते काम यथासांग पार पडतेच, मग त्याचे फल जे काही असेल त्याचा विचार तरी आपण का करावा??
 
’मी’ करत नाही तर माझ्याकडून हे करुन घेतले जातेय हे ठाम झाले की मग हेतू अन फल दोन्हीची काळजी करण्याची गरज नाही.. हे सारे ’त्याचे’ आहे, तोच करवून घेणारा आहे, त्यामुळे त्यातून मिळणारे फलही आपोआप त्यालाच अर्पण होते…
ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु |
 

टॅग्स:

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: