RSS

दैवी संपत्ती १ (अर्जुन विषाद ६)

21 ऑगस्ट

लहान मूल निरागस असते असा उल्लेख ह्या आधीच्या भागात आला.. निरागस म्हणजे नक्की काय?? मागच्याच भागाचा संदर्भ घेतला तर त्याला पहिल्यांदा वाटते की अक्षर आपणच कढलेय.. पण जेव्हा हे लक्षात येते की आईने किंवा वडिलांनी आपला हात धरला होता तेव्हा ते सहज ती गोष्ट मान्यही करुन टाकते..
 
 पण त्याच्यात अन आपल्यात काही फरक असतात.. त्याच्यात एक सहज अन उपजत सात्विकता असते… ते कुणावरही सहज विश्वास टाकून मोकळे होऊ शकते, त्या व्यक्तीचे सारे काही ऐकून आचरणात आणू शकते… आईने समजावून सांगितले कि अमुक एक गोष्ट करु नकोस तर ते मूल एखाद वेळेस थोडासा हट्ट करेल, पण नीट समजावून सांगितल्यावर त्या गोष्टीचा नाद सोडून देऊ शकेल… पण आपल्या बाबतीत असे होतेच असे नाही, आपला अंतरात्मा प्रत्येक क्षणी आतून जाणीव देतच असतो.. पण मोह, अहंकार, दंभ किंवा अन्य भावनेच्या  (काहीवेळा दुःखात झालेल्या शोक व्याकुलतेने, तर कधी चिंतेने ग्रासले गेल्यावरही) आहारी जाऊन आपण त्या जाणीवेकडे दुर्लक्ष करतो.. लहान मूल कितीही रडले तरी त्याच्या मनात हा विश्वास ठाम असतो की घरातली मोठी व्यक्ती (आई, बाबा, आजी किंवा आजोबा) मला ह्यातून बाहेर काढणार… माझी समजूत काढणार… हा विश्वास आपल्यात कुठेतरी कमी होतो… कदाचित वयामुळे, कदचित वाढत्या जबाबदार्‍यांमुळे किंवा पूर्वानुभवांमुळे…
 
 अजून एक फरक असा की, लहान मूल चटकन त्या कर्तेपणातून बाहेरही येऊ शकते.. नवीन गोष्ट मिळाली की पुन्हा रमते त्याच्यात, जुने सारे विसरून.. अन अगदी सहज.. कुठेही मुद्दाम काहीही झालेले नसते.. पाटी ऐवजी खेळणे हातात आले तर त्यात गुंगून जाते.. अन हेही तेवढ्यात सहज विसरुन जाते की आपण काही वेगळे केले होते, काहीतरी (पहिल्यांदा अक्षर काढण्यासारखी) वेगळी गोष्ट केली होती हेही त्याच्या ध्यानी मनी नसते… अन आपण मात्र आजवर केलेल्या सार्‍या गोष्टी अकारण आपल्या मनात बाळगत असतो, एखाद्या ओझ्यासारख्या… काही तास, दिवस तर जाऊ दे पण वर्षे सरली तरी त्या आपण केल्या हे लख्ख स्मरणात ठेवतो आपण… अन काही वर्षांनंतर आपली ती पाटी लोकांना तेवढ्याच अभिमानाने दाखवतोही…
 
त्या महान मुलात असणारी निरासगता दैवी संपत्तीत वर्णन केल्याप्रमाणे अभय, सत्वसंशुद्धी ह्या गुणांशी निगडीत असते.. त्या लहान मुलाचे मन एवढे सात्विक असते की त्याच्या हट्टांचाही राग येत नाही…
 
 संतांच्या चरित्रात पाहिले तरी तीच निरागसता आढळते पण त्यात जाणीवेतून आलेल्या अन्य गुणांचीही जोड असते… परमेश्वराची जाणीव.. त्या सर्वसाक्षी, सर्वव्यापी ईश्वरी अंशाची जाणीव.. अन ती जाणीव करुन देणार्‍या सद्गुरुंप्रती अढळ निष्ठा.. ठाम विश्वास… अन पूर्ण शरणागती.. तन, मन, बुद्धी सर्व स्तरावर शरणागती… मग तिथे काम, क्रोधादींना जागा उरतेच कुठे… अन जिथे हेच नष्ट झाले, गळून गेले तिथे उरेल ती केवळ निरागसताच.. परमेश्वर हाच माता, परमेश्वर हाच पिता, परमेश्वर हाच सखा ही भावना त्यातूनच तर जाणवत राहते…
 
 अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १६-१ ॥
(भगवद्गीता अ. १६)
 
 दैवी संपत्ती / दैवी गुण वर्णन करताना हा श्लोक येतो..
 
 अभय – जिथे करणारा तो आहे, अन सद्गुरुंचे मार्गदर्शन आहे तिथे भय कसले?? करणारा तो, केलेल्या कामाचे फलही त्यालाच अर्पण मग आपल्या डोक्यावर जबाबदारी उरतेच कसली? अन जिथे जबाबदारीचे ओझेच आपल्या माथी नाही तिथे भय कशाला??
 
सत्वसंशुद्धी – सद्गुरुंप्रति / परब्रह्मावर अविचल निष्ठा असेल, अन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असू, तर काम, क्रोधादी शत्रु त्रास देण्याऐवजी आपल्याकडून सत्वगुणातून त्याचा वापर केला जईल.. अन मग हे तामसी, राजसी राहणारच नाहीत..
एक उदाहरण पाहू, आपल्यासमोर कुणी वाईट काम करत असेल तर तिथे आपला क्रोध आपल्याकडून वापरला गेलाच पाहिजे.. जेव्हा आपल्यात जाणीव असते तेव्हा मनात राग आलेला असतो, पण आपण तिथे काहीवेळा दुर्लक्ष करतो.. अन मला कय त्याचे ह्या भूमिकेत शिरतो.. पण ज्याअर्थी हा प्रसंग माझ्यासमोर नियतीने घडवून आणला आहे त्याअर्थी हा माझ्यातल्या सात्विक क्रोधासाठीचा संकेत आहे, की मी त्या माणसला परावृत्त केले पाहिजे.. नियतीने ही माझ्यासाठी दिलेली एक संधी आहे.. पण एक नक्की की, त्या माणसाला परावृत्त करण्याचे काम आपल्याकडून झाल्यावर आपल्याला क्रोधातून बाजुला होता आले पाहिजे.. अन पुन्हा आपल्या मूळ स्थितीला येता आले पाहिजे… मूळ स्थितीत येता येणे इथे सत्वशुद्धी ही अवस्था लक्षात येते..
 
ज्ञानयोगव्यवस्थितिः – ज्ञानयोगात दृढ स्थिती.. मनाची संशुद्धी झालेली असते, ते सात्विक असते तेव्ह त्यात ठाम विश्वास नित्य असतो.. अशावेळी ते स्थिर वृत्तीत असते.. अन ठाम विश्वासामुळेच ज्ञानयोगात बुद्धीही स्थिरावते.. हे बुद्धीचे स्थिरावणं म्हणजे ज्ञानयोगातील व्यवस्थिती..
 
 दानं – हे दान सत्व गुणी असावे.. दान कशाचेही करता येते.. योगव्यवस्थिती झाल्यावर जे दान होते ते निरपेक्ष भावनेतून होते.. इथे आपल्या ‘स्व’ चे दानही करता येते..(जर ते आधी झाले नसेल तर)..
नेहमी घडणा-या घटनापैकी एखादी घटना पाहुया, कुणीतरी अडलेली व्यक्ती आपल्याकडे मदत मागायला येते.. आपण त्या व्यक्तीला योग्य ती मदत करतोसुद्धा.. हेही एक प्रकारचे दानच.. पण त्या व्यक्तीला मदत केल्यावर वा करताना आपल्या मनात पहिला भाव काय येतो?? एक समाधान, कुणाला तरी मदत केल्याचे, कुणाचे तरी भले केल्याचे, आपल्यामुळे त्या व्यक्तीला उपयोग झाल्याचे.. पण कधी उलट विचार येतो का? की त्या व्यक्तीमुळे आपला एक दिवस चांगला गेला.. त्य व्यक्तीमुळे आपल्याला एक चांगले काम करायची संधी प्राप्त झाली.. ?? म्हणजे आपल्यामुळे त्याचे चांगले झाले ह्याऐवजी त्याच्यामुळे आपला दिवस चांगल गेला, समाधानात गेला… जेव्हा हा विचार आधी डोक्यात येऊन त्या परमात्म्याबद्दल, नियतीबद्दल मनात कृतज्ञभाव निर्माण होतील (अशी संधी आपल्याला देऊन एका चांगल्या कामासाठी आपली निवड केली ह्याबद्दलचे कृतज्ञभाव..), त्या दिवशी सात्विक दान म्हणजे ते अनुभवु शकु…
 
 दमः – म्हणजे इंद्रियांचे दमन.. ह्याबद्दल खुद भगवंतांनीच २ मार्ग दिले आहे.. कर्मसंन्यास, किंवा निष्काम कर्मयोग.. हे दोन मार्ग.. पहिला मार्ग तुलनेने कठिण, तर दुसरा निरंतर आचरण्याचा अन काहीसा सोपा.. इंद्रियांना विषयापासून पूर्ण विलग करणे म्हणजे कर्मसंन्यास.. तर इंद्रियांना विषयांशी संलग्न होतानाही त्यातील इच्छा वा द्वेष नष्ट करुन टाकणे… आसक्तीरहीत भावनेतून कर्म करत राहणे.. हा निष्काम कर्मयोग… निष्काम कर्मयोग हा दैनंदिन कामं करत असताना सहज आचरता येतो..
संदर्भ – (संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥ भ.गीता अ. ५
अर्थ- कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.)
 
 यज्ञः – भगवान, देवता आणि गुरुजन यांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण.. आज होम-हवन अशा अर्थाने कामनेतून (काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने)  जे केले जातात ते यज्ञ इथे अपेक्षित नसून आपल्या कर्मातून झालेले यज्ञ अपेक्षित आहेत.. यज्ञात म्हणजे हवनात जशा समिधांचे अर्पण करतो तसेच ह्या यज्ञात आपल्यातील मन-बुद्धी-अहंकार ह्या समिधांचे अर्पण करायचे.. सद्गुरु हे सगुणस्वरुपातील परब्रह्माचाच अंश.. त्यामुळे थेट निर्गुणाला शरण गेले काय किंवा सगुणरुपाला शरण गेले काय एकूण एकच…
 
स्वाध्यायः –  वेद व शास्त्रे यांचे पठण व पाठन आणि भगवंतांचे नाम व गुण यांचे कीर्तन.. प्रत्येक कार्याच्या आरंभी केलेले त्या परमेश्वराचे नामरुप स्मरण.. दिवसभरात किती कामं करत असतो आपण.. त्यावेळी सुरुवातीला अन शेवटी जरी त्याचे स्मरण केले तरी कितीवेळा नाम-जप घडेल.. अन तोही सहज.. कुठेही वेगळा वेळ काढून हातात माळ घेऊन जपाला बसायची गरज नाही… नित्य कामातच त्याचे स्मरण करता येते..
 
तपः – स्वधर्माच्या पालनासाठी कष्ट सहन करणे.. ज्यांना संन्यास घ्यायचा असतो त्यांचे तप वेगळे.. म्हणजे अधिक कठोर.. पण ज्यांना संसारत राहून काही करायचे आहे त्यांच्यासाठी तप म्हणजे प्रत्येक कामात त्याची आठवण ठेऊन एकाग्रतेने ते काम करत राहणे.. इथे एक गोष्ट आठवते,
एकदा नारदमुनी भगवान विष्णूंकडे गेले.. त्यांनी भगवंताला विचारले की श्रेष्ठ भक्त कोण?? भगवान विष्णूंनी एका शेतक-याकडे हात दाखवून सांगितले की तो शेतकरी माझा खरा श्रेष्ठ भक्त.. त्यावर नारदमुनी संभ्रमात पडले.. त्यांची कल्पना होती की ते सतत परमेश्वराचे नामस्मरण करत असतात तेव्हा तेच श्रेष्ठ असतील.. पण उत्तर काही वेगळेच मिळाले.. म्हणून त्यांनी त्याचे कारण भगवंताला विचारले.. भगवंतांनी थेट उत्तर न देता, नारदमुनींना तेलाने भरलेलं एक भांडं देऊन सांगितले की एकही थेंब न सांडता एक प्रदक्षिणा पूर्ण करुन ये… नारदमुनींनी त्याप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण केली.. परत आल्यावर भगवंतांनी विचारले की प्रदक्षिणा करताना कितीवेळा जप, नामस्मरण केलं?? तेव्हा नारदमुनींना उत्तर मिळाले, एक तेलाचे भांडं नेत असताना सगळे लक्ष त्यातच गेल्याने जप किंवा नामस्मरण केलेच नव्हते.. अन तो शेतकरी तर प्रत्येक कामात तल्लीन होऊन भगवंताचे स्मरण करत होता..
आज आपणही संसारात आहोत, आपल्यालाही आपली नित्य कर्मे आहेत.. पण त्याचवेळी एवढा सहज सोप्पा स्मरणाचा मंत्र आपल्याला मिळाला आहे.. मग त्या तपाचे आचरण का करु नये??
 
आर्जवम्‌ – अंतःकरणाची सरलता.. ऋजुता.. आपल्यापेक्षा अधिक ज्ञान वा माहिती असलेल्या व्यक्तीसमोर आपण आपोआप शांत राहतो, नम्र होऊन जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.. नवीन शिकून घेतो.. मग हे सगळ्यांबाबत का घडु नये.. मला माहीत आहे हा भाव निघून गेला अन मला काहीच माहीत नाहीये, अजून शिकायचे आहे अशा विचारात वागलो तर आर्जव आपोआप येते… प्रत्येकासमोरच आपण विद्यार्थीच अहोत.. कोण कधी काय शिकवून जाईल हे आपल्यालाही माहीत नाही.. मग सगळ्यांसमोर एकाच आर्जवी भावनेतून आपण का वागु नये.. आपल्या मेंदूचाही आपण पूर्ण वापर करु शकत नाही किंवा करत नाही ही सिद्ध झालेली गोष्ट आहे.. असे असताना ’मला माहीत आहे’ असे आपण कसे म्हणू शकतो?? उलट ’मला एवढेच माहीत आहे, अन ह्यापेक्षा काहीही वेगळे असेल तर जाणून घ्यायला मला मनापासून आवडेल’ हा भाव आपल्याला सहज आर्जवी बनवतो…
 
(दैवी संपत्तीचे वर्णन असलेले अजून २ श्लोक पुढील भागात लिहिण्याचा प्रयत्न असेल.. त्यानंतर जाणीव अन नेणीव व त्रिगुण(सत्व-रज-तम) ह्याबद्दल स्फुरतील तसे विचार मांडून बघेन…)
 
ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु ||
 

टॅग्स:

One response to “दैवी संपत्ती १ (अर्जुन विषाद ६)

 1. datta

  ऑगस्ट 23, 2009 at 05:19

  अति सुन्दर ! भगवदगितेवर आनि प्रत्येक अध्यात्मिक पैलुवर इतके सुंदर विस्त्रुत भाष्य मि कुथेच पाहिले नव्हते. ,आपल्या या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा !!
  http://dattatray.110mb.com/
  http://gourakshak.110mb.com/

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: