RSS

तर्कतांडव – भावार्थ

09 सप्टेंबर


tarkatandav


ही कविता २ अर्थाने वाचता येते.. एक, आपल्या नित्य आयुष्यात घडणार्‍या घटनांचा वेध घेऊन तर दुसरा, आपली एका वेगळ्या अज्ञात मार्गावरील वाटचाल.. वेगळ्या म्हणजे, त्या परब्रह्माच्या दिशेने.. हे परब्रह्म म्हणजे आपल्यातलाच चेतन अंश.. अन त्याचा शोध घेण्यासाठीचा प्रवास म्हणजे बाहेरुन आत(स्वतःत) जाणारा.. अंतर्मुख करणारा..

ह्यापैकी मी ह्या दुसर्‍या अर्थाबद्दल अधिक विश्लेषण करेन.. पण सुरुवातीला पहिल्या अर्थाबद्दल थोडक्यात सांगते.. ही अवस्था म्हणजे आपल्या आयुष्यात आलेले असे अनेक प्रसंग जिथे आपली विचार करण्याची क्षमता तोकडी असल्याची जाणीव होते, मति कुंठीत होते. बाहेरुन सजीव हालचाली चालु असल्या तरी आतून एक निर्जीवता जाणवून गेलेली असते.. बाहेर येण्याचे सारे प्रयत्नही थकतात अशी काहीशी स्थिती.. आशेचे ढगही वितळून जातात.. अन मनही त्यासह विरघळते.. त्यातली प्रसन्नता काही काळ त्या आशेच्या ढगासह विरुन जाते.. विचारांचे, तर्कांचे, भावनांचे एक विचित्र तांडव माजते, अन त्यात स्वस्थिती पूर्ण ढवळून निघते, अन हे तर्कतांडव आपल्या शुद्ध विचारांना अशुद्धतेकडे नेते.. कदाचित ही शुद्धतेच्या प्रक्रियेची सुरुवात वा मधली स्थिती असेल.. पण वरवर पहाता असेच चित्र दिसते की पूर्वी स्वच्छ असलेला हा समुद्र आता गढूळला आहे.. कदाचित, हे त्या समुद्राचे तळापासून शुद्ध होणे असेल.. अन असेही असेल की पूर्वी हा समुद्र केवळ वरकरणी शुद्ध असेल अन अंतरंगात गाळ साचवून बसला असेल.. आता तो गाळ बाहेर फेकला जातोय अन त्यामुळे ते तर्कतांडव त्य समुद्राला खवळून टाकतंय..

अशा स्थितीत मग हे काळाचे हिशोबही नकोसे होतात.. असे वाटते की एकतर आहे तीच अवस्था(पूर्वीची) रहावी किंवा नवीन अवस्था तरी लवकर यावी.. पण हे होत नाही अन म्हणूनच अधीच शून्य झालेलं रितं मन अजून रिक्ततेकडे जातं.. महाशून्याकडे जातं….

अन मग जाणवु लागते ते अशा प्रसंगात आपल्या मागे असलेल्या दैवी शक्तीचे अस्तित्व.. त्या परब्रह्माचे अस्तित्व.. अन त्यासमोर ह्या देहाचे संकुचितपण.. ज्यातून बाहेर निघण्याचे ह्या देहाचे, मनाचे सारे प्रयत्न थकले त्याच स्थितीतून त्या दैवी शक्तीने अगदी अलगद बाहेर नेले.. अन अशावेळी हेच तर्कतांडव त्या दैवी शक्तीत, परब्रह्माकडे आपोआप उधळाले जाते….

आता दुसरा अर्थ,

ठप्प होणार्‍या हालचाली,
मख्ख वाटणारे प्रतिबिंब,
सजीवतेकडून निर्जीवतेकडे,
बळावणारे तर्कतांडव!

जेव्हा एक वेगळा प्रवास सुरु होतो त्यावेळची अगदी सुरुवातीची अवस्था.. स्वतःचाच घेतलेला वेध.. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याची तळमळ.. पण ह्या प्रवासाची सुरुवात काहिशी वेगळी, विचित्र असते.. कारण हा प्रवास सर्वस्वी अनोळखी अशा वाटेवरचा, इथे मार्गदर्शक, मार्ग, ध्येय सारे काही तोच.. अन प्रवासी असलेल्याच्या अंतरंगातही तोच.. पण बांधला गेलेला.. अशा ह्या प्रवासाची चाहूल लागली की मग बाह्य हालचाली ठप्प झाल्या की काय असे वाटु लागते.. अन ह्या देहाचे प्रतिबिंब मख्ख वाटते.. कारण बिंबाची ओळख होण्यास सुरुवत झालेली असते.. पण अशावेळी हे देहबुद्धीने माजवलेलं तर्कांचे तांडव पुन्हा आपल्याला ‘सजीवतेकडून’ निर्जीवतेकडे नेऊ लागते.. म्हणजे आपल्याला सगळ्या हालचाली सजीवतेतून होताना जाणवत असतात, पण ही खरेच सजीवता असते का? की आता ह्या प्रवासात जी जाणवतेय ती सजीवता.. पण देहबुद्धी ह्या सजीवतेपासून पुन्हा निर्जीवतेकडे बळेच नेते.. ते त्या तर्कांच्या आधारे.. विचारांच्या आधारे.. स-जीव म्हणजे आपल्यातला चेतन अंशास आपले अस्तित्व.. पण देहबुद्धी ह्या शोधापासूनच परावृत्त करायला जाते…

निथळत विरणारे ढग,
विरघळत जाणारे मन,
सुकाळाकडून दुष्काळाकडे,
बोकाळणारे तर्कतांडव!

मग ह्या शोधप्रवासातल्या काही आशेचे कृष्णमेघ बरसून विरळत जातात.. असे वाटते की ह्या शोधात हे एवढेच संकेत मिळाले? ह्या अल्प संकेतांवर हा लांबचा पल्ला कसा गाठावयचा.. अन त्या आशेच्या, संकेतांच्या विरणार्‍या ढगांबरोबरच मनही विरघळत जाते.. काहीशा निराशेने.. हही त्या देहबुद्धीने मांडलेल्या तर्कांचाच परिणाम.. त्या संकेतांनी आणलेला सुकाळ लक्षात न येता दिसतो तो विराण दुष्काळ.. दिसतो, की दाखवला जातो? हो, दखवला जातो, देहबुद्धीकडून… तसे तर ते संकेताचे मेघही दिसले होतेच ना निथळताना.. पण त्याचे निथळणं पुरेसे नाही ही व्यर्थ जाणीव करुन दिली त्या देहबुद्धीनेच… त्या बोकाळलेल्या तर्कटांनीच…

गढुळणारे महासागर,
खवळणारे भावसागर,
विशुद्धतेकडून अशुद्धतेकडे,
झेपावणारे तर्कतांडव!

ह्या संकेताच्या ढगातून निथळून गेले थेंब अन त्याने साधलेला परिणाम दिसू नये ह्यासाठी बोकाळलेल्या ह्या तर्कांनी आता हा महासागरच गढूळ केला.. आपल्या अंतरंगातला महासागर.. तो आतून ढवळला गेल्यामुळे आता विशुद्धता नष्ट होऊन सगळी अशुद्धता त्यात दिसतेय… पण हे खरेच असे आहे का? की पूर्वी देहबुद्धीत असताना जी घाण तळाशी साचली होती ती ह्यामुळे पृष्ठभागवर येतेय.. कदाचित कायमची निघून जाण्यासाठी… वरवर जरी ह्या तर्कतांडवामुळे असे दिसत असले की आधी विशुद्धता होती अन आता अशुद्धता आलीये तरी आत्मबुद्धीला त्या तर्काची झेप आता माहित झालीये.. त्यामुळे हे तर्कतांडव विशुद्धतेकडून अशुद्धतेकडे झेपावले तरी ही एक मध्यस्थिती आहे.. किंवा तो प्रवास योग्य अर्थाने, योग्य मार्गावर सुरु झाल्याची खूण दर्शवणारी अवस्था..

आकसलेले तीन काळ,
टुकार हिशोबांचे वादळ,
शुन्याकडून महाशुन्याकडे,
चेकाळणारे तर्कतांडव!

आता ती अत्मस्थितीची अवस्था जाणवू लागली आहे, पण अजूनही देहस्थिति / देहबुद्धी पूर्णतः गेलेली नाही.. त्यामुळे राहून राहून असे वाटतेय की एकतर सध्याची ही जाणिवेची अवस्था रहावी किंवा पूर्णतः आत्मस्थितीची अवस्था यावी.. पण हा मधला काळांचा हिशोब नको.. ते टुकार हिशोब करुन काय साध्य आहे? पण अश ह्या मध्यस्थितीत देहबुद्धीचे तांडव मात्र शून्याकडून महाशून्याकडे जातंय.. कारण आता त्या तर्कातला फोलपणा जाणवतोय.. अन त्यामुळे हे चेकाळलेपण… शून्याकडून महाशून्याकडे, म्हणजे, आधीच हे देहबुद्धीचे तर्क, विचार हे त्या आत्मबुद्धीसमोर पोकळ किंवा व्यर्थ.. त्यात त्यांचे अजून चेकाळणं…

सावल्यांचे लहानमोठेपण,
नित्य देहाचे संकुचितपण,
मोहमायेकडून परब्रम्हाकडे,
उधळणारे तर्कतांडव!

पण जेव्हा आत्मस्थिती प्रबळ होते, तेव्हा अशा ह्या विचारांच्या सावल्या त्या आत्मबुद्धीसमोर आपोआप लहान ठरु लागतत.. अन जाणवू लागते देहचे संकुचितपण.. अन मग हेच तर्क मोहमायेकडून (देहबुद्धीकडून) परब्रह्माकडे(आत्मस्थितीकडे) उधळले जातात.. त्या आत्मस्थितीत उधळून लावले जातात..

 

टॅग्स: , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: