RSS

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – २

15 सप्टेंबर

भाषण तिसरे – हिंदूधर्म

इतिहासपूर्व काळापासून तहत वर्तमान काळापर्यंत चालत आलेले तीन धर्म आज जगात विद्यमान आहेत. ते म्हणजे, हिंदूधर्म, पारशीधर्म आणि यहुदीधर्म हे होत. यातील प्रत्येकाला मोठमोठ्या आपत्तींमधून जावे लागले आहे. पण तरीसुद्धा लुप्त न होता ते अजूनही जिवंत आहेत यावरुनच सिद्ध होते की, त्या सर्वांचे ठायी महान शक्ती वसत आहे. परंतु, यहुदी धर्म ख्रिस्ती धर्माला आत्मसात करु शकला नाही. उलट तो स्वतःच आपल्या या विश्वविजयी अपत्याकरवी स्वतःच्या जन्मभूमीतून कायमचा हद्दपार केला गेला. आणि मूठभर पारशीच काय ते आपल्या वैभवशाली धर्माची कहाणी सांगावयास आज शिल्लक आहेत. भारतात मात्र संप्रदायांमागून संप्रदाय उदयास आले. वेदप्रणीत धर्माला त्यांनी जणू मूळासकट गदगदा हालवून सोडले. परंतु, समुद्राचे पाणी भूकंपाच्या प्रबल धक्क्याने थोडावेळ मागे हटते खरे, पण नंतर मग सर्वग्रासी महापुराच्या प्रचंड वेगाने परतून समोरील सारा प्रदेश आक्रमून टाकीत असते. त्याचप्रमाणे, या सर्व संप्रदायांचा जनकच असा वेदप्रणीत धर्म प्रथमतः अंमळ मागे सरल्यासारखा होऊन, हा सारा कोलाहल शमताच, त्या त्या संप्रदायाला संपूर्णपणे आत्मसात करीत स्वतःचा विराट देह अधिकाधिक पुष्ट करत आला आहे…

आधुनिक विज्ञानाचे नव्यातले नवे शोध ज्याच्या उच्च तत्वांचे मंद प्रतिध्वनीच वाटतात, त्या सर्वोत्कृष्ट वेदांतापासून तो सामान्य मूर्तिपूजेला व तत्संबद्ध नानाविध पौराणिक कथांपर्यंत सर्वांना, इतकेच काय पण बौद्धधर्माच्या अज्ञेयवादाला आणि जैनांच्या निरीश्वरवादाला देखील हिंदूंच्या धर्मात स्थान आहे..

यावर कुणी विचारील की, मग हे सगळे भिन्न भिन्न व सकृतदर्शनी कमालीचे परस्परविरोधी वाटणारे भाव अशा कोणत्या एका साधारण अधिष्ठानावर अधिष्ठीत आहेत? कोणत्या साधारण केंद्राच्या आश्रयाने ते अवस्थित आहेत? याच प्रश्नाला उत्तर देण्याचा मी आज यथाशक्ती प्रयत्न करणार आहे.

हिंदूंना अपौरुषेय वेदांपासून स्वतःचा धर्म प्राप्त झाला आहे. हे वेद आदिरहित नि अंतरहित आहेत असा त्यांचा विश्वास आहे. एखादे पुस्तक आदि-अंतरहित असते असे म्हटल्याने या श्रोतृसमाजाला हसू येईल खरे. पण, वेद म्हणजे काही विशिष्ट पुस्तके असा वेदाचा अर्थच नाही. भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी ज्या अध्यात्मिक सत्यांचा शोध लावला, त्यांच्या चिरसंचित कोषालाच वेद असे नाव आहे. मानवजातीला ज्ञात होण्यापूर्वीही गुरुत्वाकर्षणाचा नियम आपले कार्य करत होता आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा विसर पडला तरी तो आपले कार्य बजावीत राहीलच. आध्यात्मिक नियमांचेही असेच आहे. एका जीवात्म्याचे इतर जीवात्म्यांशी आणि सर्व जीवात्म्यांचे त्या परमपिता परमात्म्याशी जे सारे दिव्य नि विशुद्ध संबंध आहेत ते सर्व, त्यांचा शोध लागण्यापूर्वी विद्यमान होते आणि अपल्याला त्यांचा विसर पडला तरीही आहेत तसेच राहतील…

या अध्यात्मिक नियमांचा शोध लावणा‌-यांना ’ऋषि’ अशी संज्ञा आहे. सर्वज्ञ आणि पूर्णत्व पावलेल्या विभूती मानून आम्ही त्यांना सन्मान देत असतो. या अतिशय उन्नत ऋषींमधे काही स्त्रिया होत्या हे आजच्या या श्रोतृसमाजाला सांगताना अत्यंत आनंद वाटत आहे.

येथे कुणी असे म्हणू शकतील की, हे सर्व अध्यात्मिक नियम, नियम ह्या दृष्टीने अंतरहित असतील खरे, पण त्यांना आदी किंवा आरंभ असलाच पाहिजे. वेद घोषणा करतात की, सृष्टीला (व म्हणूनच सृष्टीनियमावलीलासुद्धा) आदीही नाही अन अंतही नाही. आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, सृष्टीतील एकूण शक्तीची समष्टी वा गोळाबेरीज नेहमी सारखी असते. असे असूनही जर तुम्ही म्हणाल की, असा एक समय होता ज्यावेळी काहीही नव्हते, तर त्यावर मी विचारतो की मग त्या वेळी ही सर्व शक्ती कुठे होती? कुणी कुणी म्हणतील – अव्यक्त रुपात ती ईश्वरातच सामावलेली होती. परंतु याचा अर्थ, ईश्वर कधी क्रियावान आणि कधी क्रियारहित, म्हणजेच तो विकारशील आहे, असा होतो. विकारशील प्रत्येक वस्तू ही मिश्र पदार्थ असते आणि प्रत्येक मिश्र पदार्थ विनाशशील असतो. म्हणजे ईश्वरसुद्धा विनाशशील ठरेल ! पण हे अर्थातच शक्य नाही. आणि म्हणूनच असा समय कधीही नव्हता की जेव्हा काहीही नव्हते, अर्थात जेव्हा जीवसृष्टी विद्यमान नव्हती. तात्पर्य, सृष्टीला आरंभ नाही, ती अनादी आहे. उपमाच द्यायची झाली तर म्हणता येईल की, स्रष्टा आणि सृष्टी ह्या दोन आदिरहित आणि अंतरहित, एकमेकांना समांतर अशा रेषा आहेत. ईश्वर नित्य-महाशक्तिस्वरुप, सर्वविधाता असून तो प्रलयपयोधीतून ब्रह्मांडभुवनांचे नित्य सृजन करतो, काही काल त्यांचे पालन करतो, आणि फिरुन सारे भंगून टाकतो. हे असेच सतत चालु आहे. हिंदू बालक आपल्या गुरुंसह प्रतिदिन म्हणत असतो – ‘सूर्यचंद्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत’ – अर्थात, विधात्याने पूर्वीप्रमाणेच सूर्य आणि चंद्र निर्माण केलेत. आधुनिक विज्ञानही हेच सांगत आहे…

(contd…)

 

टॅग्स: , , , ,

One response to “११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – २

  1. SRIKRISHNA DAS

    जानेवारी 11, 2011 at 05:05

    it is very nice whatever u r doing

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: