RSS

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ३

24 सप्टेंबर

(भाषण तिसरे – हिंदूधर्म- पुढचा भाग
आधीचा भाग –
https://medhasakpal.wordpress.com/2009/09/15/११-सप्टेंबर-–-शिकागो-सर्व/)

मी येथे उभा आहे. डोळे मिटून मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करु लागलो – ‘मी ‘मी’ ‘मी’ – तर माझ्यासमोर कोणती बरे कल्पना उभी राहते? हीच की हा देहच मी होय. तर मग, पंचमहाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात, ‘नाही’. मी देहात वसणारा ‘आत्मा’ आहे, मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामधे आहे, परंतु ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळीही मी विद्यमान राहीन, आणि हा देह धारण करण्यापूर्वीही मी होतोच. आत्म कुण्या पदार्थापासून सृष्ट झालेला नाही. कारण ‘सृष्टी’ शब्दाचा अर्थच आहे – भिन्न भिन्न द्रव्यांचा संयोग. आणि असा संयोग म्हटला की केव्हा ना केव्हा तरी त्यांचा वियोग हा ठेवलेलाच. अतएव, आत्मा जर सृष्ट झाला असेल तर तो नाश पावणार हे नक्कीच. म्हणून आत्मा सृष्ट पदार्थ नव्हे. कुणी कुणी जन्मापासूनच सुखात लोळत असतात, सुंदर-सुदृढ शरीर नि उल्हास-उत्साहपूर्ण मन त्यांना जन्मतःच लाभलेले असते, अभाव म्हणून कशाचाच नसतो. तर दुसरे कुणी आजन्म दुःखात पिचत असतात, – कुणाला हात नसतात, कुणाला पायच नसतात, तर कुणी वेडसरच जन्मतात आणि आपल्या भारभूत आयुष्याचा एक एक दिवस कसा तरी कंठीत असतात. हे सर्वच जण जर सृष्ट झाले असतील तर, हे सर्व जर त्या एका न्यायशील आणि दयामय ईश्वरानेच सृष्ट केले असतील तर कुणी सुखी अन कुणी दुःखी असे का? का बरे भगवंताने असा पक्षपात करावा? तुम्ही म्हणाल, “जे या जन्मी दुःख भोगत आहेत ते परजन्मी सुखी होतील.” पण म्हणून काय झाले? दयामयाच्या व न्यायवानाच्या राज्यात का बरे एकजण तरी दुःखी असावा? आणि दुसरे असे की, एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील या विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. उलट ह्यात एखाद्या सर्वशक्तिमान, स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुर व्यवहार मात्र दिसून येतो. करिता, हे स्वीकारणे भाग पडते की, मनुष्य सुखी वा दुःखी जन्मण्यापूर्वी अशी बहुविध कारणे घडली असली पाहिजेत की ज्यायोगे तो परिणामी सुखी किंवा दुःखी झाला आहे. आणि ती कारणे म्हणजे त्याचीच सारी पूर्वकर्मे होत. बरे पण, माणसाच्या शरीराची व मनाची घडण त्याच्या पितृ-पितामहादींच्या शरीरमनानुरुप होत असते असे म्हणून, आनुवांशिकतेच्या आधाराने वरील प्रश्नास समर्पक उत्तर देता यावयाचे नाही काय? हे अगदी स्पष्टच आहे की, जीवनस्रोत जड आणि चैतन्य अशा दोन धारांनी प्रवाहित होत असतो. जड आणि जडाचे विकारच जर आत्मा, मन, बुद्धी वगैरेंचे कार्य करु शकत असतील तर मग आणखी एक स्वतंत्र आत्मा मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु जडातून चैतन्यशक्ती उद्भूत झाली आहे असे सिद्ध करण्यास काहीच प्रमाण नाही. आणि म्हणूनच, एका जड पदार्थापसून सारे काही सृष्ट झाले असे स्वीकार करतो म्हटल्यास, एक मूल चैतन्यच समग्र सृष्टिकार्य चालवीत असते हे स्वीकार करणेही अर्थातच तर्कसंगत, नव्हे सर्वांच्याच दृष्टीने वांछनीयही होऊन बसते. परंतु येथे या विषयाचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही.

मानवशरीरात पितृ-पितामहादींच्या ब-याचशा प्रवृत्ती आनुवांशिकतेने संक्रामित होत असतात ही गोष्ट अर्थातच आपण कधीही नाकबूल करु शकणार नाही. परंतु त्याचबरोबर हेही विसरुन चालणार नाही की, केवळ शारीरिक प्रवृत्तींखेरीज प्रत्येक जीवात्म्याच्या स्वतःच्याही काही विशिष्ट प्रवृत्ती असतात. जो आत्मा ज्या विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असतो, तो ठीक तदनुरुप शरीराचाच आश्रय घेऊन स्वतःच्या प्रवृत्तींनुसार कार्य करण्यास समर्थ होतो. परंतु आत्म्याच्या त्या त्या प्रवृत्तीही परत पूर्वी केलेल्या कुण्या कर्मामुळेच बनत असतात. विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असलेला आत्मा आपल्या प्रवृत्तींना उपयोगी अशाच देहात जन्म घेतो, कारण दोन समान किंवा अनुरुप गोष्टींचाच संयोग होत असतो असा नियम आहे. हे आधुनिक विज्ञानालाही संमत आहे. कारण, विज्ञान म्हणते की प्रवृत्ती सवयीने बनते, व सवय पुनरावृत्तीचे फल होय. म्हणून, कोणत्याही नवजात बालकाच्या प्रवृत्ती त्याने पुनः पुनः आचरलेल्या कर्मांचीच फळे होत. आणि ज्याअर्थी या प्रवृत्ती त्याने या जन्मात कमवणे शक्य नाही त्याअर्थी त्या त्याच्य मागील जन्मांतूनच आलेल्या असल्या पाहिजेत असे म्हणणे भाग पडते.

परंतु, येथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. समजा की पूर्वजन्म आहे. पण मग त्या पूर्वजन्माचे काहीच कसे स्मरण आपल्याला राहू नये? या शंकेचे समाधान करणे अर्थातच विशेष अवघड नाही. सध्या मी इंग्रजीतून बोलत आहे. ती काही माझी मातृभाषा नव्हे. खरे पाहिले असता मातृभाषेतील एक देखील शब्द सध्या माझ्या मनात हजर नाही. पण मी जर आठवण्याचा प्रयत्न करीन तर तत्क्षणी ते माझ्या स्मृतिपटलावर चमकू लागतील. यावरुन हेच दिसून येते की, मनःसागराच्या केवळ पृष्ठभागावरच जे काय हेलकावत राहते त्याचाच फक्त आपल्याला बोध होत असतो. आणि आपली पूर्वार्जित ज्ञानराशी त्याच समुद्राच्या अगाध गर्भात दडलेली असते. प्रयत्नपूर्वक साधनेद्वारा तिला वर आणता येते. आणि मग, याच काय पण पूर्व पूर्व जन्मांची देखील संपूर्ण स्मृती आपल्या अंतःकरणात जागृत होईल.

पूर्वजन्मासंबंधी हे साक्षात प्रमाण होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात ताडून बघून पडताळा मिळाल्यानंतरच कोणत्याही मताची वा वादाची संपूर्ण सिद्धता होत असते. आणि ऋषिगण समस्त जगतासमोर आव्हानपूर्वक घोषणा करीत आहेत की, “अथांग स्मृतिसागराच्या खोल खोल प्रदेशाचा ठाव कशा रीतीने घ्यावा हे गूढ आम्ही उकलले आहे.” त्यांचे अनुकरण करुन यथोचित साधना करा, तुम्हालाही गतजन्मीच्या सा-या घटना आठवतील.

सारांश, आपण आत्मा आहोत असा हिंदूंचा विश्वास आहे. “शस्त्र त्या आत्म्याला छिन्न करु शकत नाही, अग्नी दग्ध करु शकत नाही, जल आर्द्र करु शकत नाही, आणि वायु शुष्क करु शकत नाही !” हा आत्मा एक असे वर्तुळ आहे की ज्याचा परिघ कुठेच नाही परंतु ज्याचे केंद्र प्रत्येक देहामधे अवस्थित आहे. आणि त्या केंद्राचे एका देहातून दुस-या देहात गमन म्हणजेच मृत्यू. त्याचप्रमाणे हा आत्मा जडाच्या नियमांच्याही अधीन नाही. तो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव आहे. परंतु कुण्या अचिंत्य कारणाने कुणास ठाऊक, तो जडाशी बांधला गेला असून स्वतःला जडच समजत असतो. प्रश्न उद्भवतो – हा विशुद्ध, पूर्ण नि विमुक्त आत्मा जडाच्या खोड्यात अडकून त्याचा दास बनावाच का? पूर्ण असूनही आपण अपूर्ण आहोत असे त्याला वाटावेच कसे? आपल्याला असे सांगण्यत येते की या प्रश्नाची यथातथ्य मीमांसा करण्यास असमर्थ म्हणून हिंदू त्या प्रश्नाला साफ बगल देऊन म्हणतात की असला प्रश्नच मुळी संभवत नाही ! कुणी कुणी पंडित आत्मा, जीव आणि त्या दोघोंच्या मधे पूर्णप्राय (जवळजवळ पूर्ण) सत्ता यांचे अस्तित्व कल्पितात व त्यांना नानाविध बोजड शास्त्रीय संज्ञा देऊन वरील प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितात. पण संज्ञांची खैरात म्हणजे काही उत्तर नव्हे, कारण संज्ञांच्या सरबत्तीनंतरही प्रश्न होता तसाच शिल्लक उरतो. जो पूर्ण, त्याची पूर्णता अगदी लेशभरसुद्धा ढळुच कशी शकते? जो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव, त्याच्या त्या स्वभावाचा अणुमात्रदेखील व्यतिक्रम होऊच कसा शकतो? हिंदू या बाबतीत सर्वांपेक्षा अधिक सरळ आणि सत्यवादी आहे. फोल तर्कयुक्तीच्या मदतीने उत्तर देण्याचा तो आवही आणत नाही, अथवा उत्तर दिले म्हणून आपले पांडित्यही मिरवू इच्छित नाही. अगदीही न कचरता वरील प्रश्नाला तो उत्तर देतो – “हे मला माहीत नाही. हा पूर्ण आत्मा आपल्या अपूर्ण कसा मानू लागला आहे, जडाच्या नियमांच्या अधीन कसा समजू लागला अहे, हे मला माहीत नाही.” परंतु वस्तुस्थिती ही अशीच आहे एवढे मात्र निर्विवाद. प्रत्येकजण स्वतःला देहरुपी समजत असतो. हे असे का, आत्मा ह्या देहात का बरे आला आहे, याचे विवरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. ‘ही सारि ईश्वरची इच्छा’ असे म्हणूनही या कूट प्रश्नाचा निकाल लागण्यासारखा नाही. कारण, हिंदू जे म्हणतो की ‘मला माहीत नाही’, त्यापेक्षा ह्या उत्तराने तरी प्रस्तुत रहस्यावर अधिक प्रकाश तो कोणता बरे पडतो?

असो, तर ह्यावरुन हेच निष्पन्न होते की, मनुष्याचा आत्मा अनादी, अमर, पूर्ण आहे आणि एका देहातून दुस-या देहात जाण्याचे नावच मृत्यू होय. आपली वर्तमान अवस्था आपल्या गतजन्मांचे फल असून भावी अवस्था वर्तमान कर्मांचे फल होय. आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत जन्म आणि मृत्यूच्या अखंड फे-यात अविरत भ्रमत असतो.

(ह्या भाषणाचा पुढील भाग “११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ४” मधे टाईप करेन… )

 

टॅग्स: , , , , , , , ,

One response to “११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ३

  1. sdw

    डिसेंबर 18, 2012 at 05:23

    BLOG IS NICE…….PLEASE TYPE FOR SWAMI VIVEKANAND SPEECH PART 4.

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: