RSS

Category Archives: खास गाणी

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठला, तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥

घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥

— गीतकार – ग. दि. माडगुळकर
— गायक – सुधीर फडके

(नितांत सुंदर असे हे गाणे आहे.. कितीही निराश मनस्थिती असली तरी हे गाणे ऐकताना पुन्हा नवा उत्साह, नवी प्रेरणा मिळते.. मन आपोआप शांत होते… हे गाणे सैरभैर मनस्थितीत पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.. एक आठवण म्हणून नेहमी समोर असावे, ह्यासाठी ब्लॉगवरच ठेवतेय..)


Advertisements
 
6 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2009 in खास गाणी

 

टॅग्स: , ,