RSS

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख – १)

आयुर्वेद हा शब्द कुठल्याही ग्रुपच्या, नातेवाईकांच्या गप्पांमधे आला की २ गोष्टी अपोआप सुरु होतात, एक म्हणजे आपल्याला माहीत असलेले मोजके उपाय दुस-याला सुचवायला सुरुवात करणे अन दुसरे म्हणजे आपल्याला असलेली अर्धवट माहिती छातीठोकपणे इतरांना पटवून देणे, तीही नातेवाईक वा मित्रांच्या संदर्भात ऐकलेली.. पण खरेच कधी जाणून नाही घ्यावेसं वाटत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? तुळस, ओवा, हिंग असले घरगुती उपचार म्हणजेच फक्त आयुर्वेद का? की सगळे उपाय करुन झाल्यावर राहिलेला उपाय म्हणजे आयुर्वेद? ज्याप्रमाणे रुढी अन शास्त्र ह्यामधे अनेकांचा गोंधळ असतो, तसेच काहीसे हल्ली आयुर्वेदाच्या बाबतीत दिसून येते..

आयुर्वेद म्हणजे नक्की  काय ह्याबद्दल आजवर जेवढे काही समजलंय तेवढे ह्या लेखमालेतून इथे ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.. आयुर्वेदाबद्दलचे समज, गैरसमज अन सत्य हे सारे स्पष्ट करणे हा ह्या लेखमालेचा उद्देश.. पहिल्या लेखात आपल्या मनात असलेले समज काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. उत्तरे हळुहळु पुढच्या लेखांमधे येतील.. सामान्यतः जे काही प्रचलित समज लोकांमधे आढळतात त्याचा उल्लेख पुढे केला आहे.. ह्यासारखे अजूनही काही समज आढळतात, त्यांचा उल्लेख पुढच्या लेखांमधे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने येईल.. ह्यापैकी प्रत्येक समज वा गैरसमज अन सत्य ह्याचे सविस्तर विश्लेषण ह्यानंतरच्या लेखांमधे असेल, प्रत्येक समजासाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे.. इथे सर्वसामान्य विषयांची माडणी असेल, कुणाचेही वैयक्तिक अनुभव वा विशिष्ट रुग्णांचे अनुभव ह्याचा समावेश नाही..

-> कधी कधी आपल्या नकळत आपण कुणालातरी काहीतरी उपाय सुचवतो.. मला माहीत आहे ते औषध, मागे पण कितीतरी जणांना दिले आहे ना ते अशा भ्रमात अनेकदा आपण फुकटचे सल्ले देत असतो.. अन ते अपाय ठरु शकते ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते.. पण जेव्हा एखाद्याला अपाय होतो, आपल्याला प्रश्न पडतो की मागच्यावेळी एकाला हाच उपाय सांगितला होता तर त्याला आराम पडला, मग आता का असे उलट झाले?  अन अपाय झालाच तर त्याचे खापर अकारण आयुर्वेदाच्या माथी… पण खरेच हे असे का झाले ह्याचा शोध घेता येणं शक्य आहे..

-> आजवर कायम ऐकलेली गोष्ट म्हणजे “आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात”.. हा प्रचार कुणी अन का सुरु केला हे शोधत बसणे शक्य नाही.. पण हे खरे आहे का?? तसाच अजून एक ठाम असलेला समज, “आयुर्वेदिक औषधाला एक्स्पायरी नसते”.. कधी एखादी संहिता (आयुर्वेदाची) उघडून पाहिली आहे का? त्यात काय सांगितले आहे नेमके ते शोधले का?? आत्ता उल्लेख केलेले हे दोन समज की गैरसमज??

-> Practice करत असताना सामान्यपणे जे प्रश्न रुग्ण नेहमी विचारतात त्यापैकी एक म्हणजे, “तुम्हाला नाडी परिक्षा येते का?” जणू केवळ नाडी परिक्षा येणं म्हणजे आयुर्वेदात पारंगत अशी काहीशी कल्पना असते…

-> आयुर्वेद म्हणजे केवळ औषधी उपचार अशीही समजूत असते.. आयुर्वेदात सर्जरी पण आहे का? हा प्रश्न तर हमखास ठरलेला… पण आयुर्वेदात शस्त्रचिकित्सेचे वर्णन आहे, नव्हे एक पूर्ण संहिता ’शस्त्रचिकित्सा’ ह्या वैद्यकीय अंगाची माहिती देते हे ऐकून आपल्या निश्चित नवल वाटले असेल…

-> आयुर्वेदात क्वीक रिझल्ट्स नसतात हा तितकाच ठाम समज(?).. आयुर्वेदिक औषधं उशीरा काम करतात पण कायम स्वरुपी आराम मिळतो असली वाक्यं सर्रास ऐकू येत असतात.. पण त्रिभुवनकीर्तीसारखी गोळी १-२ तासात ताप पूर्ण कमी करते हे कधी पाहिले जात नाही..

-> वैद्याकडे गेले की काय खायचे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच यादी मोठी.. सगळे आवडते पदार्थच बंद करायला सांगितले आहेत.. काय सुख मिळते हे करुन कुणास ठाऊक.. ह्यासारखी वाक्यं पण घरोघरी ऐकू येतात..

-> भस्म – हा तर गाजलेला विषय.. इतर देशात भस्मांचे विषारी परिणाम सांगितले गेले अन त्यामुळे आपणही ते खरे मानून भस्म असलेली औषधं म्हणजे विषच असा समज करुन घेतला.. भस्म असलेली औषधं घेतल्याने किडनी फेल होते असेही आपण वाचतो.. पण हे किती खरे आहे? अन कुठल्या भस्मामुळे हे होते? शुद्ध की अशुद्ध? भस्मं खरेच विषारी असतात का? त्याचे एवढे दुष्परिणाम असते तर आजवर ती वापरली गेली असती का?? आजही त्याचे तेच रिझल्ट मिळाले असते का जे हजार वर्षापूर्वी मिळत होते?? मग नक्की खरे काय??

-> आयुर्वेदातली औषधे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेली असतात का? संशोधन होणे गरजेचे आहे का? असेही प्रश्न आपल्या मनात असतात.. एक साधा विचार आहे की ज्या आयुर्वेदात जवळपास हजाराहून अधिक वनस्पतींचे वर्णन, त्याचे गुणधर्म, त्याचे आजारातील उपयोग सांगितले गेले आहेत ते हजार वर्षानंतर आजही तसेच सिद्ध होतात.. मग हे गुणधर्म, हे उपयोग प्रयोगाशिवाय झाले असेल का? संशोधनाशिवाय झाले असेल का? काही निश्चित आधार, सिद्धांत असल्याशिवाय एवढ्या रोगांवर एवढे उपाय सांगितले गेले असतील का?? काय विचार असेल ह्या सगळ्यामागे??

->आयुर्वेदात एड्ससाठी, Cancer साठी किंवा स्वाईन फ्लूसारख्या नव्या आजारांसाठी काही उपाय आहे का? हा प्रश्न कुठलाही नवीन आजार मोठ्या प्रमाणावर पसरु लागला की हमखास वैद्यांना विचारला जातोच… “डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे, पण म्हटले की आधी आयुर्वेदात काही उपाय आहे का, अन असतील तर करुन पाहावे”.. अशीही वाक्यं नवीन नाहीत… अशा स्थितीत रुग्ण आधीच गोंधळलेला असतो.. त्यामुळे लास्ट होप म्हणून हा एक समज मनात निर्माण झालेला असतो…

-> इंटरनेट, आयुर्वेदिक उपाय असलेली सामान्य वाचकांसाठी असलेली पुस्तकं वाचून आलेला रुग्ण तर ’पंचकर्म’ ह्याबद्दल प्रश्न विचारणार हे तर माहीतच असते.. ’तुम्ही पण करता का पंचकर्म?’ किंवा मला ते टीव्हीवर दाखवतात ते पंचकर्म करुन घ्यायचेय.. तुमच्याकडे सोय आहे का? किंवा पंचकर्म नाही केले तर माझा आजार लवकर कसा बरा होईल? आमच्या नातेवाईकांनी ह्या आजारात पंचकर्मच करुन घेतले तेव्हा आराम आला.. ही असली वाक्यं अशा थाटात त्या वैद्याला ऐकवली जातात की जसे काही वैद्याला पंचकर्म हा शब्दच माहीत नाहीये अन आपणच तो त्याला सांगतोय.. पण पंचकर्म म्हणजे नेमके काय? केवळ शेक, मालिश अन ती टीव्हीमधे दाखवतात डोक्यावर तेल सोडतात ते म्हणजे पंचकर्म का? अन पंचकर्म आपल्याला मानवेल का? ते आपल्या देहप्रकॄती अन आजाराच्या अवस्थेनुसार योग्य आहे की नाही हे प्रश्न का नाही येत कधी… कारण पंचकर्माची खरी माहिती आपल्याला नसतेच.. जे काही माहीत असते ते कुणाकडून तरी ऐकलेले किंवा नेटवर वा टीव्हीवर पाहिलेले… मग नेमके काय आहे हे पंचकर्म??

-> लहान मुलांसाठी काही टॉनिक आहे का आयुर्वेदात?? किंवा भूक लागेल असे काही औषध?? हल्ली तो / ती काही खातच नाही.. त्यामुळे तब्येत सुधारत नाही.. एखादे टॉनिक घेतल्यावर तब्येत सुधारेल ना त्याची / तिची?? १२ वर्षापर्यंत वयोगटातील मुलांच्या आईवडिलांचे हे प्रश्न नेहमी असतात… पण वयोगटानुसर ह्या प्रश्नांची उत्तरेही वेगळी असतात.. कारण मूळ समस्या वेगळी असते.. पण आयुर्वेदिक टॉनिकमुळे तब्येतीत फरक पडेल असा एक प्रचलित समज दिसतो… हा समज की गैरसमज?

ह्या अन अशा अजून काही समज – गैरसमजांवर काही सविस्तर लिहावे असे वाटले.. आयुर्वेद, त्याचा उद्देश अन त्यातले सत्य समोर आणावं असे वाटले म्हणून ही लेखमाला लिहायला सुरुवात करते आहे.. अजून काही शंका पुढच्या लेखांमधे समाविष्ट होत जातील…

Advertisements
 
5 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 1, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , ,

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ३

(भाषण तिसरे – हिंदूधर्म- पुढचा भाग
आधीचा भाग –
https://medhasakpal.wordpress.com/2009/09/15/११-सप्टेंबर-–-शिकागो-सर्व/)

मी येथे उभा आहे. डोळे मिटून मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करु लागलो – ‘मी ‘मी’ ‘मी’ – तर माझ्यासमोर कोणती बरे कल्पना उभी राहते? हीच की हा देहच मी होय. तर मग, पंचमहाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात, ‘नाही’. मी देहात वसणारा ‘आत्मा’ आहे, मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामधे आहे, परंतु ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळीही मी विद्यमान राहीन, आणि हा देह धारण करण्यापूर्वीही मी होतोच. आत्म कुण्या पदार्थापासून सृष्ट झालेला नाही. कारण ‘सृष्टी’ शब्दाचा अर्थच आहे – भिन्न भिन्न द्रव्यांचा संयोग. आणि असा संयोग म्हटला की केव्हा ना केव्हा तरी त्यांचा वियोग हा ठेवलेलाच. अतएव, आत्मा जर सृष्ट झाला असेल तर तो नाश पावणार हे नक्कीच. म्हणून आत्मा सृष्ट पदार्थ नव्हे. कुणी कुणी जन्मापासूनच सुखात लोळत असतात, सुंदर-सुदृढ शरीर नि उल्हास-उत्साहपूर्ण मन त्यांना जन्मतःच लाभलेले असते, अभाव म्हणून कशाचाच नसतो. तर दुसरे कुणी आजन्म दुःखात पिचत असतात, – कुणाला हात नसतात, कुणाला पायच नसतात, तर कुणी वेडसरच जन्मतात आणि आपल्या भारभूत आयुष्याचा एक एक दिवस कसा तरी कंठीत असतात. हे सर्वच जण जर सृष्ट झाले असतील तर, हे सर्व जर त्या एका न्यायशील आणि दयामय ईश्वरानेच सृष्ट केले असतील तर कुणी सुखी अन कुणी दुःखी असे का? का बरे भगवंताने असा पक्षपात करावा? तुम्ही म्हणाल, “जे या जन्मी दुःख भोगत आहेत ते परजन्मी सुखी होतील.” पण म्हणून काय झाले? दयामयाच्या व न्यायवानाच्या राज्यात का बरे एकजण तरी दुःखी असावा? आणि दुसरे असे की, एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील या विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. उलट ह्यात एखाद्या सर्वशक्तिमान, स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुर व्यवहार मात्र दिसून येतो. करिता, हे स्वीकारणे भाग पडते की, मनुष्य सुखी वा दुःखी जन्मण्यापूर्वी अशी बहुविध कारणे घडली असली पाहिजेत की ज्यायोगे तो परिणामी सुखी किंवा दुःखी झाला आहे. आणि ती कारणे म्हणजे त्याचीच सारी पूर्वकर्मे होत. बरे पण, माणसाच्या शरीराची व मनाची घडण त्याच्या पितृ-पितामहादींच्या शरीरमनानुरुप होत असते असे म्हणून, आनुवांशिकतेच्या आधाराने वरील प्रश्नास समर्पक उत्तर देता यावयाचे नाही काय? हे अगदी स्पष्टच आहे की, जीवनस्रोत जड आणि चैतन्य अशा दोन धारांनी प्रवाहित होत असतो. जड आणि जडाचे विकारच जर आत्मा, मन, बुद्धी वगैरेंचे कार्य करु शकत असतील तर मग आणखी एक स्वतंत्र आत्मा मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु जडातून चैतन्यशक्ती उद्भूत झाली आहे असे सिद्ध करण्यास काहीच प्रमाण नाही. आणि म्हणूनच, एका जड पदार्थापसून सारे काही सृष्ट झाले असे स्वीकार करतो म्हटल्यास, एक मूल चैतन्यच समग्र सृष्टिकार्य चालवीत असते हे स्वीकार करणेही अर्थातच तर्कसंगत, नव्हे सर्वांच्याच दृष्टीने वांछनीयही होऊन बसते. परंतु येथे या विषयाचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही.

मानवशरीरात पितृ-पितामहादींच्या ब-याचशा प्रवृत्ती आनुवांशिकतेने संक्रामित होत असतात ही गोष्ट अर्थातच आपण कधीही नाकबूल करु शकणार नाही. परंतु त्याचबरोबर हेही विसरुन चालणार नाही की, केवळ शारीरिक प्रवृत्तींखेरीज प्रत्येक जीवात्म्याच्या स्वतःच्याही काही विशिष्ट प्रवृत्ती असतात. जो आत्मा ज्या विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असतो, तो ठीक तदनुरुप शरीराचाच आश्रय घेऊन स्वतःच्या प्रवृत्तींनुसार कार्य करण्यास समर्थ होतो. परंतु आत्म्याच्या त्या त्या प्रवृत्तीही परत पूर्वी केलेल्या कुण्या कर्मामुळेच बनत असतात. विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असलेला आत्मा आपल्या प्रवृत्तींना उपयोगी अशाच देहात जन्म घेतो, कारण दोन समान किंवा अनुरुप गोष्टींचाच संयोग होत असतो असा नियम आहे. हे आधुनिक विज्ञानालाही संमत आहे. कारण, विज्ञान म्हणते की प्रवृत्ती सवयीने बनते, व सवय पुनरावृत्तीचे फल होय. म्हणून, कोणत्याही नवजात बालकाच्या प्रवृत्ती त्याने पुनः पुनः आचरलेल्या कर्मांचीच फळे होत. आणि ज्याअर्थी या प्रवृत्ती त्याने या जन्मात कमवणे शक्य नाही त्याअर्थी त्या त्याच्य मागील जन्मांतूनच आलेल्या असल्या पाहिजेत असे म्हणणे भाग पडते.

परंतु, येथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. समजा की पूर्वजन्म आहे. पण मग त्या पूर्वजन्माचे काहीच कसे स्मरण आपल्याला राहू नये? या शंकेचे समाधान करणे अर्थातच विशेष अवघड नाही. सध्या मी इंग्रजीतून बोलत आहे. ती काही माझी मातृभाषा नव्हे. खरे पाहिले असता मातृभाषेतील एक देखील शब्द सध्या माझ्या मनात हजर नाही. पण मी जर आठवण्याचा प्रयत्न करीन तर तत्क्षणी ते माझ्या स्मृतिपटलावर चमकू लागतील. यावरुन हेच दिसून येते की, मनःसागराच्या केवळ पृष्ठभागावरच जे काय हेलकावत राहते त्याचाच फक्त आपल्याला बोध होत असतो. आणि आपली पूर्वार्जित ज्ञानराशी त्याच समुद्राच्या अगाध गर्भात दडलेली असते. प्रयत्नपूर्वक साधनेद्वारा तिला वर आणता येते. आणि मग, याच काय पण पूर्व पूर्व जन्मांची देखील संपूर्ण स्मृती आपल्या अंतःकरणात जागृत होईल.

पूर्वजन्मासंबंधी हे साक्षात प्रमाण होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात ताडून बघून पडताळा मिळाल्यानंतरच कोणत्याही मताची वा वादाची संपूर्ण सिद्धता होत असते. आणि ऋषिगण समस्त जगतासमोर आव्हानपूर्वक घोषणा करीत आहेत की, “अथांग स्मृतिसागराच्या खोल खोल प्रदेशाचा ठाव कशा रीतीने घ्यावा हे गूढ आम्ही उकलले आहे.” त्यांचे अनुकरण करुन यथोचित साधना करा, तुम्हालाही गतजन्मीच्या सा-या घटना आठवतील.

सारांश, आपण आत्मा आहोत असा हिंदूंचा विश्वास आहे. “शस्त्र त्या आत्म्याला छिन्न करु शकत नाही, अग्नी दग्ध करु शकत नाही, जल आर्द्र करु शकत नाही, आणि वायु शुष्क करु शकत नाही !” हा आत्मा एक असे वर्तुळ आहे की ज्याचा परिघ कुठेच नाही परंतु ज्याचे केंद्र प्रत्येक देहामधे अवस्थित आहे. आणि त्या केंद्राचे एका देहातून दुस-या देहात गमन म्हणजेच मृत्यू. त्याचप्रमाणे हा आत्मा जडाच्या नियमांच्याही अधीन नाही. तो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव आहे. परंतु कुण्या अचिंत्य कारणाने कुणास ठाऊक, तो जडाशी बांधला गेला असून स्वतःला जडच समजत असतो. प्रश्न उद्भवतो – हा विशुद्ध, पूर्ण नि विमुक्त आत्मा जडाच्या खोड्यात अडकून त्याचा दास बनावाच का? पूर्ण असूनही आपण अपूर्ण आहोत असे त्याला वाटावेच कसे? आपल्याला असे सांगण्यत येते की या प्रश्नाची यथातथ्य मीमांसा करण्यास असमर्थ म्हणून हिंदू त्या प्रश्नाला साफ बगल देऊन म्हणतात की असला प्रश्नच मुळी संभवत नाही ! कुणी कुणी पंडित आत्मा, जीव आणि त्या दोघोंच्या मधे पूर्णप्राय (जवळजवळ पूर्ण) सत्ता यांचे अस्तित्व कल्पितात व त्यांना नानाविध बोजड शास्त्रीय संज्ञा देऊन वरील प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितात. पण संज्ञांची खैरात म्हणजे काही उत्तर नव्हे, कारण संज्ञांच्या सरबत्तीनंतरही प्रश्न होता तसाच शिल्लक उरतो. जो पूर्ण, त्याची पूर्णता अगदी लेशभरसुद्धा ढळुच कशी शकते? जो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव, त्याच्या त्या स्वभावाचा अणुमात्रदेखील व्यतिक्रम होऊच कसा शकतो? हिंदू या बाबतीत सर्वांपेक्षा अधिक सरळ आणि सत्यवादी आहे. फोल तर्कयुक्तीच्या मदतीने उत्तर देण्याचा तो आवही आणत नाही, अथवा उत्तर दिले म्हणून आपले पांडित्यही मिरवू इच्छित नाही. अगदीही न कचरता वरील प्रश्नाला तो उत्तर देतो – “हे मला माहीत नाही. हा पूर्ण आत्मा आपल्या अपूर्ण कसा मानू लागला आहे, जडाच्या नियमांच्या अधीन कसा समजू लागला अहे, हे मला माहीत नाही.” परंतु वस्तुस्थिती ही अशीच आहे एवढे मात्र निर्विवाद. प्रत्येकजण स्वतःला देहरुपी समजत असतो. हे असे का, आत्मा ह्या देहात का बरे आला आहे, याचे विवरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. ‘ही सारि ईश्वरची इच्छा’ असे म्हणूनही या कूट प्रश्नाचा निकाल लागण्यासारखा नाही. कारण, हिंदू जे म्हणतो की ‘मला माहीत नाही’, त्यापेक्षा ह्या उत्तराने तरी प्रस्तुत रहस्यावर अधिक प्रकाश तो कोणता बरे पडतो?

असो, तर ह्यावरुन हेच निष्पन्न होते की, मनुष्याचा आत्मा अनादी, अमर, पूर्ण आहे आणि एका देहातून दुस-या देहात जाण्याचे नावच मृत्यू होय. आपली वर्तमान अवस्था आपल्या गतजन्मांचे फल असून भावी अवस्था वर्तमान कर्मांचे फल होय. आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत जन्म आणि मृत्यूच्या अखंड फे-यात अविरत भ्रमत असतो.

(ह्या भाषणाचा पुढील भाग “११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ४” मधे टाईप करेन… )

 

टॅग्स: , , , , , , , ,

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठला, तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥

घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥

— गीतकार – ग. दि. माडगुळकर
— गायक – सुधीर फडके

(नितांत सुंदर असे हे गाणे आहे.. कितीही निराश मनस्थिती असली तरी हे गाणे ऐकताना पुन्हा नवा उत्साह, नवी प्रेरणा मिळते.. मन आपोआप शांत होते… हे गाणे सैरभैर मनस्थितीत पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.. एक आठवण म्हणून नेहमी समोर असावे, ह्यासाठी ब्लॉगवरच ठेवतेय..)


 
6 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2009 in खास गाणी

 

टॅग्स: , ,

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – २

भाषण तिसरे – हिंदूधर्म

इतिहासपूर्व काळापासून तहत वर्तमान काळापर्यंत चालत आलेले तीन धर्म आज जगात विद्यमान आहेत. ते म्हणजे, हिंदूधर्म, पारशीधर्म आणि यहुदीधर्म हे होत. यातील प्रत्येकाला मोठमोठ्या आपत्तींमधून जावे लागले आहे. पण तरीसुद्धा लुप्त न होता ते अजूनही जिवंत आहेत यावरुनच सिद्ध होते की, त्या सर्वांचे ठायी महान शक्ती वसत आहे. परंतु, यहुदी धर्म ख्रिस्ती धर्माला आत्मसात करु शकला नाही. उलट तो स्वतःच आपल्या या विश्वविजयी अपत्याकरवी स्वतःच्या जन्मभूमीतून कायमचा हद्दपार केला गेला. आणि मूठभर पारशीच काय ते आपल्या वैभवशाली धर्माची कहाणी सांगावयास आज शिल्लक आहेत. भारतात मात्र संप्रदायांमागून संप्रदाय उदयास आले. वेदप्रणीत धर्माला त्यांनी जणू मूळासकट गदगदा हालवून सोडले. परंतु, समुद्राचे पाणी भूकंपाच्या प्रबल धक्क्याने थोडावेळ मागे हटते खरे, पण नंतर मग सर्वग्रासी महापुराच्या प्रचंड वेगाने परतून समोरील सारा प्रदेश आक्रमून टाकीत असते. त्याचप्रमाणे, या सर्व संप्रदायांचा जनकच असा वेदप्रणीत धर्म प्रथमतः अंमळ मागे सरल्यासारखा होऊन, हा सारा कोलाहल शमताच, त्या त्या संप्रदायाला संपूर्णपणे आत्मसात करीत स्वतःचा विराट देह अधिकाधिक पुष्ट करत आला आहे…

आधुनिक विज्ञानाचे नव्यातले नवे शोध ज्याच्या उच्च तत्वांचे मंद प्रतिध्वनीच वाटतात, त्या सर्वोत्कृष्ट वेदांतापासून तो सामान्य मूर्तिपूजेला व तत्संबद्ध नानाविध पौराणिक कथांपर्यंत सर्वांना, इतकेच काय पण बौद्धधर्माच्या अज्ञेयवादाला आणि जैनांच्या निरीश्वरवादाला देखील हिंदूंच्या धर्मात स्थान आहे..

यावर कुणी विचारील की, मग हे सगळे भिन्न भिन्न व सकृतदर्शनी कमालीचे परस्परविरोधी वाटणारे भाव अशा कोणत्या एका साधारण अधिष्ठानावर अधिष्ठीत आहेत? कोणत्या साधारण केंद्राच्या आश्रयाने ते अवस्थित आहेत? याच प्रश्नाला उत्तर देण्याचा मी आज यथाशक्ती प्रयत्न करणार आहे.

हिंदूंना अपौरुषेय वेदांपासून स्वतःचा धर्म प्राप्त झाला आहे. हे वेद आदिरहित नि अंतरहित आहेत असा त्यांचा विश्वास आहे. एखादे पुस्तक आदि-अंतरहित असते असे म्हटल्याने या श्रोतृसमाजाला हसू येईल खरे. पण, वेद म्हणजे काही विशिष्ट पुस्तके असा वेदाचा अर्थच नाही. भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी ज्या अध्यात्मिक सत्यांचा शोध लावला, त्यांच्या चिरसंचित कोषालाच वेद असे नाव आहे. मानवजातीला ज्ञात होण्यापूर्वीही गुरुत्वाकर्षणाचा नियम आपले कार्य करत होता आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा विसर पडला तरी तो आपले कार्य बजावीत राहीलच. आध्यात्मिक नियमांचेही असेच आहे. एका जीवात्म्याचे इतर जीवात्म्यांशी आणि सर्व जीवात्म्यांचे त्या परमपिता परमात्म्याशी जे सारे दिव्य नि विशुद्ध संबंध आहेत ते सर्व, त्यांचा शोध लागण्यापूर्वी विद्यमान होते आणि अपल्याला त्यांचा विसर पडला तरीही आहेत तसेच राहतील…

या अध्यात्मिक नियमांचा शोध लावणा‌-यांना ’ऋषि’ अशी संज्ञा आहे. सर्वज्ञ आणि पूर्णत्व पावलेल्या विभूती मानून आम्ही त्यांना सन्मान देत असतो. या अतिशय उन्नत ऋषींमधे काही स्त्रिया होत्या हे आजच्या या श्रोतृसमाजाला सांगताना अत्यंत आनंद वाटत आहे.

येथे कुणी असे म्हणू शकतील की, हे सर्व अध्यात्मिक नियम, नियम ह्या दृष्टीने अंतरहित असतील खरे, पण त्यांना आदी किंवा आरंभ असलाच पाहिजे. वेद घोषणा करतात की, सृष्टीला (व म्हणूनच सृष्टीनियमावलीलासुद्धा) आदीही नाही अन अंतही नाही. आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, सृष्टीतील एकूण शक्तीची समष्टी वा गोळाबेरीज नेहमी सारखी असते. असे असूनही जर तुम्ही म्हणाल की, असा एक समय होता ज्यावेळी काहीही नव्हते, तर त्यावर मी विचारतो की मग त्या वेळी ही सर्व शक्ती कुठे होती? कुणी कुणी म्हणतील – अव्यक्त रुपात ती ईश्वरातच सामावलेली होती. परंतु याचा अर्थ, ईश्वर कधी क्रियावान आणि कधी क्रियारहित, म्हणजेच तो विकारशील आहे, असा होतो. विकारशील प्रत्येक वस्तू ही मिश्र पदार्थ असते आणि प्रत्येक मिश्र पदार्थ विनाशशील असतो. म्हणजे ईश्वरसुद्धा विनाशशील ठरेल ! पण हे अर्थातच शक्य नाही. आणि म्हणूनच असा समय कधीही नव्हता की जेव्हा काहीही नव्हते, अर्थात जेव्हा जीवसृष्टी विद्यमान नव्हती. तात्पर्य, सृष्टीला आरंभ नाही, ती अनादी आहे. उपमाच द्यायची झाली तर म्हणता येईल की, स्रष्टा आणि सृष्टी ह्या दोन आदिरहित आणि अंतरहित, एकमेकांना समांतर अशा रेषा आहेत. ईश्वर नित्य-महाशक्तिस्वरुप, सर्वविधाता असून तो प्रलयपयोधीतून ब्रह्मांडभुवनांचे नित्य सृजन करतो, काही काल त्यांचे पालन करतो, आणि फिरुन सारे भंगून टाकतो. हे असेच सतत चालु आहे. हिंदू बालक आपल्या गुरुंसह प्रतिदिन म्हणत असतो – ‘सूर्यचंद्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत’ – अर्थात, विधात्याने पूर्वीप्रमाणेच सूर्य आणि चंद्र निर्माण केलेत. आधुनिक विज्ञानही हेच सांगत आहे…

(contd…)

 

टॅग्स: , , , ,

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – १

swami११ सप्टेंबर १८९३ – शिकागो येथे सुरु झालेल्या सर्व धर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद ह्यांच्या भाषणातील काही भाग स्वामी विवेकानंद ग्रंथावली, संचयन ह्या पुस्तकातून इथे देत आहे…

११ सप्टेंबर १८९३ ला स्वागतास उत्तर असे पहिले भाषण झाले अन त्यानंतर,

१५ सप्टेंबर रोजी – धर्माधर्मातील कलहांचे मूळ

१९ सप्टेंबर रोजी – हिंदूधर्म

२० सप्टेंबर रोजी – दरिद्री मूर्तीपूजक

२६ सप्टेंबर रोजी – बौद्धधर्माचा  हिंदूधर्माशी संबंध

२७ सप्टेंबर रोजी – समारोप

अशी ६ भाषणे झाली.. ह्यापैकी सद्य स्थितीतही अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जाणारे अन मूळ विचारसरणीशी जवळचे असे भाग इथे देत जाईन.. सगळे एकाच दिवशी टाईप करणे शक्य नसल्याने जमतील तसे ३-४ भागात सगळे पोस्ट करत राहीन…

भाषण पहिले – स्वागतास उत्तर

” अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूनो,

…… याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की, “दूरदूरच्या देशांतून आलेले हे प्रतिनिधी, सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच संशय नाही. ” या व्यक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगाताला ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वच मतांना मानणे’ या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो.. अन्यधर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आनी धर्माच्या निराश्रितांना ज्या धर्माने सर्वदा आश्रय दिला आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच धर्माने त्यांना सादर हृदयाशी धरले, हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी धर्माच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे पालन करत आहे, त्याच सनातन धर्मात मी जन्मास आलो आहे.

….. ” रूचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम ।
नृणां एको गम्यः त्वमसि पयसां अर्णव इव ॥ ”
अर्थ –
” भिन्न भिन्न उगमातून निघणारे जलप्रवास ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व पथिक, प्रभो, अंती तुलच येऊन मिळतात.”

…… पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाणून काढली आहे. संस्कृतीचा विध्वसंस करुन त्यांनी कधीकधी राष्टंच्या राष्ट्रं हताश करुन सोडली आहेत.. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता.. पण आता त्यांचीही घटका भरत आली आहे..आणि मला अशी उत्कट आशा वाटते की, या धर्मपरिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणा-या सर्व प्रकारच्या छळाची, आणि एकाच लक्ष्याकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तींतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यूघंटाच ठरेल..

भाषण दुसरे – धर्माधर्मातील कलहांचे मूळ

मी जी गोष्ट तुम्हाला सांगण्याचे योजले आहे, ती या आपापसातल्या कलहांवर खचित प्रकाश पाडील.. ती गोष्ट अशी,

एका विहिरीत एक बेडूक राहत असे. तो तिथे पुष्कळ दिवसांपासून होता. त्या विहिरीतच तो जन्मला आणि तिथेच वाढतही होता.. पण अजूनही तो एक लहानसा बेडूकच होता.. अर्थातच त्या काळी आजकालचा एकही क्रमविकासवादी हजर नसल्याकारणाने, त्या अंधा-या कुपात चिरकाल वास केल्याने त्या बेडकाची दृष्टी गेली होती की नाही हे सांगणारा आपल्याला कुणीही मिळणार नाही. तथापि आपल्या गोष्टीच्या सोयीकरता आपल्याला असे गृहीत धरुनच चालावे लागेल की त्याची दृष्टी अगदी शाबूत होती.. तो दररोज असल्या विलक्षण उत्साहाने त्या विहिरीतील जंतुजीवाणूंचा फन्ना उअडवून तिथले पाणी स्वच्छ ठेवीत असे की ते बघून आमच्या आजच्या जंतुशास्त्राज्ञांनीही मान खाली घालावी ! त्याचा हा क्रम अखंड चालु होता आणि लवकरच तो छान गुटगुटीत पण होऊन गेला.. असो. होता होता काय झाले की एक समुद्राकाठी राहणारा बेडूक त्या विहिरीत येऊन पडला..

” कुठला रे तू राहणारा?” कूपमंडूकाने पृच्छा केली.
“समुद्रात राहत असतो मी, तिथून आलोय.” उत्तर आले.
“समुद्र ! असतो तरी केवढा हा समुद्र? माझ्या ह्या विहिरीएवढा?” असे म्हणून त्या कूपमंडूकाने विहिरीच्या एका काठापासून दुस-या काठापर्यंत एक उडी घेतली.
समुद्रवासी बेडूक त्यावर म्हणाला, “मित्रा, या तुझ्या टीचभर विहिरीची तू समुद्राशी तुलना कशी बरं करु शकतोस?”
हे ऐकताच त्या बेडकाने टुणदिशी आणखी एक उडी मारुन विचारले, “काय ! एवढा मोठा आहे तुझा तो समुद्र?”
“समुद्राबरोबर विहिरीची तुलना ! डोके ठिकाणावर आहे ना दादा तुझे?”
“हं ! हं ! म्हणे समुद्र मोठा !” कूपमंडूक उसळला, “माझ्या या विहिरीपेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही मुळी.. हा लेकाचा लबाड असला पाहिजे. द्या ह्याला हाकलून !”

बंधूंनो, हा असला संकुचित भावच आपल्यातील कलहांचे कारण होय. मी हिंदू आहे. मी माझ्या लहानशा विहिरीत बसलो आहे, आणि तिलाच सारे जग समजत आहे ! ख्रिश्चन आपल्या लहानशा विहिरीत बसला आहे, आणि तिलाच सारे जग मानत आहे. मुसलमानही तद्वतच स्वतःच्या छोट्याशा विहिरीत बसला असून तिलाच सारे जग समजत आहे ! आमच्या या लहानलहान जगांचे परकोट भग्न करण्यासाठी तुम्ही अमेरिकानिवासीयांनी मोठा प्रयत्न केला आहे. तुमच्या या महान उपक्रमाबद्दल मी तुम्हा सर्वांना हार्दिक धन्यवाद देतो.. माझी खात्री आहे की, आज ना उद्या तुमचा हा उद्देश सफल होण्यास भगवान खचित साहाय्य करतील……

( पुढची भाषणे नंतरच्या भागात..)


 

टॅग्स: , , , ,

तर्कतांडव – भावार्थ


tarkatandav


ही कविता २ अर्थाने वाचता येते.. एक, आपल्या नित्य आयुष्यात घडणार्‍या घटनांचा वेध घेऊन तर दुसरा, आपली एका वेगळ्या अज्ञात मार्गावरील वाटचाल.. वेगळ्या म्हणजे, त्या परब्रह्माच्या दिशेने.. हे परब्रह्म म्हणजे आपल्यातलाच चेतन अंश.. अन त्याचा शोध घेण्यासाठीचा प्रवास म्हणजे बाहेरुन आत(स्वतःत) जाणारा.. अंतर्मुख करणारा..

ह्यापैकी मी ह्या दुसर्‍या अर्थाबद्दल अधिक विश्लेषण करेन.. पण सुरुवातीला पहिल्या अर्थाबद्दल थोडक्यात सांगते.. ही अवस्था म्हणजे आपल्या आयुष्यात आलेले असे अनेक प्रसंग जिथे आपली विचार करण्याची क्षमता तोकडी असल्याची जाणीव होते, मति कुंठीत होते. बाहेरुन सजीव हालचाली चालु असल्या तरी आतून एक निर्जीवता जाणवून गेलेली असते.. बाहेर येण्याचे सारे प्रयत्नही थकतात अशी काहीशी स्थिती.. आशेचे ढगही वितळून जातात.. अन मनही त्यासह विरघळते.. त्यातली प्रसन्नता काही काळ त्या आशेच्या ढगासह विरुन जाते.. विचारांचे, तर्कांचे, भावनांचे एक विचित्र तांडव माजते, अन त्यात स्वस्थिती पूर्ण ढवळून निघते, अन हे तर्कतांडव आपल्या शुद्ध विचारांना अशुद्धतेकडे नेते.. कदाचित ही शुद्धतेच्या प्रक्रियेची सुरुवात वा मधली स्थिती असेल.. पण वरवर पहाता असेच चित्र दिसते की पूर्वी स्वच्छ असलेला हा समुद्र आता गढूळला आहे.. कदाचित, हे त्या समुद्राचे तळापासून शुद्ध होणे असेल.. अन असेही असेल की पूर्वी हा समुद्र केवळ वरकरणी शुद्ध असेल अन अंतरंगात गाळ साचवून बसला असेल.. आता तो गाळ बाहेर फेकला जातोय अन त्यामुळे ते तर्कतांडव त्य समुद्राला खवळून टाकतंय..

अशा स्थितीत मग हे काळाचे हिशोबही नकोसे होतात.. असे वाटते की एकतर आहे तीच अवस्था(पूर्वीची) रहावी किंवा नवीन अवस्था तरी लवकर यावी.. पण हे होत नाही अन म्हणूनच अधीच शून्य झालेलं रितं मन अजून रिक्ततेकडे जातं.. महाशून्याकडे जातं….

अन मग जाणवु लागते ते अशा प्रसंगात आपल्या मागे असलेल्या दैवी शक्तीचे अस्तित्व.. त्या परब्रह्माचे अस्तित्व.. अन त्यासमोर ह्या देहाचे संकुचितपण.. ज्यातून बाहेर निघण्याचे ह्या देहाचे, मनाचे सारे प्रयत्न थकले त्याच स्थितीतून त्या दैवी शक्तीने अगदी अलगद बाहेर नेले.. अन अशावेळी हेच तर्कतांडव त्या दैवी शक्तीत, परब्रह्माकडे आपोआप उधळाले जाते….

आता दुसरा अर्थ,

ठप्प होणार्‍या हालचाली,
मख्ख वाटणारे प्रतिबिंब,
सजीवतेकडून निर्जीवतेकडे,
बळावणारे तर्कतांडव!

जेव्हा एक वेगळा प्रवास सुरु होतो त्यावेळची अगदी सुरुवातीची अवस्था.. स्वतःचाच घेतलेला वेध.. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याची तळमळ.. पण ह्या प्रवासाची सुरुवात काहिशी वेगळी, विचित्र असते.. कारण हा प्रवास सर्वस्वी अनोळखी अशा वाटेवरचा, इथे मार्गदर्शक, मार्ग, ध्येय सारे काही तोच.. अन प्रवासी असलेल्याच्या अंतरंगातही तोच.. पण बांधला गेलेला.. अशा ह्या प्रवासाची चाहूल लागली की मग बाह्य हालचाली ठप्प झाल्या की काय असे वाटु लागते.. अन ह्या देहाचे प्रतिबिंब मख्ख वाटते.. कारण बिंबाची ओळख होण्यास सुरुवत झालेली असते.. पण अशावेळी हे देहबुद्धीने माजवलेलं तर्कांचे तांडव पुन्हा आपल्याला ‘सजीवतेकडून’ निर्जीवतेकडे नेऊ लागते.. म्हणजे आपल्याला सगळ्या हालचाली सजीवतेतून होताना जाणवत असतात, पण ही खरेच सजीवता असते का? की आता ह्या प्रवासात जी जाणवतेय ती सजीवता.. पण देहबुद्धी ह्या सजीवतेपासून पुन्हा निर्जीवतेकडे बळेच नेते.. ते त्या तर्कांच्या आधारे.. विचारांच्या आधारे.. स-जीव म्हणजे आपल्यातला चेतन अंशास आपले अस्तित्व.. पण देहबुद्धी ह्या शोधापासूनच परावृत्त करायला जाते…

निथळत विरणारे ढग,
विरघळत जाणारे मन,
सुकाळाकडून दुष्काळाकडे,
बोकाळणारे तर्कतांडव!

मग ह्या शोधप्रवासातल्या काही आशेचे कृष्णमेघ बरसून विरळत जातात.. असे वाटते की ह्या शोधात हे एवढेच संकेत मिळाले? ह्या अल्प संकेतांवर हा लांबचा पल्ला कसा गाठावयचा.. अन त्या आशेच्या, संकेतांच्या विरणार्‍या ढगांबरोबरच मनही विरघळत जाते.. काहीशा निराशेने.. हही त्या देहबुद्धीने मांडलेल्या तर्कांचाच परिणाम.. त्या संकेतांनी आणलेला सुकाळ लक्षात न येता दिसतो तो विराण दुष्काळ.. दिसतो, की दाखवला जातो? हो, दखवला जातो, देहबुद्धीकडून… तसे तर ते संकेताचे मेघही दिसले होतेच ना निथळताना.. पण त्याचे निथळणं पुरेसे नाही ही व्यर्थ जाणीव करुन दिली त्या देहबुद्धीनेच… त्या बोकाळलेल्या तर्कटांनीच…

गढुळणारे महासागर,
खवळणारे भावसागर,
विशुद्धतेकडून अशुद्धतेकडे,
झेपावणारे तर्कतांडव!

ह्या संकेताच्या ढगातून निथळून गेले थेंब अन त्याने साधलेला परिणाम दिसू नये ह्यासाठी बोकाळलेल्या ह्या तर्कांनी आता हा महासागरच गढूळ केला.. आपल्या अंतरंगातला महासागर.. तो आतून ढवळला गेल्यामुळे आता विशुद्धता नष्ट होऊन सगळी अशुद्धता त्यात दिसतेय… पण हे खरेच असे आहे का? की पूर्वी देहबुद्धीत असताना जी घाण तळाशी साचली होती ती ह्यामुळे पृष्ठभागवर येतेय.. कदाचित कायमची निघून जाण्यासाठी… वरवर जरी ह्या तर्कतांडवामुळे असे दिसत असले की आधी विशुद्धता होती अन आता अशुद्धता आलीये तरी आत्मबुद्धीला त्या तर्काची झेप आता माहित झालीये.. त्यामुळे हे तर्कतांडव विशुद्धतेकडून अशुद्धतेकडे झेपावले तरी ही एक मध्यस्थिती आहे.. किंवा तो प्रवास योग्य अर्थाने, योग्य मार्गावर सुरु झाल्याची खूण दर्शवणारी अवस्था..

आकसलेले तीन काळ,
टुकार हिशोबांचे वादळ,
शुन्याकडून महाशुन्याकडे,
चेकाळणारे तर्कतांडव!

आता ती अत्मस्थितीची अवस्था जाणवू लागली आहे, पण अजूनही देहस्थिति / देहबुद्धी पूर्णतः गेलेली नाही.. त्यामुळे राहून राहून असे वाटतेय की एकतर सध्याची ही जाणिवेची अवस्था रहावी किंवा पूर्णतः आत्मस्थितीची अवस्था यावी.. पण हा मधला काळांचा हिशोब नको.. ते टुकार हिशोब करुन काय साध्य आहे? पण अश ह्या मध्यस्थितीत देहबुद्धीचे तांडव मात्र शून्याकडून महाशून्याकडे जातंय.. कारण आता त्या तर्कातला फोलपणा जाणवतोय.. अन त्यामुळे हे चेकाळलेपण… शून्याकडून महाशून्याकडे, म्हणजे, आधीच हे देहबुद्धीचे तर्क, विचार हे त्या आत्मबुद्धीसमोर पोकळ किंवा व्यर्थ.. त्यात त्यांचे अजून चेकाळणं…

सावल्यांचे लहानमोठेपण,
नित्य देहाचे संकुचितपण,
मोहमायेकडून परब्रम्हाकडे,
उधळणारे तर्कतांडव!

पण जेव्हा आत्मस्थिती प्रबळ होते, तेव्हा अशा ह्या विचारांच्या सावल्या त्या आत्मबुद्धीसमोर आपोआप लहान ठरु लागतत.. अन जाणवू लागते देहचे संकुचितपण.. अन मग हेच तर्क मोहमायेकडून (देहबुद्धीकडून) परब्रह्माकडे(आत्मस्थितीकडे) उधळले जातात.. त्या आत्मस्थितीत उधळून लावले जातात..

 

टॅग्स: , ,

अज्ञाताचा वारस – भावार्थ

adnyataachaa vaaras


आपल्यातल्या दुसर्‍या ‘मी’ ची ओळख आपल्याशी होत असतानाची ही अवस्था आहे..

आपल्या आयुष्यात एक रुटीन भाग आपण जगत असतो.. अन अचानक एका अनोख्या संधीमुळे स्वतःतले सुप्त गुण जाणवू लागतात.. किंवा आपण हे असेही आहोत ह्याची जाणीव होते.. आजपर्यंत आपल्याला फक्त तो रुटीन भाग म्हणजेच आपले आयुष्य असे वाटत असते.. अन त्याच वेळी ही नवी संधी त्या दुसर्‍या ‘मी’ ची ओळख करुन देते…

हा दुसरा अनभिज्ञ भाग म्हणजेच हे सुप्त गुण जे एखादे आव्हान पेलताना प्रकटले असतील वा एखादी नवी वाट चोखंदळताना समोर ठाकले असतील.. आपल्यात असूनही आपल्यालाच अनभिज्ञ..

मग अनंताच्या वाळवंटात म्हणजेच त्या संधीत हे सारे गुण-बिंदू उधळले जातात..

रुटीन भागात सार्‍या रेषा केंद्राकडे धाव घेताहेत असे वाटून जाते तर त्याचवेळी ह्या दुसर्‍या अनभिज्ञ जगात ह्याच रेषांचा उगम केंद्रातून होतोय असे वाटते.. (केंद्र- आपण स्वतः).. आपल्यातल्याच कल्पनांचे हे धुमारे त्या रेषांद्वारे होतात..

अन मग त्या अनभिज्ञ दुसर्‍याचा प्रवास किंवा उड्डाण सुरु होते तेव्हा ते पंख दुमडलेलेत हे ही जाणवत नाही. (पक्षी आकाशात उंच भरारी घेत असतो तेव्हा त्याचे पंख दुमडलेले असतात.)

अन मग ह्या अश संधीची वा भरारीची वाट पहाणार्‍या मनाची तडफड ही कुठे जाणवतच नाही.. एवढी ती झेप वा भरारी प्रभावी असते.. भान हरपून फक्त झोकून देणे अन जिद्दीने त्या संधीचे सोने करणे एवढेच कळत असते… ही अशीच अवस्था असते..

अन मग माघारी परतणे नकोसे होते.. फक्त कळस गाठायचा हीच एक अभिलाषा.. आता पंखातले बळ कळल्यामुळे पावलांचे ‘वरदान’ अनावश्यक वाटते.. अन मग हे काटेच अधिक जवळचे वाटू लागतात.. (काटे- ती भरारी घेतानाचे कष्ट, कठीण परिस्थितीशी दिलेला लढा.)

अन आपल्यातल्या हा असा ‘अज्ञात’ दैवी भागच खरा इतिहास घडवत असतो, त्याला लाभलेल्या नैसर्गिक प्रतिभेच्या सामर्थ्याच्या सहज पंखांनी.. अन त्याला शोधायला त्या मानवी भागाला मात्र यानासारख्या कृत्रिम साधनांची गरज भासते..

आपल्यातच असणार्‍या दैवी अन मानवी भागांचे हे सारे वर्णन आहे..

 

टॅग्स: