RSS

Tag Archives: सत्य

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)

नेहमीच ऐकू येणारी वाक्यं म्हणजे, अमुक एका डॉक्टरकडे गेले की काय खाऊ नये ह्याची भली मोठ्ठी लिस्टच मिळते.. काय खायचे हा प्रश्न समोर उभा राहतो ती लिस्ट वाचताना.. नेमके आमच्या आवडीचेच पदार्थ का बंद करतात कुणास ठाऊक..

त्याहीपलीकडे म्हणजे, “एवढी वर्षे तर खाल्लेच ना, मग तेव्हा कुठे त्रास झाला?” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना नाही ना त्रास होत, मग मलाच कसा होईल?” किंवा “थोडेसे खाल्ले तर चालेल की पूर्ण बंद करायचे?”,  “बाहेर कुणाकडे गेले की नाही कसे म्हणणार?”, “आपल्या एकट्यासाठी कुठे वेगळे जेवण बनवायला सांगायचे?”

थोडासा वेगळा भाग म्हणजे, “पण दूधात तर प्रोटीन्स असतात ना.. मग ते का बंद करायचे?”, “मोड आलेली कडधान्ये बंद? पण दुसरे डॉक्टर तर ती रोज सकाळी मूठभर खायला सांगतात..” ही अशीही वाक्यं नवीन नाहीत..

ही सगळी वाक्यं कधी ना कधी ऐकलेली असतातच.. का सांगतात डॉक्टर असली पथ्यं? काय फायदा होतो त्यांचा, तुमचे आवडते पदार्थ बंद करुन? काही विशिष्ट पदार्थच का बंद करायला सांगतात? दूधात, मोड आलेल्या कडधान्यात प्रोटीन्स असतात, पण केवळ तेवढेच पाहणं पुरेसे असते का? प्रोटीन्सचा अन्य स्त्रोत नाही का आपल्या जेवणात? अन डॉक्टरला तुमचा आजार पाहून कळत असेलच ना की प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे… जर प्रोटीन्स मिळतात म्हणून केवळ दूध किंवा मोड आलेली कडधान्यं खाण्यापेक्षा प्रोटीन सप्लीमेंट्स पण मिळतात, त्या घेता येतील की.. म्हणजेच, केवळ प्रोटीन, calcium, carbohydrates अशा पद्धतीने होणारे वर्गिकरण पुरेसे नाही.. अजूनही काही घटक आहेत जे आपणही अनुभवत असतोच.. जसे काही विशिष्ट उसळींनी पोटात gas होणे.. आता प्रोटीनमुळे gas होतो असा कुठेतरी संदर्भ सापडतो का? तरीही gas होतो हे बरेच जणांचे observation असतेच.. कावीळीमधे तूरडाळ पूर्ण बंद असते, मग त्यावेळी का नाही विचार करत की त्यात प्रोटीन्स असतात.. तेव्हा तूरडाळीऐवजी मूगडाळ वापरतो, ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे तूरडाळ पित्त वाढवते, अन पचायला पण जड असते, तर मूगडाळ पचायला हलकी असते, अन पित्त पण कमी करते…  म्हणजेच अजून काही घटक विचारात घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे… पंजाबात मैदा सहज पचतो, तिथली लोकं रोज रोट्या पचवु शकतात.. पण मुंबईत हे रोज शक्य होईल का? म्हणजेच वातावरण, प्रदेश ह्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत… शेतक-याचे जेवण पाहिलेय? भाजी, भाकर, कांदा अन तिखट चटणी.. अन हे खाऊन रोज कष्टाचे काम.. हे असे जेवण रोज आपल्याला पचेल का? व्यायम, कुस्ती खेळणा-या लोकांचा आहार आपण पचवु शकु का? नक्कीच नाही.. म्हणजेच मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे देहप्रकृती, जडणघडण, शारीरिक श्रम, वातावरण, प्रदेश, ऋतु ह्यासारख्या गोष्टी इथे पथ्याचा विचार करतानाही महत्वाच्या ठरतात..

जिथे प्रत्येक आजारात एवढा बारीकसारीक विचार केला जातो, प्रत्येक व्यक्तीचे सखोल परिक्षण केले जाते, ते केवळ कुणाला काहीतरी वाटते म्हणून असेल की शास्त्रीय असेल? जे हजार वर्षापूर्वी सांगितले गेले ते आजही तेवढेच खरे ठरत असेल तर ते अशास्त्रीय कसे? प्रत्येक आहारीय पदार्थांचे जे गुणधर्म, उपाय, अपाय सांगितले गेले ते आजही तंतोतंत खरे ठरत आहेत.. मग ते सिद्ध न करताच ग्रंथांमधे लिहिले गेले असतील का? अन हे १-२ गोष्टी किंवा पदार्थांच्या बाबतीत नाही झालेय तर जवळपास प्रत्येक प्रांतात आढळणा-या प्रत्येक आहारात उपयोगी असलेल्या अन वापरल्या गेलेल्या सगळ्या पदार्थांबद्दल लिहून ठेवलेय.. आयुर्वेद सिद्ध करण्याची गरज आहे म्हणणा-यांनी आज त्यातले हे गुणधर्म पाहण्याची गरज आहे… सिद्ध न होताच प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म तंतोतंत लिहिणे शक्य आहे का? केवळ फायदेच नाही तर त्यापासून होणारे आजारही सांगितलेले आहेत.. कुठल्याही टेक्निकल माणसाने आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन सांगावे की शास्त्राची, नियमांची बैठक नसता randomly काहीतरी वाटले म्हणून कुणीतरी हे सगळे लिहून ठेवले आहे.. शक्य तरी आहे का ही गोष्ट????? प्रयोगाशिवाय जर असले उपाय अन अपाय लिहिले गेले असते तर आज २-३ हजार वर्षानंतर ते सगळे तेवढेच खरे ठरले असते का???? केवळ आत्त्ता विज्ञानाची आधुनिक पद्धत आहे म्हणून पुन्हा संशोधन करायचे?? कशासाठी?? जर रिझल्ट्स येत नसतील तर संशोधनाची गरज योग्य आहे, पण रिझल्ट स्पष्ट दिसून येत असताना पुन्हा संशोधन करुन काय मिळणार?? जुन्या गोष्ट नव्याने सिद्ध करुन काय होणार?? माझा संशोधनाला विरोध नाहीये, तर मला हेच म्हणायचे आहे की संशोधनाशिवाय इतके तर्कशुद्ध विचार, आजही सिद्ध होणारे उपाय हे शक्यच नाही… आयुर्वेदाला संशोधनाची गरज आहे हे विधानच चुकीचे आहे.. नवीन वनस्पतींचा विचार करण्यासाठी संशोधनाची निश्चितच गरज आहे किंवा वनस्पतींचे वर्णन ओळखून ती निश्चित करण्यासाठीही संशोधन आवश्यक आहे..  जेव्हा आधुनिक विज्ञानाचा अंशही अस्तित्वात नव्हता, त्या काळापासून ही औषधे, हे आहारातले घटक वापरले जात आहेत.. अन त्यामुळे कधी कुठला अकारण अपाय झाला नाही.. (संशोधन करुनही kwon side effects असलेल्या antibiotics सारख्या औषधांचे पुन्हा संशोधन झाले पाहिजे.. कालपर्यंत सगळ्यात सेफ असलेल्या अन आज अचानक हाय-रिस्क औषधांच्या यादीत जाऊन बसणा-या औषधांवर संशोधन झाले पाहिजे.. ) हजार वर्षापूर्वी बनवलेला आयुर्वेदिक फॉर्म्युला आजही चुकत नाही, कुठलेही known side effect देत नाही.. अन तरीही आयुर्वेद अशास्त्रीय???? काय लॉजिक आहे ह्या विधानात???

पथ्य म्हणजे नेमके काय? आजारी व्यक्तीनेच पथ्य पाळायची की नॉर्मल व्यक्तीनेही पाळायची? आजार बरा झाल्यावर पथ्य मोडले तर चालते का? पथ्य आयुष्यभर पाळायची की काही काळ? क्वचित कधी पथ्य मोडलं गेलं तर चालेल का?

अनेकदा आपल्या जेवणातल्या काही जास्त प्रमाणात खाल्लेल्या पदार्थांमुळे, किंवा जेवणाच्या चुकीच्या वेळेमुळे, जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे, वरचेवर चरत राहण्याच्या आवडीमुळे, सतत बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे, अजिबात व्यायाम करत नसूनही अनेक जड पदार्थ वारंवार खाल्ल्याने काही आजार उद्भवतात.. डायबेटीससारख्या आजारात तर ह्यातले कितीतरी भाग कारण म्हणून आढळतात.. अन शुगर वाढलेली दिसली की मग पथ्य पाळणं सुरु होते.. तोपर्यंत आपण हवे तसे हवे तेव्हा सगळे खात असतो.. संधिवात ह्या आजाराचेही काही प्रमाणात असेच होते… हे झाले दीर्घकालीन आजार.. पण काही तात्पुरत्या आजार होण्यापूर्वी आपण काय खाल्ले होते हे आठवून पहावे.. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंड पदार्थ खाल्ले की सर्दी, खोकला येतो हे आपल्याला माहीत असते पण तरी ते नेहमी खाल्ले जातात.. अन मग सगळे सायनसला सूज येण्यावर गेले की मग वाफारे, औषधे, बाम अशा गोष्टींना सुरुवात होते.. काही पदार्थ आपल्याला सूट होत नाहीत हे माहित असते, काही पदार्थ आपल्या गरम पडतात हेही माहीत असते.. लोणचे जास्त अन रोज खाल्ले की आपले सांधे सुजतात, दुखतात हे अनेकांचे निरिक्षण असते.. दही खाल्ले की acidity वाढते हे पण बरेच जण स्वतःहून सांगतात.. म्हणजेच, आहारातले काही पदार्थ आपल्या तब्येतीला नाही चालत ह्याची जाणीव शरीर सतत करुन देत असते.. आपण दुर्लक्ष करुन आजार होतो तेव्हा डॉक्टरला ते पदार्थ बंद करावे लागतात..

पथ्य हे २ प्रकारचे असते.. १ सामान्य माणसासाठी जे नियम असतात ते.. अन दुसरे, आजारपणात सांभाळावे लागते ते.. पथ्य केवळ आहारातील पदार्थच नसतात.. ज्याने आराम होतो, फरक पडतो अन उपचाराला मदत होते ते पथ्य.. अन ज्याने अपाय होतो ते कुपथ्य.. आजारी व्यक्तीने पथ्य का पाळायची हे आधी पाहुया, अन मग पुढच्या लेखात सामान्य व्यक्तीने काय काय पथ्यं पाळायची ते सविस्तर लिहीन…

आपल्याला आजार होतो त्याची २ कारणे असतात हे आपण मागच्या भागात पाहिले.. त्या कारणांपैकी बाहेरच्या कारणांमधे आहाराचा, सवयींचा, ऋतुंचा, एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.. आपल्या नेहमीच्या आहारामुळे काही विशिष्ट ऋतुत काही आजार निर्माण झालेला असतो.. किंवा कधी कधी सतत बाहेरचे खावे लागल्याने आजार होतो.. काहीवेळा अचानक काही दिवसांसाठी दुस-या (विरुद्धा हवामान असलेल्या) ठिकाणी जाऊन राहावे लागते, त्यामुळे काही आजार होतात.. अशावेळी औषधे तर आपण घेतोच.. पण आजाराशी लढण्यासाठी आपल्याच शरीरातली उर्जा वापरली जात असते, आधिक अशक्तपणा आलेला असतो.. त्यात औषध त्यांचे काम करत असतात, पण ह्याच्या जोडीला योग्य पथ्य पाळली तर तो आजार निर्माण होण्याचे एक कारण कमी होते.. तसेच ते पदार्थ बंद केल्याने शरीराला त्या आजारातून लवकर बाहेर यायला मदत होते.. उर्जा कमी वापरावी लागते.. एक साधे उदाहरण पाहुया, एखादी जखम झाली असेल, अन विशिष्ट कपड्यांचा वापर करत राहिल्याने ती वारंवार चिघळत असेल, त्यामुळे भरुन यायला खुप दिवस लागत असतील तर आपण त्रास होणारे ते विशिष्ट कपडे वापरणे बंद करतो… तसेच आहाराच्या बाबतीत आहे.. शरीराची कमी झालेली उर्जा भरुन येण्यासाठी, आजार लवकर बरा होण्यासाठी, झालेली झीज भरुन येण्यासाठी आहारातली पथ्यं पाळणं आवश्यक आहे….

ही पथ्यं आजारात तर पाळावीच लागतात, पण आजार बरा झाल्यावरही काही काळ पाळणं आवश्यक आहे.. आजार बरा झाला असला तरी शरीरातली झीज पूर्ण भरुन आलेली नसते, जसे तापातून उठल्यावरही पुढे १-२ दिवस अशक्तपणा असतो.. किंवा कावीळ बरी झाल्यावरही ७-८ दिवस थकवा असतोच.. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून काही काळ पथ्यं पाळणं गरजेचे ठरते.. हे झाले सर्वसामान्य आजारांबाबत.. दीर्घकालीन आजारात काही पथ्यं आयुष्यभर पाळावी लागतात.. संधिवातासारख्या आजारात विशिष्ट ऋतुंमधे पथ्यं पाळावी लागतात.. काही आजारात पूर्ण कडक पथ्य पाळणं अतिशय आवश्यक असते, अन्यथा नको ते उपद्रव निर्माण होऊ शकतात.. विशेषतः त्वचारोग(स्कीन डिसीज), डायबेटीस इत्यादी.. अपथ्य केल्याने उपद्रव (कॉंप्लिकेशन्स) निर्माण होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.. काही जणांना ह्याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून अपथ्यसेवन होत राहते, अन पुढे उपद्रव निर्माण झाले की अकारण औषधोपचारांना दोष दिला जातो… आजार निर्माण करणारे पदार्थ, सवयी तर बंद करणे भाग असते पण आजारात अपायकारक असे अन्य पदार्थही बंद करावे लागतात..

आयुर्वेदात औषधाएवढेच महत्व पथ्याला आहे.. कारण पथ्य पाळल्याने अर्धा आजार बरा होतो असे आढळून येते… पेशंटसनी पथ्यं पाळल्यावर डॉक्टरचा वैयक्तिक फायदा काहीच नसतो.. केवळ पेशंटने लवकर बरे व्हावे, अन्य काही कॉंप्लिकेशन्स उद्भवू नयेत, आजार योग्य वेळेत बरा व्हावा एवढीच माफक अपेक्षा समोर ठेऊन पथ्य पाळण्यावर भर दिला जातो.. पथ्य पाळण्याचा अजून एक फायदा म्हणजे औषध जास्त डोसमध्ये द्यावे लागत नाही.. योग्य डोसमधे काम होऊन जाते, अन कमीत कमी, आवश्यक तेवढ्याच औषधांचा वापर करता येतो.. आजाराचे स्वरुप अन आजारी व्यक्तीची स्थिती ह्यावर प्रत्येकाला पथ्य सुचवलेली असतात.. त्यामुळे सगळ्यांना एकच पथ्य असेल असे नाही.. काही पथ्य हे आजारावर अवलंबून असते, तर काही आजारी व्यक्तीवर.. जसे, तापात हलके अन्न खावे हे सगळ्यांना समान असते.. पण दूध पिऊ नये ही गोष्ट वयपरत्वे ठरवावी लागते, कारण लहान मुलं जी केवळ दूध घेत असतात त्यांना हे पथ्य कसे सांगता येईल? अशावेळी काही वेगळी उपाय योजना करावी लागते, जसे सुंठ घालून उकळलेले दूध किंवा काडेकिराईत घालून दिलेले दूध…

प्रत्येक आजारानुसार पथ्य- अपथ्य ह्यांची माहिती पुढे देत राहीन…

Advertisements
 
7 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 14, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , , ,

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख – १)

आयुर्वेद हा शब्द कुठल्याही ग्रुपच्या, नातेवाईकांच्या गप्पांमधे आला की २ गोष्टी अपोआप सुरु होतात, एक म्हणजे आपल्याला माहीत असलेले मोजके उपाय दुस-याला सुचवायला सुरुवात करणे अन दुसरे म्हणजे आपल्याला असलेली अर्धवट माहिती छातीठोकपणे इतरांना पटवून देणे, तीही नातेवाईक वा मित्रांच्या संदर्भात ऐकलेली.. पण खरेच कधी जाणून नाही घ्यावेसं वाटत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? तुळस, ओवा, हिंग असले घरगुती उपचार म्हणजेच फक्त आयुर्वेद का? की सगळे उपाय करुन झाल्यावर राहिलेला उपाय म्हणजे आयुर्वेद? ज्याप्रमाणे रुढी अन शास्त्र ह्यामधे अनेकांचा गोंधळ असतो, तसेच काहीसे हल्ली आयुर्वेदाच्या बाबतीत दिसून येते..

आयुर्वेद म्हणजे नक्की  काय ह्याबद्दल आजवर जेवढे काही समजलंय तेवढे ह्या लेखमालेतून इथे ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.. आयुर्वेदाबद्दलचे समज, गैरसमज अन सत्य हे सारे स्पष्ट करणे हा ह्या लेखमालेचा उद्देश.. पहिल्या लेखात आपल्या मनात असलेले समज काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. उत्तरे हळुहळु पुढच्या लेखांमधे येतील.. सामान्यतः जे काही प्रचलित समज लोकांमधे आढळतात त्याचा उल्लेख पुढे केला आहे.. ह्यासारखे अजूनही काही समज आढळतात, त्यांचा उल्लेख पुढच्या लेखांमधे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने येईल.. ह्यापैकी प्रत्येक समज वा गैरसमज अन सत्य ह्याचे सविस्तर विश्लेषण ह्यानंतरच्या लेखांमधे असेल, प्रत्येक समजासाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे.. इथे सर्वसामान्य विषयांची माडणी असेल, कुणाचेही वैयक्तिक अनुभव वा विशिष्ट रुग्णांचे अनुभव ह्याचा समावेश नाही..

-> कधी कधी आपल्या नकळत आपण कुणालातरी काहीतरी उपाय सुचवतो.. मला माहीत आहे ते औषध, मागे पण कितीतरी जणांना दिले आहे ना ते अशा भ्रमात अनेकदा आपण फुकटचे सल्ले देत असतो.. अन ते अपाय ठरु शकते ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते.. पण जेव्हा एखाद्याला अपाय होतो, आपल्याला प्रश्न पडतो की मागच्यावेळी एकाला हाच उपाय सांगितला होता तर त्याला आराम पडला, मग आता का असे उलट झाले?  अन अपाय झालाच तर त्याचे खापर अकारण आयुर्वेदाच्या माथी… पण खरेच हे असे का झाले ह्याचा शोध घेता येणं शक्य आहे..

-> आजवर कायम ऐकलेली गोष्ट म्हणजे “आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात”.. हा प्रचार कुणी अन का सुरु केला हे शोधत बसणे शक्य नाही.. पण हे खरे आहे का?? तसाच अजून एक ठाम असलेला समज, “आयुर्वेदिक औषधाला एक्स्पायरी नसते”.. कधी एखादी संहिता (आयुर्वेदाची) उघडून पाहिली आहे का? त्यात काय सांगितले आहे नेमके ते शोधले का?? आत्ता उल्लेख केलेले हे दोन समज की गैरसमज??

-> Practice करत असताना सामान्यपणे जे प्रश्न रुग्ण नेहमी विचारतात त्यापैकी एक म्हणजे, “तुम्हाला नाडी परिक्षा येते का?” जणू केवळ नाडी परिक्षा येणं म्हणजे आयुर्वेदात पारंगत अशी काहीशी कल्पना असते…

-> आयुर्वेद म्हणजे केवळ औषधी उपचार अशीही समजूत असते.. आयुर्वेदात सर्जरी पण आहे का? हा प्रश्न तर हमखास ठरलेला… पण आयुर्वेदात शस्त्रचिकित्सेचे वर्णन आहे, नव्हे एक पूर्ण संहिता ’शस्त्रचिकित्सा’ ह्या वैद्यकीय अंगाची माहिती देते हे ऐकून आपल्या निश्चित नवल वाटले असेल…

-> आयुर्वेदात क्वीक रिझल्ट्स नसतात हा तितकाच ठाम समज(?).. आयुर्वेदिक औषधं उशीरा काम करतात पण कायम स्वरुपी आराम मिळतो असली वाक्यं सर्रास ऐकू येत असतात.. पण त्रिभुवनकीर्तीसारखी गोळी १-२ तासात ताप पूर्ण कमी करते हे कधी पाहिले जात नाही..

-> वैद्याकडे गेले की काय खायचे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच यादी मोठी.. सगळे आवडते पदार्थच बंद करायला सांगितले आहेत.. काय सुख मिळते हे करुन कुणास ठाऊक.. ह्यासारखी वाक्यं पण घरोघरी ऐकू येतात..

-> भस्म – हा तर गाजलेला विषय.. इतर देशात भस्मांचे विषारी परिणाम सांगितले गेले अन त्यामुळे आपणही ते खरे मानून भस्म असलेली औषधं म्हणजे विषच असा समज करुन घेतला.. भस्म असलेली औषधं घेतल्याने किडनी फेल होते असेही आपण वाचतो.. पण हे किती खरे आहे? अन कुठल्या भस्मामुळे हे होते? शुद्ध की अशुद्ध? भस्मं खरेच विषारी असतात का? त्याचे एवढे दुष्परिणाम असते तर आजवर ती वापरली गेली असती का?? आजही त्याचे तेच रिझल्ट मिळाले असते का जे हजार वर्षापूर्वी मिळत होते?? मग नक्की खरे काय??

-> आयुर्वेदातली औषधे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेली असतात का? संशोधन होणे गरजेचे आहे का? असेही प्रश्न आपल्या मनात असतात.. एक साधा विचार आहे की ज्या आयुर्वेदात जवळपास हजाराहून अधिक वनस्पतींचे वर्णन, त्याचे गुणधर्म, त्याचे आजारातील उपयोग सांगितले गेले आहेत ते हजार वर्षानंतर आजही तसेच सिद्ध होतात.. मग हे गुणधर्म, हे उपयोग प्रयोगाशिवाय झाले असेल का? संशोधनाशिवाय झाले असेल का? काही निश्चित आधार, सिद्धांत असल्याशिवाय एवढ्या रोगांवर एवढे उपाय सांगितले गेले असतील का?? काय विचार असेल ह्या सगळ्यामागे??

->आयुर्वेदात एड्ससाठी, Cancer साठी किंवा स्वाईन फ्लूसारख्या नव्या आजारांसाठी काही उपाय आहे का? हा प्रश्न कुठलाही नवीन आजार मोठ्या प्रमाणावर पसरु लागला की हमखास वैद्यांना विचारला जातोच… “डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे, पण म्हटले की आधी आयुर्वेदात काही उपाय आहे का, अन असतील तर करुन पाहावे”.. अशीही वाक्यं नवीन नाहीत… अशा स्थितीत रुग्ण आधीच गोंधळलेला असतो.. त्यामुळे लास्ट होप म्हणून हा एक समज मनात निर्माण झालेला असतो…

-> इंटरनेट, आयुर्वेदिक उपाय असलेली सामान्य वाचकांसाठी असलेली पुस्तकं वाचून आलेला रुग्ण तर ’पंचकर्म’ ह्याबद्दल प्रश्न विचारणार हे तर माहीतच असते.. ’तुम्ही पण करता का पंचकर्म?’ किंवा मला ते टीव्हीवर दाखवतात ते पंचकर्म करुन घ्यायचेय.. तुमच्याकडे सोय आहे का? किंवा पंचकर्म नाही केले तर माझा आजार लवकर कसा बरा होईल? आमच्या नातेवाईकांनी ह्या आजारात पंचकर्मच करुन घेतले तेव्हा आराम आला.. ही असली वाक्यं अशा थाटात त्या वैद्याला ऐकवली जातात की जसे काही वैद्याला पंचकर्म हा शब्दच माहीत नाहीये अन आपणच तो त्याला सांगतोय.. पण पंचकर्म म्हणजे नेमके काय? केवळ शेक, मालिश अन ती टीव्हीमधे दाखवतात डोक्यावर तेल सोडतात ते म्हणजे पंचकर्म का? अन पंचकर्म आपल्याला मानवेल का? ते आपल्या देहप्रकॄती अन आजाराच्या अवस्थेनुसार योग्य आहे की नाही हे प्रश्न का नाही येत कधी… कारण पंचकर्माची खरी माहिती आपल्याला नसतेच.. जे काही माहीत असते ते कुणाकडून तरी ऐकलेले किंवा नेटवर वा टीव्हीवर पाहिलेले… मग नेमके काय आहे हे पंचकर्म??

-> लहान मुलांसाठी काही टॉनिक आहे का आयुर्वेदात?? किंवा भूक लागेल असे काही औषध?? हल्ली तो / ती काही खातच नाही.. त्यामुळे तब्येत सुधारत नाही.. एखादे टॉनिक घेतल्यावर तब्येत सुधारेल ना त्याची / तिची?? १२ वर्षापर्यंत वयोगटातील मुलांच्या आईवडिलांचे हे प्रश्न नेहमी असतात… पण वयोगटानुसर ह्या प्रश्नांची उत्तरेही वेगळी असतात.. कारण मूळ समस्या वेगळी असते.. पण आयुर्वेदिक टॉनिकमुळे तब्येतीत फरक पडेल असा एक प्रचलित समज दिसतो… हा समज की गैरसमज?

ह्या अन अशा अजून काही समज – गैरसमजांवर काही सविस्तर लिहावे असे वाटले.. आयुर्वेद, त्याचा उद्देश अन त्यातले सत्य समोर आणावं असे वाटले म्हणून ही लेखमाला लिहायला सुरुवात करते आहे.. अजून काही शंका पुढच्या लेखांमधे समाविष्ट होत जातील…

 
5 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 1, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , ,