RSS

Daily Archives: ऑगस्ट 1, 2009

कर्ण खरा कोण होता??

दाजी पणशीकर ह्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक. काही कादंब‍र्‍या, ऐतिहासिक पुस्तके ह्यामधे महाभारतात वर्णित कर्णापेक्षा एक वेगळाच कर्ण समोर आणला जातो.. एक अनावश्यक उदात्तीकरण अन सहानुभूती ह्यामुळे कर्णाचे खरे स्वरुप कुठेतरी मागे पडले.. अन फक्त कुंतीच्या एक निर्णयामुळे सूतपुत्र म्हणून ओळखल्या जाणा‌‌‍र्‍या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्यानंतर अंगावरील कवचकुंडल उदारपणे देणारा कर्ण समोर आणला जातो, मग मित्रत्वाच्या अन उपकाराच्या ओझ्याने दबलेला अन म्हणून दुष्टकर्मात सहभागी झालेला कर्ण अशा पुस्तकातून समोर येतो.. द्रौपदीच्या उपहासात्मक हसण्याने अपमानित झालेला कर्णही आपल्याला दिसतो, अर्जुनाएवढाच कर्णही पराक्रमी होता असेही सांगितले जाते.. पण मग प्रश्न येतो की हे एवढेच त्याचे खरे स्वरुप आहे?? कर्णाचे हे रुप खरे की महाभारतात व्यासांनी वर्णन केलेलं रुप खरे?? ह्या प्रश्नाचे उत्तर ’कर्ण खरा कोण होता’ ह्या पुस्तकात ब-याच अंशी सापडते..

कर्ण सूतपुत्र म्हणून प्रथम जगासमोर आला असला तरी तो अनाथ म्हणून नक्कीच मोठा झाला नव्हता.. एका चांगल्या घरात, सुसंस्कारित मात्यापित्यांचे निरतिशय प्रेम मिळुनच त्याचे संगोपन झाले. कर्ण जर उदार होता तर मग कवचकुंडल दान म्हणून देताना बदल्यात इंद्राकडून प्रभावी अस्त्र का मागून घेतले? दान हे निरिच्छ भावनेने केले जाते.. इथे आपल्याला असे वाचायला मिळते की इंद्राने प्रसन्न होऊन वर दिला.. पण खरेच हे असेच झाले का? की मूळ इतिहास काही वेगळा आहे?

कर्ण खरेच अर्जुनाहून पराक्रमी होता का? मग एकदाही त्याने अर्जुनाचा पराभव कसा केला नाही? प्रत्येक युद्धात अर्जुनाकडून त्याचा पराभवच झाला आहे.. एका प्रसंगात तर अनेक फुशारक्या मारुन पराभावाने लज्जीत होऊन रणांगणातून पसार व्हावं लागले..

कर्ण खरेच जर सद्गुणांचा पुतळा होता तर स्वतः भगवान कृष्णांनी अर्जुनाचा पक्ष का घेतला? कृष्णाने गीतेतही हे स्पष्ट केलेय की धर्माच्या रक्षणासाठी अन साधूंच्या परित्राणासाठी मी अवतार घेतो. मग असे असताना कर्णाचा पक्ष का नाकारला.. इथेच स्पष्ट होते की कर्णाचे जे रुप समोर आणले जातेय ते अनावश्यक उदात्तीकरण आहे.. खरा इतिहास खुप वेगळा आहे..

खरेतर प्रत्येकाने आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे.. ह्या पुस्तकातील सगळे भाग इथे देणं शक्य नाही.. पण काही भाग जमेल तसे इथे देत जाईन.. इतिहासाचा माग घेण्यात मोलाची मदत होते ह्या पुस्तकाने..

पुस्तकातील काही भाग –

१) महर्षी व्यासांनी महाभारतात कोणत्याही व्यक्तिरेखेचे वर्णन करताना कोणत्याही स्त्री-पुरुषाचे गुणदोष लपविलेले नाहीत. कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कोणाचा अधिक्षेपही केलेला नाही. धर्मज्ञ धर्मराजाचे चित्र रंगवताना व्यासांची प्रतिमा धर्मराजाचे द्यूताचे व्यसन किती विलक्षण आहे हेही निर्विकारपणे दाखविते आणि धर्मपरायण असलेला भीम दुःशासन मेल्यावरही त्याचं रक्त किती आसुरी आनंदानं प्राशन करतो हेही अलिप्तपणे दर्शवते. म्हणजेच व्यास चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतात. परंतु वाईटाला मात्र ते ’चांगलं’ म्हणत नाहीत.

………………………………

त्याचा(कर्णाचा) थोरपणा अव्यक्तच का राहिला? कालिदास, भारवी, माघ, हर्ष, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि अगदी अलिकडचे महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक, न्या. रानडे, भांडारकर इत्यादींपैकी एकाही प्रज्ञावंताला हा आधुनिकांचा कर्ण का आकृष्ट करु शकला नाही? कर्णाचा पक्ष घ्यावा असं यापैकी एकाही पुरुषोत्तमाला का वाटलं नाही.. यापैकी एकही महात्मा कर्णप्रेमाने हर्षविव्हल का होऊ शकला नाही?

२) कौरव पांडवांबरोबर वृष्णि व अंधक कुळातील युवक, अनेक देशांचे राजकुमार व अधिरथ सूताचा मुलगा कर्ण हे द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आलेले आहेत(आदिपर्व अ.१३२).

पांडवांविषयी दुर्योधनाला द्वेष वाटणे रक्तदोषामुळे स्वाभाविक आहे हे आपण समजू शकतो; परंतु कर्णाला विद्यार्थीदशेत आपलेच सहकारी असलेले पांडव, विषेशतः अर्जुन, यांचा मत्सर करण्याचे काहीच कारण संभवत नाही. परंतु कर्णाच्या जन्मगत मत्सरी वृत्तीला दुर्योधनाच्या दुष्टवृत्तीचे खतपाणी मिळताच कर्णही सर्वच पांडवांचा आत्यंतिक मत्सर करु लागला आहे.

दुर्योधनं समाश्रित्य सोSवमन्यत पांडवान् || ” (आदिपर्व अ. १३२)

वास्तविक विद्यार्थीदशेत अर्जुनाचा व पांडवांचा कर्णाने द्वेष करावा असा कोणताही कटू प्रसंग या शैक्षणिक काळात या विद्यार्थ्यांत निर्माण झालेला नाही. इतर विद्यार्थ्यांना या द्रोणाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला तसाच तो कर्णालाही मिळालेला आहे.(आदिपर्व अ. १३२ श्लोक ११) कर्णाला केवळ प्रवेशच मिळाला पण द्रोणांनी त्याला धनुर्विद्या दिलीच नाही असाही पुरावा नाही. परंतु विद्याग्रहणाच्या बाबतीत व विद्यादात्या सद्गुरुंविषयी जेवढी आस्था आणि निष्ठा अर्जुनाने वेळोवेळी संपादन केली होती तेवढी आस्था व निष्ठा कर्णाने या काळात कधीच दाखवलेली नाही.

३) धनुर्वेदाच्या पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांना असे विचारले की ’मुलांनो माझ्याजवळून शस्त्र व अस्त्र विद्यांचे शिक्षण घेतल्यानंतर, माझ्या अंतःकरणातील एक इच्छा पूर्ण कराल ना?’ या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सर्व उपस्थित विद्यार्थी चूप बसून राहिले. त्या विद्यार्थीवर्गात असलेल्या अर्जुनानेच फक्त आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक आश्वासन दिले.(आदि.१३२)

….. त्याचा अनुल्लेख करावा इतका तो यःकश्चित वा सामान्य धनुर्धर नव्हता. अकारण तो अर्जुनाशी स्पर्धा करत असल्यामुळे त्यानेही धनुर्विद्येत लक्ष केंद्रित केले असणारच. धनुर्विद्येत अशाधारण नैपुण्य मिळावे या शुद्ध व सात्विक भूमिकेतून दिवसा व रात्रीच्या अंधारातही निष्ठेने व सातत्याने अभ्यास करणारा अर्जुन व मत्सरग्रस्त भूमिकेतून अर्जुनापेक्षा य विद्येत श्रेष्ठ ठरावे म्हणून जळफळून धनुर्विद्येचा अभ्यास करणारा कर्ण या दोन परस्परांविरुद्ध अशा वेगळ्या भूमिका आहेत. एकाचे अधिष्ठान आहे निष्ठा व नम्रता, तर दुस-याचे अधिष्ठान आहे द्वेष, असूया, स्पर्धा! 

४) दुष्कृत्यात भागिदारी

कौरव-पांडवांमध्ये भीम हा अत्यंत बलशाली म्हणून प्रसिद्ध होता. सहाजिकच दुर्योधन भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे त्याचा मनोमन द्वेष करु लागला. सरळ सामना करुन भीमाचा काटा काढण्याचे सामर्थ्य एकट्या दुर्योधनातच काय पण शंभर कौरवातही नव्हते. त्यामुळे कोणत्याही वाममार्गाने, क्रूरकर्म करुन भीमाला ठार मारण्याचे मनसुबे दुर्योधन रचु लागला. त्यातून भीमाला जहरी सापांचा दंश करणे, तो बेशुद्ध असताना त्याचे हातपाय बांधून त्याला डोहात बुडविणे, त्याला अन्नातून कालकूटासारखे प्राणघातक विष खायला घालणे असले दुष्ट हिंसाचार भीमाचा प्राण घेण्यासाठी दुर्योधनाने भीमावर केलेले आहेत. आणि त्या दुष्कृत्यात दुर्योधनाला दुःशासन, शकुनी यांच्यासह कर्णानेही साहाय्य केल्याचा महाभारताने पुरावा दिला आहे.

 

एवं दुर्योधनः कर्णः शकुनिश्चापि सौबलः।

अनेकैरभ्युपायेस्तां जिघांसन्ति स्म पांडवान्॥ (आदि. अ. १२९)

मोह, ऐश्वर्य आणि लोभबुद्धी यामुळे दुर्योधनाची बुद्धी विकृत झाली व तो पांडवांना पाण्यात पाहू लागला. दुर्योधनाच्या या विकृतीमागे दुष्ट धृतराष्ट्राची अंतःप्रेरणा जशी होती, तशी राज्यलोभाची दूरदृष्टीही होती. त्यामुळे पांडवांविषयीच्या दुर्योधनाच्या द्वेषबुद्धीला काही कारण तरी संभवते परंतु कर्णाच्या पांडवद्वेषाला तसे कोणतेच सबळ कारण महाभारतात सापडत नाही. निदान शस्त्रास्त्रकौशल्य प्रदर्शनात कर्णाने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देईपर्यंत तरी, पांडवांचे व कर्णाचे भांडण वा कलह झाल्याची नोंद महाभारतात नाही किंवा पांडवांचा कर्णाने मनापासून विद्वेष करावा असा कोणताही अपराध पांडवांनी केलेला नाही.तरीही अकारण द्वेष करणारा कर्ण विद्यार्थीदशेपासूनच, दुर्योधनाच्या नादी लागून, पांडवांचाही शत्रू म्हणून विख्यात झाला आहे.

 
 

गुरुपौर्णिमा – एक स्मरणांजली

आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा..

ह्यदिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी, अनेक घटना अन अनेक पूजनीय व्यक्तींचे स्मरण होते..

आयुष्याच्या अनेक वळणांवर प्रवास सुरु असताना कधी अचानक एखादी व्यक्ती मोलाचा सल्ला देऊन जाते, तर कधी वाचलेली एखादी ओळ, एखादे वचन मार्ग दाखवून जाते.. कधी लहान मुलाकडून निघालेले एखादे बोबडे बोल काही नवे सुचवून जातात, तर कधी आज्जीचा सल्ला हवाहवासा वाटतो..

लहानपणी आईकडून को-या पाटीवर काढलेला श्रीगणेशा आठवतो, तर कधी वडिलांनी काढून दिलेली सरस्वतीची प्रतिमा आठवते.. आजोबांनी शिकवलेली स्तोत्रंही अचानक कुठल्याशा निवांत वेळी स्मरुन जातात..

लहानपणी शिकलेली रामरक्षा, मारुतीस्तोत्र, अथर्वशीर्ष…. अगदी साधेच आठवायचं तर शुभंकरोति….. कधी रोज सकाळ संध्याकाळ ही स्तोत्रं कानावर पडतात म्हणून सहज पाठ झालेली तर कधी आईने देवासमोर बसवून पाठ करुन घेतलेली..

तेव्हा कधी त्यांचे महत्व नाही लक्षात यायचे.. वय अन अक्कल दोन्हीने लहान ना.. पण आता हरेक प्रसंगात जाणवते ह्या स्तोत्रांचे बळ.. त्यांचे आपल्या आयुष्यातले महत्व… त्या शब्दांचे सामर्थ्य….

मग हळुहळू शाळा, कॉलेज.. हे टप्पे आयुष्यात येतात, अन मग गुरु म्हणजे काय ह्याचा अजून एक पैलु उलगडत जातो.. कधी गैरहजर राहिले तर मायेने चौकशी करणारे शिक्षक नजरेसमोर येतात.. तर कधी आपल्या क्षुल्लक चुकीमुळे एखादा मार्क कमी पडला म्हणून हलकेच दटावून जाणारे शिक्षक आठवतात…

कॉलेजमधून बाहेर निघालो की ख-या अर्थाने जगणं सुरु होते.. तोपर्यंत होत असते ती उबदार सावलीतील रोपट्याची वाढ.. उन्हाचे चटके सहसा न जाणवलेली..

पण त्या उबदार सावलीतून बाहेरही जायचे असते, बाहेरचे जग स्वतः अनुभवायचे असते.. कुठल्याही खांद्यांशिवाय झेप घ्यायची असते.. कुणाच्याही सल्ल्याशिवाय अनेक निर्णय घेण्याची खुमखुमी असते… अन अशाच वळणांवर अनेक जुन्या नव्या गोष्टी, घटना आपल्या गुरु होतात.. कधी एखादी चूक नवा आयुष्यभराचा अनुभव देऊन जाते, तर कधी स्वतःच्या हिमतीने पूर्ण केलेला प्रोजेक्ट नवी हिम्मत देऊन जातो…

ह्या टप्प्यावर कधी कधी नकळत अशा व्यक्ती भेटतात ज्या आपले अवघे आयुष्यच बदलवून जातात.. कधी त्यांचे सामाजिक काम भारुन जाते, तर कधी त्यांच्या भाषणाने प्रभावित व्हायला होते.. कधी कुणाचे पुस्तक आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते..

 
तर कधी आपल्याही नकळत कुणाचे केवळ व्यक्तिमत्वच आपल्या जहाजाला दिशा देऊन जाते… अन मग ते जहाज कितीही वारा आला तरी डगमगत नाही.. कुठल्याही लाटेने फेकले जात नाही.. आयुष्याच्या समुद्रात तसेच तग धरुन उभे तर रहातेच पण त्यातूनही पुढे वाटचाल करुन अंतिम ध्येय गाठते..

जेव्हा यशाचे शिखर सर होते तेव्हा अशा घटना नेहमीच आठवतात असे नाही.. कितीतरी खांदे आपल्या यशाच्या निर्मितीसाठी राबलेले असतात.. त्यांची जाणीव होतेच असे नाही.. पण अपयशाच्या वेळी किंवा संकटांच्या वेळी अशा व्यक्तींचे सल्ले, अशा व्यक्तींचे आचरण हमखास आठवते.. त्या स्तोत्रातली एखादी ओळ बळ देऊन जाते.. पुस्तकातले एखादे वाक्य एक नवी उभारी देते… अन त्यातूनच पुन्हा यशाकडे, ध्येयाकडे नव्या जोमाने वाटचाल सुरु होते..

 
दुःखाचे प्रसंग आपल्या दीर्घकाळ स्मरणात रहातात, पण त्या प्रसंगातून सहज सोडवणारे अनेक अनामिक हात नाही आठवत नंतर.. त्या जगन्नियंत्याने आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला सोडवणारी माणसं नाही आठवत.. एवढेच काय पण आपण आपल्या नित्यकर्मात एवढे अडकून जातो की खुद्द त्या परमेश्वराचेही कालांतराने विस्मरणच होते… पण अशाच वेळी ह्या सर्वांच्या अस्तित्वाची जाणीव कायम जपली गेली पाहिजे.. आपल्या आयुष्याचा सेतू उभारण्यात ते दगड पेलणारे जसे लक्षात राहिले पाहिजेत तसेच, त्यात खारीचा वाटा उचलणारेही आठवले पाहिजे.. अन त्या सेतूसाठी लागणारे साहित्य पुरवणारा, चार हात मदतीला देणारा, अन योग्य ती निर्मिती घडवणारा, त्या निर्मितीची जाणीव देणारा सद्गुरु तर नित्य स्मरणात असावा… त्याच्या कृपेशिवाय ह्यापैकी एकही गोष्ट केवळ अशक्य…
 
ह्या सगळ्यात ज्याचे नेहमी विस्मरण होते, तो म्हणजे निसर्ग.. ह्याच्याकडून तर आपण शिकावे तेवढे कमी.. सजीव चरांपासून ते निर्जीव धरेपर्यंत प्रत्येक घटक आपला गुरुच… आपल्यातला हरेक सद्गुण निसर्गाकडून घेता येतो, जोपासता येतो..
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा गुरुंचे, सद्गुरुंचे स्मरण होणंही तेवढेच आवश्यक..
( ७ जुलै २००९)