RSS

आयोडाईज्ड मीठाचा वापर टाळा…

प्रत्येक वेळी एक नवे फॅड आपल्या देशात येते अन आपण सुद्धा त्यामागे डोळे बंद करुन धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती सध्या ‘आयोडाईज्ड मीठ’ ह्या नव्या फॅड मुळे झाली आहे. सध्या सगळ्याच कंपन्यांनी ‘आयोडाईज्ड मीठ‘ बनवायला अन खपवायला सुरुवात केली आहे. पण खपते ती प्रत्येक गोष्ट आपण वापरायलाच हवी असा काही नियम नाही ना. ज्यांना खरोखरीच गरज आहे त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने आयोडाईज्ड मीठ खावे किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडीनचे प्रमाण थोडे वाढवून घ्यावे. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणे खरेच आवश्यक आहे का?

आपल्यापैकी कुणी थायरॉईड प्रोफाईल म्हणजे T3, T4, TSH ही टेस्ट केली असेल तर त्या रिपोर्टच्या खाली एक ओळ वाचली असेल, ती म्हणजे, excess intake of iodine may lead to high TSH किंवा drugs that increases TSH values : iodine. म्हणजे बहुतांशी लॅबसुद्धा हे मान्य करतात की आयोडीनचा वापार मर्यादित असायला हवा.

आज हायपोथायरॉईड (थायरॉईड ह्या अंतःस्त्रावी ग्रंथीचे काम कमी होणे) ह्या आजाराने ग्रस्त असे कितीतरी पेशंट्स पाहण्यात येत आहेत. दिवसाआड किमान १-२ पेशंट्स मधे ह्या आजाराची किंवा ह्यातल्या काही लक्षणांची सुरुवात दिसतेच. 

 • वजन अकारण आणी आवस्तव वाढणे, 
 • लवकर थकवा येणे, 
 • कुठल्याही कामात निरुत्साह वाटणे, 
 • अंगावर सूज येणे (हात, पाय, चेहरा यावर जास्त करुन), सांधेदुखी, 
 • त्वचा सुरकुतणे-कोरडी होणे, 
 • नखे चपटी अन खडबडीत होणे,
 • केस रुक्ष (कोरडे) होणे, जास्त प्रमाणात गळायला लागणे, लवकर पिकायल लागणे, 
 • पोट साफ़ न होणे(कॉन्स्टिपेशन), 
 • स्नायुंमधून पेटके येणे (क्रॅंप्स),  
 • कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे.
 • डिप्रेशन, 
 • स्त्रियांमधे मासिक पाळीच्या तक्रारी 

ह्यासारखी लक्षणे हायपोथायरॉईड ह्या आजारात दिसतात. सबक्लिनिकल हायपोथायरॉईड म्हणजे ज्यात लक्षणे दिसू लागतात पण रक्तात TSH, T3, T4 हे normal असतात. किंवा काही काळाने TSH वाढलेले आढळते.

ज्यांचे रिपोर्ट्स सुरुवातीला नॉर्मल त्यांना इतर डॉक्टरांनी थकव्यासाठी केवळ टॉनिक किंवा अंगावर सूज असेल तर ती कमी कराणारी औषधे दिलेली असतात. पण मूळ आजार त्यामुळे बरा होतच नाही. अन पेशंटलाही म्हणावा तितका फरक वाटत नाही. अशा पेशंटस मधे रिपोर्ट्स नॉर्मल असतानाही जर हायपोथायरॉईड ह्या आजाराची लक्षणे ६०-७० % दिसत असतील (सबक्लिनिकल हायपोथायरॉईड), तर त्या अनुषंगाने औषधं सुरु केल्यावर लगेच फरक दिसून येतो. शिवाय ‘आयोडाईज्ड मीठाचा’ वापर बंद केल्यावरही लक्षणे झपाट्याने कमी होतात व कमी कालावधीतच औषधे बंद करता येतात.

आपल्या रोजच्या आहारात आयोडीनची गरज 70-150mcg/day एवढी असते. केवळ १ ग्रॅम ‘आयोडाईज्ड मीठात’ आयोडीनचे प्रमाण 77mcg एवढे असते. 

शाकाहारी लोकांच्या आहारात ही गरज दूध, तसेच सालासकट उकडलेला बटाटा, मूळा, गाजर, लसूण, कांदे, वांगी ह्यासारख्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते. तर मांसाहारी लोकांना सी-फूड, अंडी,  पण त्यापलिकडे हे आयोडीन मीठातूनही घेण्याची गरज कधी जाणवू शकते, जेव्हा आयोडीनची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागतात तेव्हाच. मग उगीच ह्या ‘आयोडाईज्ड मीठाचे’ सेवन करून अकारण हापोथायरॉईड का ओढवून घ्यायचा. 

मागणी तसा पुरवठा हे तत्व जर सगळीकडे दिसत असेल तर, आपण आपली मागणी बदलायला काय हरकत आहे? आपण साध्या मीठाची किंवा सी-सॉल्टची, मागणी का करु नये? किंवा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या सैंधव ह्या प्रकाराचा वापर जेवणातला वापर का वाढवू नये? सैंधव (उपासाचे  मीठ)/ rock salt हे इतर दिवशीही वापरले तर त्याने नुकसान तर काहीच नाही उलट ब्लडप्रेशर सारखे इतर आजारही नियंत्रित राहतील. सैंधव हे इतर मीठासारखे गरम (उष्ण) नसून स्वभावतःच थंड(शीत) आहे. त्यामुळे शरीरात वात, पित्त व कफ तिन्हींचा समतोल हे मीठ राखते. डोळ्यांसाठीही विशेष लाभदायी असे हे मीठ आहे. शिवाय ह्यात आवश्यक असणारी अन्य मिनरल्स पण आहेत. अनेक औषधी गुणांनी युक्त हे मीठ सर्वांनीच रोजच्या जेवणात वापरायला काहीच हरकत नाही कारण लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मानवणारे असे हे मीठ आहे.

 
2 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 3, 2012 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , , , ,

वात आणि कफ (article in महाराष्ट्र टाइम्स 5 Nov 2011)

हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू हा डॉक्टरांच्या व्यस्त असण्याचा काळ. कारण साथीचे आजार, उष्णतेचे विकार या काळात अधिक प्रमाणात फैलावतात. पण लगोलग येणारा हिवाळा अन त्यातील पहिला ऋतू हेमंत हा अतिशय आरोग्यदायी आणि उत्साही, त्यामुळे बहुतांश लोकांना मानवणाराच ठरतो. मात्र या काळात कफ तसेच वात वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.

…………

>> हिवाळ्याचे फायदे

शरीरातील उष्णतेचे विकार, वाढलेले पित्त कमी होते.

नैसर्गिकरित्या शरीराला सर्वाधिक बळ मिळते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते.

पचायला जड असणारे पदार्थही सहज पचतात कारण इतर ऋतूंच्या तुलनेत अग्नि प्रखर होऊन भूक वाढलेली असते.

मात्र पचायला जड असणारे स्निग्ध आणि शरीराच्या पोषणासाठी अयोग्य असे पदार्थ खाल्ले तर शरीरात वातदोष वाढू शकतो. वात, पित्त, कफ हे शब्द नेहमी नकारात्मक भावनेने ऐकायला मिळतात, मात्र शरीरातील सर्व गती (हृदय, फुप्फुस, अन्नसेवन, पचन, मलविसर्जन, रसरक्ताभिसरण स्नायुंची कामे) या वातदोषाने संतुलित राखल्या जातात.

तसेच शुद्ध स्वरुपातील कफदोष शरीराचे पोषण करणे, शरीराचे बळ, स्थिरता, सांध्यातील स्निग्धता टिकवणे यासारखी अनेक महत्त्वाची कामे करतो.

या ऋतूत होणारे आजार

>> थंडीमुळे, ऋतू बदलाने- सर्दी, खोकला, सांधे दुखणे, जखडणे इत्यादी.
>> आधीपासून असलेला दमा, संधीवात, जुनी सर्दी, आमवात, न्युमोनिया इत्यादी आजारांचे वेग व लक्षणांची तीव्रता कफवाताने वाढते.
>> योग्य आहार, विहार, व्यायाम न केल्याने, स्निग्धता कमी होऊन वातदोष वाढून मलबद्धता, पायांना भेगा पडणे, त्वचा, केस कोरडे होणे, कोंडा, केस दुभंगणे, तुटणे, गळणे, सांधे कुरकुरणे…

योग्य आहार, व्यायाम कुठला?

काय खाऊ नये

>> कोरडे पदार्थ, तुरट-तिखट, कडू पदार्थ (वातासाठी अयोग्य) शीतपेय, सरबत इ. (कफ-वात होतो)
>> डबाबंद फळे (कफाचा त्रास)
>> मोड आलेली कडधान्ये जास्त खाऊ नयेत. वात वाढतो.

काय खावे?

>> तांदूळ, गहू (दोन्ही नवीन- नवीन धान्य जड असले तरी ते या ऋतूत पचले जाते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.), कुळीथ, उडीद, तूर, तीळ, अळीव, शेंगदाणे
>> कडधान्य, लसूण वा गूळ घालून केलेल्या उसळी (प्रमाणात),
>> मूग, मटकी, उडीद यांचे घावन, डोसे, सुंठ, जिरे, हिंग, हळद इ. घालून शिजवून केलेले वरण
>> ऋतुनुसार मिळणारी व मानवणारी सर्व ताजी फळे
>> फळभाज्या जास्त प्रमाणात व नियमित खाव्यात
>> गरम पाणी, दूध (हळद घालून), ताक, तूप, मध (गरम पाण्यासोबत किंवा गरम करून घेऊ नये), उसाचा रस, तेल इत्यादी
>> सुका मेवा- अंजीर, काळ्या मनुका, बदाम, खजूर, काजू, पिस्ते, अक्रोड, चारोळ्या, जर्दाळू, खारिक यापैकी दोन तीन पदार्थ कमी प्रमाणात
>> तिळापासून बनवलेले गोड पदार्थ, ओले खोबरे. यामुळे त्वचा व केसांचा कोरडेपणा कमी होतो.

” स्निग्ध पदार्थांविषयी (तेल, तूप इ.) हल्ली लोकांमध्ये भीती पसरवली जाते की या पदार्थांनी कोलेस्टेरॉल, फॅट्स (चरबी) वाढते. पण हा गैरसमज आहे. तेलात किंवा तूपात तळलेल्या पदार्थांनी चरबी वाढते. पण जेवताना भातात घातलेले चमचाभर तूप, पोळीला लावलेले तेल सांध्यांच्या, हाडांच्या बळकटीसाठी, आतड्यातील कोरडेपणा कमी करून मलबद्धता नष्ट करायला आवश्यकच असते. “
………

काय करावे

>> तीळ तेलाने पूर्ण अंगाला मालिश करून गरम पाण्याने आंघोळ.
>> कफ झाल्याने चरबी वाढू शकते. ते टाळण्यासाठी स्थूल व्यक्तींनी उटणे लावून शेक घेणे.
>> तुळशीच्या पानांचा रस किंवा आल्याचा रस हे कफासाठी चांगले. मात्र ते सर्वांसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे ते घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
>> केसांना, पायांना तेल तसेच चेहऱ्याला, ओठांना लोणी किंवा तूप लावणे
>> घरात अगरू, राळ, गुग्गुळ, कडुलिंबाची सुकी पाने, ओवा, बाळंतशोपा यांचा धूप जाळणे. घरातील वातावरण उबदार होते तसेच जंतूंचा नाश होतो.
>> चालणे, धावणे, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, दोरीच्या उड्या यापैकी वयानुसार योग्य तो व्यायाम करणे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10614549.cms

 
 

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५)

स्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्‍या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील? ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे? हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का? औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील? मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत..

आयुर्वेदात प्रत्येक आजाराचे नाव स्पष्टपणे आले नसले तरी आजारात जी लक्षणे आढळतात व शरीरात जे बदल घडतात त्यावरुन pathogenesis म्हणजे शरीरात आजार नेमका कसा निर्माण झाला, शरीरातील रचना, अवयव व त्यांच्या क्रिया ह्यात कोणते बदल झाले त्याचा ठोकताळा मांडता येतो. त्यावरुन त्या आजाराच्या लक्षणांचा अन त्या लक्षणांमागील कारणस्वरुप असलेल्या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. आयुर्वेदात ताप म्हणजे ज्वराचे प्रकार वर्णन केलेले आहेत. स्वाईन फ्ल्यु, चिकुनगुनिया ह्या सारख्या आजारात आढळणारी अन्य लक्षणे विचारात घेऊन आयुर्वेदात सांगितलेल्या तापाच्या वर्गिकरणानुसार योग्य तो प्रकार शोधता येतो. अन त्यानुसार चिकित्सा केली जाते.. अगदी मलेरिया, टायफॉईड अशा आजारांवरही आयुर्वेदिक औषधे योग्य उपाय ठरत आहेत.. चिकुनगुनिया ह्या आजारात रास्नासप्तक काढा, महारास्नादी काढा ह्यासारखे काढे वैद्यांच्या सल्ल्यानुसार आजार बरा झाल्यवरही ज्या रुग्णांनी नियमित घेतले त्या रुग्णांमधे त्या आजाराचे सांधेदुखीसारखे कुठलेही उपद्रव complications नंतर शिल्लक नव्हते..

आयुर्वेदिक औषधांनी स्वाईन फ्ल्यु बरा होऊ शकतो का ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.. रोगाचे निदान उशिरा झाले अथवा अन्य उपद्रव शरीरात दिसण्यास सुरुवात झाली असेल, अन्य औषधांमुळे काही complications झाली असतील तर त्या स्थितीत औषधोपचाराचा किती फायदा होईल हे प्रत्येक रुग्ण व त्याच्यात आढळणारी complications ह्यावर अवलंबून आहे. निदान उशिरा झाले तर आत्ययिक चिकित्सा म्हणजे emergency management मिळूनही अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो. म्हणून कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे, इतरांनी सुचवलेले उपाय वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेत राहणे हेही त्रासदायक ठरु शकते. स्वाईनफ्ल्युचे त्वरीत निदान करुन घेऊन आयुर्वेदिक औषधे चालू केली तर पूर्ण आराम नक्कीच येऊ शकतो. आजाराला आयुर्वेदात काय म्हणतात हे शोधून स्वतः उपाय करत बसण्यापेक्षा वैद्याकडून योग्य निदान करुन घेऊन त्वरीत उपचार घेणे हेच लाभदायक. वृत्तपत्रातून स्वाईन फ्ल्युची लागण दूर ठेवण्यासंदर्भात अनेक मार्गदर्शक असे आयुर्वेदिक सल्ले येत असतात.. त्यापैकी आपल्याला कोणते उपयुक्त ठरु शकतील ह्याची माहिती आपल्या वैद्याशी संपर्क साधून करुन घेणे हे योग्य.

सध्या अनेक साथीचे रोग पसरत आहेत.. त्यापैकीही बर्‍याच आजारांवर आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरतात.. जसे, गोवर, कांजिण्या, मलेरिया, टायफॉईड, डोळे येणे, कॉलरा, इत्यादी. आपल्या परिसरात ज्या साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असेल अथवा ज्या साथींचे रोग गेल्या काही वर्षात आपल्या परिसरात सातत्याने आढळत आहेत त्याबद्दलची आयुर्वेदिक उपचारांची वा प्रतिबंधक उपायांची माहिती आपल्या वैद्यांकडून करुन घेणे आवश्यक आहे.. जसे, डोळे येणे ही साथ पसरत असेल तर रोज सकाळी त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुणे हा एक चांगला प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. त्रिफळा चूर्ण विकत मिळते ते १ चमचा घेऊन वाटीभर पाण्यात भिजत ठेवायचे रात्रभर. सकाळी स्वच्छ सुती वस्त्राने ते पाणी न हलवता गाळून घ्यायचे अन त्याने डोळे धुवायचे. चूर्ण मात्र खात्रीशीर दुकानातून घ्यावे. तुळस, धणे, जिरे, काळी मिरी, पिंपळी, ओवा, बेलफळ, सुंठ अशी काही औषधे वैद्यकीय सल्ल्याने घरी नेहमी ठेवावीत.

आजार होऊ नयेत म्हणून ज्या गोष्टींचे नियमित पालन करायचे त्या म्हणजे आपला आहार, झोप, दिनचर्या, ऋतुनुसार आवश्यक ते बदल अन पथ्य सांभाळणे म्हणजेच ऋतुचर्या…

आहार :  शक्यतो घरचे जेवणच रोज घ्यावे. रस्त्यावरील पदार्थ कटाक्षाने टाळावे. घरच्या जेवणात रात्री फुलके, भाकरी ह्यांचा समावेश असावा. पावसाळ्यात कडधान्ये शक्यतो कमी प्रमाणात खावी, अपवाद मूग. पालेभाज्या पण स्वच्छ, निवडलेल्या असाव्या. फळभाज्या दुधी, कोबी, फ्लॉवर, तोंडली, पडवळ, दोडके, भेंडी ह्यासारख्या नियमित घ्याव्या. आंबलेले पदार्थ, दही, मांसाहार विशेषतः मासे पूर्ण बंद करावे. आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे.

तसेच, सकाळी रिकाम्या पोटी, रात्री झोपताना जास्त पाणी पिऊ नये.. उगीच ठरवून सतत पाणी पीत राहणे हेही टाळावे.. शरीराला पाण्याची आवश्यकता आहे ह्याची जाणीव तहान लागल्यावर शरीर करुन देत असतेच, असे असताना अतिरिक्त व अनावश्यक प्रमाणात पाणी का प्यावे?? शरीर म्हणजे काही ‘ड्रेनेज सिस्टिम‘ नव्हे, वरुन पाणी प्यायले की सगळ्या सिस्टीम्स स्वच्छ अन मळ शरीराबाहेर.. प्यायलेले पाणीही शरीराला आधी पचवावेच लागते. मग त्यातील आवश्याक भाग शरीरात काम करतो. उगाच जास्त पाणी पिऊन अंगावर, पायावर सूज येऊ शकते तसेच असलेली सूज वाढूही शकते..

झोप : रात्री  ६ ते ८ तास शंत, तणावरहीत झोप आवश्यक असते. पावसाळ्यात दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावे. रात्रीही जेवल्यानंतर लगेच झोपु नये.

ही सगळी काळजी ऑक्टोबर महिना संपेपर्यंत घेणे आवश्यक आहे.

ह्याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे आपला परिसर नेहमीच स्वच्छ राहील ह्याबाबत पुरेसे दक्ष असणे. घराबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे..

 

टॅग्स: , , , ,

” Healthier Monsoon Wealthier Monsoon “

First 2 to 3 weeks of monsoon is transitional phase between hot, dry, sweaty summer and watery, humid rainy monsoon, thus it becomes more crucial period as it witnesses complete environmental change.

During summer human body’s natural tendency is to dehydrate or excrete the watery content more in the form of sweat. With the arrival of monsoon total scenario changes as the humidity in the atmosphere rises. So excess water intake may causes new diseases like common cold, jaundice, diarrhoea, dysentery, worms and worsens the chronic diseases like eczema (a type of skin disease), sinusitis(the inflamed sinuses), gastric ulcers/gastritis.  

As you all know humid atmosphere helps the microorganisms rapid growth. Same is the condition with our body. Any of the infection(new or old) can get aggravated during this period. 

To increase or maintain the immunity of our body we should consider following precautionary measures.

Do’s

 • The water should be boiled for 15 min compulsorily.
 • Honey 1tsp + a glass of plain water (at room temperature) – This is very good combination to avoid the cough and cold and sinusitis. Once in a day or can be practiced throughout the day.
 • Make use of Laung, bay leaves (Tamal patra), cinnamon(dalchini), cardamom(ilayachi), black pepper(miri) along with tea to avoid common cold, cough, irritation in throat, viral fever or sinusitis immediate after getting wet in the rain. (But persons suffering from gastric pain, acidity or gastric ulcers are advised to take only elayachi).
 • Increase the intake of haldi (turmeric) in daily diet course. Prefered to be taken with cup of warm milk.
 • Eat 3–4 tulsi leaves early in the morning.
 • Always prefer the fresh homemade food items.
 • Regular exercise/yoga will also increase your immunity.
 • Take utmost care in case of wound, ulcer or skin disease. Always keep them dry.
 • Vegetable soup, Spinach (palak), Tomato soup, Tomato + Beat + carrot soup, chiken soup, paya soup – can be a part of diet.

Don’t 

 • Never eat curd in dinner or before bed time. It may aggravate cold, cough or even gastric ulcers.
 • Avoid milk shakes or fruit ice-creams as milk + fruits is a bad combination.
 • Avoid excess intake of oily and sour things as it may cause the acidity.
 • Avoid junk or packed food.
 • Avoid all cold and frozen food items.
 • Avoid wet clothes for longer duration especially socks or inner garments as they may cause or aggravate the skin problems like eczema.
 • Children (< 12 yrs) are advised to avoid road-side food as it may cause the worm problem, dysentery or diarrhoea (loose motions).
 •  Do not sleep immediately after meal. It may induce complaints like indigestion, acidity, gastric pain or delays regular hunger pattern.
 • Avoid continuous use of air-conditioning system (A/C).
 • Avoid water at bed time, early in the morning at empty stomach and immediately after meals as it may cause cold, cough, sinusitis.
 • Avoid swimming immediately after meals.
 • Avoid water intake half an hour before and after swimming.
 • Avoid sleep after lunch.
 • Reduce the intake of fruit juices. Avoid fruits or fruit juices at night.
 • Reduce the intake of coffee as it increases urination.
 • Fish (in any form) – to be avoided as it aggravates skin disease, sinusitis.

These are few primary measure to be taken during monsoon. Continue your regular medication along with this in chronic cases. And if any of the chronic symptoms gets aggravated during monsoon, consult your physician.

As they say ‘Health is Wealth’, let’s follow these simple instructions and make this monsoon healthier and wealthier.

Dr. Medha Sakpal
(Tapasya Clinic,
Louiswadi, Thane W)

 

टॅग्स:

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)

नेहमीच ऐकू येणारी वाक्यं म्हणजे, अमुक एका डॉक्टरकडे गेले की काय खाऊ नये ह्याची भली मोठ्ठी लिस्टच मिळते.. काय खायचे हा प्रश्न समोर उभा राहतो ती लिस्ट वाचताना.. नेमके आमच्या आवडीचेच पदार्थ का बंद करतात कुणास ठाऊक..

त्याहीपलीकडे म्हणजे, “एवढी वर्षे तर खाल्लेच ना, मग तेव्हा कुठे त्रास झाला?” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना नाही ना त्रास होत, मग मलाच कसा होईल?” किंवा “थोडेसे खाल्ले तर चालेल की पूर्ण बंद करायचे?”,  “बाहेर कुणाकडे गेले की नाही कसे म्हणणार?”, “आपल्या एकट्यासाठी कुठे वेगळे जेवण बनवायला सांगायचे?”

थोडासा वेगळा भाग म्हणजे, “पण दूधात तर प्रोटीन्स असतात ना.. मग ते का बंद करायचे?”, “मोड आलेली कडधान्ये बंद? पण दुसरे डॉक्टर तर ती रोज सकाळी मूठभर खायला सांगतात..” ही अशीही वाक्यं नवीन नाहीत..

ही सगळी वाक्यं कधी ना कधी ऐकलेली असतातच.. का सांगतात डॉक्टर असली पथ्यं? काय फायदा होतो त्यांचा, तुमचे आवडते पदार्थ बंद करुन? काही विशिष्ट पदार्थच का बंद करायला सांगतात? दूधात, मोड आलेल्या कडधान्यात प्रोटीन्स असतात, पण केवळ तेवढेच पाहणं पुरेसे असते का? प्रोटीन्सचा अन्य स्त्रोत नाही का आपल्या जेवणात? अन डॉक्टरला तुमचा आजार पाहून कळत असेलच ना की प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे… जर प्रोटीन्स मिळतात म्हणून केवळ दूध किंवा मोड आलेली कडधान्यं खाण्यापेक्षा प्रोटीन सप्लीमेंट्स पण मिळतात, त्या घेता येतील की.. म्हणजेच, केवळ प्रोटीन, calcium, carbohydrates अशा पद्धतीने होणारे वर्गिकरण पुरेसे नाही.. अजूनही काही घटक आहेत जे आपणही अनुभवत असतोच.. जसे काही विशिष्ट उसळींनी पोटात gas होणे.. आता प्रोटीनमुळे gas होतो असा कुठेतरी संदर्भ सापडतो का? तरीही gas होतो हे बरेच जणांचे observation असतेच.. कावीळीमधे तूरडाळ पूर्ण बंद असते, मग त्यावेळी का नाही विचार करत की त्यात प्रोटीन्स असतात.. तेव्हा तूरडाळीऐवजी मूगडाळ वापरतो, ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे तूरडाळ पित्त वाढवते, अन पचायला पण जड असते, तर मूगडाळ पचायला हलकी असते, अन पित्त पण कमी करते…  म्हणजेच अजून काही घटक विचारात घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे… पंजाबात मैदा सहज पचतो, तिथली लोकं रोज रोट्या पचवु शकतात.. पण मुंबईत हे रोज शक्य होईल का? म्हणजेच वातावरण, प्रदेश ह्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत… शेतक-याचे जेवण पाहिलेय? भाजी, भाकर, कांदा अन तिखट चटणी.. अन हे खाऊन रोज कष्टाचे काम.. हे असे जेवण रोज आपल्याला पचेल का? व्यायम, कुस्ती खेळणा-या लोकांचा आहार आपण पचवु शकु का? नक्कीच नाही.. म्हणजेच मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे देहप्रकृती, जडणघडण, शारीरिक श्रम, वातावरण, प्रदेश, ऋतु ह्यासारख्या गोष्टी इथे पथ्याचा विचार करतानाही महत्वाच्या ठरतात..

जिथे प्रत्येक आजारात एवढा बारीकसारीक विचार केला जातो, प्रत्येक व्यक्तीचे सखोल परिक्षण केले जाते, ते केवळ कुणाला काहीतरी वाटते म्हणून असेल की शास्त्रीय असेल? जे हजार वर्षापूर्वी सांगितले गेले ते आजही तेवढेच खरे ठरत असेल तर ते अशास्त्रीय कसे? प्रत्येक आहारीय पदार्थांचे जे गुणधर्म, उपाय, अपाय सांगितले गेले ते आजही तंतोतंत खरे ठरत आहेत.. मग ते सिद्ध न करताच ग्रंथांमधे लिहिले गेले असतील का? अन हे १-२ गोष्टी किंवा पदार्थांच्या बाबतीत नाही झालेय तर जवळपास प्रत्येक प्रांतात आढळणा-या प्रत्येक आहारात उपयोगी असलेल्या अन वापरल्या गेलेल्या सगळ्या पदार्थांबद्दल लिहून ठेवलेय.. आयुर्वेद सिद्ध करण्याची गरज आहे म्हणणा-यांनी आज त्यातले हे गुणधर्म पाहण्याची गरज आहे… सिद्ध न होताच प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म तंतोतंत लिहिणे शक्य आहे का? केवळ फायदेच नाही तर त्यापासून होणारे आजारही सांगितलेले आहेत.. कुठल्याही टेक्निकल माणसाने आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन सांगावे की शास्त्राची, नियमांची बैठक नसता randomly काहीतरी वाटले म्हणून कुणीतरी हे सगळे लिहून ठेवले आहे.. शक्य तरी आहे का ही गोष्ट????? प्रयोगाशिवाय जर असले उपाय अन अपाय लिहिले गेले असते तर आज २-३ हजार वर्षानंतर ते सगळे तेवढेच खरे ठरले असते का???? केवळ आत्त्ता विज्ञानाची आधुनिक पद्धत आहे म्हणून पुन्हा संशोधन करायचे?? कशासाठी?? जर रिझल्ट्स येत नसतील तर संशोधनाची गरज योग्य आहे, पण रिझल्ट स्पष्ट दिसून येत असताना पुन्हा संशोधन करुन काय मिळणार?? जुन्या गोष्ट नव्याने सिद्ध करुन काय होणार?? माझा संशोधनाला विरोध नाहीये, तर मला हेच म्हणायचे आहे की संशोधनाशिवाय इतके तर्कशुद्ध विचार, आजही सिद्ध होणारे उपाय हे शक्यच नाही… आयुर्वेदाला संशोधनाची गरज आहे हे विधानच चुकीचे आहे.. नवीन वनस्पतींचा विचार करण्यासाठी संशोधनाची निश्चितच गरज आहे किंवा वनस्पतींचे वर्णन ओळखून ती निश्चित करण्यासाठीही संशोधन आवश्यक आहे..  जेव्हा आधुनिक विज्ञानाचा अंशही अस्तित्वात नव्हता, त्या काळापासून ही औषधे, हे आहारातले घटक वापरले जात आहेत.. अन त्यामुळे कधी कुठला अकारण अपाय झाला नाही.. (संशोधन करुनही kwon side effects असलेल्या antibiotics सारख्या औषधांचे पुन्हा संशोधन झाले पाहिजे.. कालपर्यंत सगळ्यात सेफ असलेल्या अन आज अचानक हाय-रिस्क औषधांच्या यादीत जाऊन बसणा-या औषधांवर संशोधन झाले पाहिजे.. ) हजार वर्षापूर्वी बनवलेला आयुर्वेदिक फॉर्म्युला आजही चुकत नाही, कुठलेही known side effect देत नाही.. अन तरीही आयुर्वेद अशास्त्रीय???? काय लॉजिक आहे ह्या विधानात???

पथ्य म्हणजे नेमके काय? आजारी व्यक्तीनेच पथ्य पाळायची की नॉर्मल व्यक्तीनेही पाळायची? आजार बरा झाल्यावर पथ्य मोडले तर चालते का? पथ्य आयुष्यभर पाळायची की काही काळ? क्वचित कधी पथ्य मोडलं गेलं तर चालेल का?

अनेकदा आपल्या जेवणातल्या काही जास्त प्रमाणात खाल्लेल्या पदार्थांमुळे, किंवा जेवणाच्या चुकीच्या वेळेमुळे, जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे, वरचेवर चरत राहण्याच्या आवडीमुळे, सतत बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे, अजिबात व्यायाम करत नसूनही अनेक जड पदार्थ वारंवार खाल्ल्याने काही आजार उद्भवतात.. डायबेटीससारख्या आजारात तर ह्यातले कितीतरी भाग कारण म्हणून आढळतात.. अन शुगर वाढलेली दिसली की मग पथ्य पाळणं सुरु होते.. तोपर्यंत आपण हवे तसे हवे तेव्हा सगळे खात असतो.. संधिवात ह्या आजाराचेही काही प्रमाणात असेच होते… हे झाले दीर्घकालीन आजार.. पण काही तात्पुरत्या आजार होण्यापूर्वी आपण काय खाल्ले होते हे आठवून पहावे.. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंड पदार्थ खाल्ले की सर्दी, खोकला येतो हे आपल्याला माहीत असते पण तरी ते नेहमी खाल्ले जातात.. अन मग सगळे सायनसला सूज येण्यावर गेले की मग वाफारे, औषधे, बाम अशा गोष्टींना सुरुवात होते.. काही पदार्थ आपल्याला सूट होत नाहीत हे माहित असते, काही पदार्थ आपल्या गरम पडतात हेही माहीत असते.. लोणचे जास्त अन रोज खाल्ले की आपले सांधे सुजतात, दुखतात हे अनेकांचे निरिक्षण असते.. दही खाल्ले की acidity वाढते हे पण बरेच जण स्वतःहून सांगतात.. म्हणजेच, आहारातले काही पदार्थ आपल्या तब्येतीला नाही चालत ह्याची जाणीव शरीर सतत करुन देत असते.. आपण दुर्लक्ष करुन आजार होतो तेव्हा डॉक्टरला ते पदार्थ बंद करावे लागतात..

पथ्य हे २ प्रकारचे असते.. १ सामान्य माणसासाठी जे नियम असतात ते.. अन दुसरे, आजारपणात सांभाळावे लागते ते.. पथ्य केवळ आहारातील पदार्थच नसतात.. ज्याने आराम होतो, फरक पडतो अन उपचाराला मदत होते ते पथ्य.. अन ज्याने अपाय होतो ते कुपथ्य.. आजारी व्यक्तीने पथ्य का पाळायची हे आधी पाहुया, अन मग पुढच्या लेखात सामान्य व्यक्तीने काय काय पथ्यं पाळायची ते सविस्तर लिहीन…

आपल्याला आजार होतो त्याची २ कारणे असतात हे आपण मागच्या भागात पाहिले.. त्या कारणांपैकी बाहेरच्या कारणांमधे आहाराचा, सवयींचा, ऋतुंचा, एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.. आपल्या नेहमीच्या आहारामुळे काही विशिष्ट ऋतुत काही आजार निर्माण झालेला असतो.. किंवा कधी कधी सतत बाहेरचे खावे लागल्याने आजार होतो.. काहीवेळा अचानक काही दिवसांसाठी दुस-या (विरुद्धा हवामान असलेल्या) ठिकाणी जाऊन राहावे लागते, त्यामुळे काही आजार होतात.. अशावेळी औषधे तर आपण घेतोच.. पण आजाराशी लढण्यासाठी आपल्याच शरीरातली उर्जा वापरली जात असते, आधिक अशक्तपणा आलेला असतो.. त्यात औषध त्यांचे काम करत असतात, पण ह्याच्या जोडीला योग्य पथ्य पाळली तर तो आजार निर्माण होण्याचे एक कारण कमी होते.. तसेच ते पदार्थ बंद केल्याने शरीराला त्या आजारातून लवकर बाहेर यायला मदत होते.. उर्जा कमी वापरावी लागते.. एक साधे उदाहरण पाहुया, एखादी जखम झाली असेल, अन विशिष्ट कपड्यांचा वापर करत राहिल्याने ती वारंवार चिघळत असेल, त्यामुळे भरुन यायला खुप दिवस लागत असतील तर आपण त्रास होणारे ते विशिष्ट कपडे वापरणे बंद करतो… तसेच आहाराच्या बाबतीत आहे.. शरीराची कमी झालेली उर्जा भरुन येण्यासाठी, आजार लवकर बरा होण्यासाठी, झालेली झीज भरुन येण्यासाठी आहारातली पथ्यं पाळणं आवश्यक आहे….

ही पथ्यं आजारात तर पाळावीच लागतात, पण आजार बरा झाल्यावरही काही काळ पाळणं आवश्यक आहे.. आजार बरा झाला असला तरी शरीरातली झीज पूर्ण भरुन आलेली नसते, जसे तापातून उठल्यावरही पुढे १-२ दिवस अशक्तपणा असतो.. किंवा कावीळ बरी झाल्यावरही ७-८ दिवस थकवा असतोच.. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून काही काळ पथ्यं पाळणं गरजेचे ठरते.. हे झाले सर्वसामान्य आजारांबाबत.. दीर्घकालीन आजारात काही पथ्यं आयुष्यभर पाळावी लागतात.. संधिवातासारख्या आजारात विशिष्ट ऋतुंमधे पथ्यं पाळावी लागतात.. काही आजारात पूर्ण कडक पथ्य पाळणं अतिशय आवश्यक असते, अन्यथा नको ते उपद्रव निर्माण होऊ शकतात.. विशेषतः त्वचारोग(स्कीन डिसीज), डायबेटीस इत्यादी.. अपथ्य केल्याने उपद्रव (कॉंप्लिकेशन्स) निर्माण होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.. काही जणांना ह्याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून अपथ्यसेवन होत राहते, अन पुढे उपद्रव निर्माण झाले की अकारण औषधोपचारांना दोष दिला जातो… आजार निर्माण करणारे पदार्थ, सवयी तर बंद करणे भाग असते पण आजारात अपायकारक असे अन्य पदार्थही बंद करावे लागतात..

आयुर्वेदात औषधाएवढेच महत्व पथ्याला आहे.. कारण पथ्य पाळल्याने अर्धा आजार बरा होतो असे आढळून येते… पेशंटसनी पथ्यं पाळल्यावर डॉक्टरचा वैयक्तिक फायदा काहीच नसतो.. केवळ पेशंटने लवकर बरे व्हावे, अन्य काही कॉंप्लिकेशन्स उद्भवू नयेत, आजार योग्य वेळेत बरा व्हावा एवढीच माफक अपेक्षा समोर ठेऊन पथ्य पाळण्यावर भर दिला जातो.. पथ्य पाळण्याचा अजून एक फायदा म्हणजे औषध जास्त डोसमध्ये द्यावे लागत नाही.. योग्य डोसमधे काम होऊन जाते, अन कमीत कमी, आवश्यक तेवढ्याच औषधांचा वापर करता येतो.. आजाराचे स्वरुप अन आजारी व्यक्तीची स्थिती ह्यावर प्रत्येकाला पथ्य सुचवलेली असतात.. त्यामुळे सगळ्यांना एकच पथ्य असेल असे नाही.. काही पथ्य हे आजारावर अवलंबून असते, तर काही आजारी व्यक्तीवर.. जसे, तापात हलके अन्न खावे हे सगळ्यांना समान असते.. पण दूध पिऊ नये ही गोष्ट वयपरत्वे ठरवावी लागते, कारण लहान मुलं जी केवळ दूध घेत असतात त्यांना हे पथ्य कसे सांगता येईल? अशावेळी काही वेगळी उपाय योजना करावी लागते, जसे सुंठ घालून उकळलेले दूध किंवा काडेकिराईत घालून दिलेले दूध…

प्रत्येक आजारानुसार पथ्य- अपथ्य ह्यांची माहिती पुढे देत राहीन…

 
7 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 14, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , , ,

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ३)

मागच्या लेखात आपण सुचवलेले सल्ले अन दुकानातून स्वतःच विकत आणलेली औषधं हे साईड इफेक्ट्स किंवा अपाय करु शकतात हे पाहिले.. असाच अजून एक काहीसा खटणारा प्रकार म्हणजे पेपरमधे किंवा मासिकात येणारा प्रश्नोत्तरांचा कॉलम.. “डॉक्टर, माझे सांधे गेली १० वर्षे दुखत आहेत, सूजही असते, भूक मंदावली आहे, वजन पण जास्त आहे.. कुठले औषध घेऊ?” किंवा “माझ्या चेह-यावर पुळ्या येऊन चेहरा काळवंडलाय तर काय लावू?” किंवा “गेली ५ वर्षे डायबेटीस आहे, शुगर नेहमी २०० / २५० च्या जवळपास असते.. मी नेहमीसाठी अन शुगर कंट्रोल मधे राहण्यासाठी काय घेऊ?” असले प्रश्न अन त्याखाली दिली गेलेली उत्तरे.. “तुम्ही अमुक एका कंपनीचे हे औषध घ्या, त्याबरोबर तमुक काढा घ्या..” किंवा “अमक्या कंपनीचा हा एक लेप चेह-यावर लावा, अन ह्या गोळ्या २ वेळा पोटात घ्या..” असली उत्तरे.. केवळ मार्केटींगसाठी केलेला प्रचार… ह्यात कुठेही “खरा आयुर्वेद” येत नाही.. एखाद्या टेक्निशिअनला थोडेसे शिकवले रिपोर्ट वाचायला अन विशिष्ट आजारांची नावे अन त्यावरचे उपाय लिहून दिले तर तो पण हा असला कॉलम अगदी नियमित चालवु शकेल..

नेमके काय चूक आहे चे असे विचारुन औषधं घेण्यात?? अनेकांना फरक पडतो मग आपण घेतले तर कुठे बिघडले?? ह्यात अपाय २, एक म्हणजे ज्याने असा प्रश्न विचारलाय त्याला हे माहीत नाहीये की त्याच्या आजाराचे डायग्नोसिस हे अर्धेच झालेय.. अन दुसरे असे की दुस-याने विचारलेले प्रश्न अन त्याला दिलेले सल्ले वाचून आपण सुद्धा तेच औषध बाजारातून आणतो, अन अधिक माहिती न घेता ते घेत राहतो…

आता प्रश्न आला असेल की डायग्नोसिस अर्धेच, हा काय प्रकार आहे? त्याला संधिवात / डायबेटीस / पुळ्या हे माहीत आहे.. म्हणजे आजार तर लिहिला आहेच ना प्रश्न विचारताना.. मग डायग्नोसिस अर्धेच कसे?

आयुर्वेदात आजार अन आजारी व्यक्ती / रुग्ण ह्यांचे वेगवेगळं परिक्षण करावे असे सांगितले आहे.. ह्यापैकी पेपरमधे आपण जे वाचतो ते आजाराचे केवळ नाव अन कालावधी आहे.. म्हणजे आजाराची नेमकी अवस्थासुद्धा त्यात आली नाहीये.. म्हणजेच आजाराचे निदान पण पूर्ण झालेले नाहीये.. दुसरे असे की, आजारी व्यक्तीचे परिक्षण केलेच नाहीये.. केवळ त्या व्यक्तीच्या नावाखाली असलेले वय एवढा एकच भाग माहीत आहे.. पण तिचे वजन, आवडीनिवडी, व्यसन, देहयष्टी, प्रकृती, स्वभाव, जेवणाच्या अन झोपेच्या सवयी ह्यासारख्या कितीतरी नेहमीच्या मुद्द्यांची तपासणीच झाली नाहीये.. किंबहुना पेपरमधे प्रश्न असल्याने ती करणेही शक्य नाहीये…

म्हणजेच अर्ध्या डायग्नोसिसवर सुचवलेला उपाय हाही अपाय ठरु शकेल.. अन आधीच एखाद्याची तपासणी न होता सुचवलेला उपाय आपल्यासाठी किती लाभदायी ठरेल??

वर उल्लेख केल्याप्रमाणे आयुर्वेदात आजार /रोग अन आजारी व्यक्ती / रुग्ण ह्यांचे परिक्षण होणं हे अतिशय आवश्यक असते.. आयुर्वेदात एकाच आजारासाठी २५-३० औषधं सुद्धा आहेत, अन एकच औषध २५-३० आजारातही गुणकारी ठरते.. म्हणजेच अमुक एक आजार अन अमुक एक औषध असे ठाम समीकरण प्रत्येक वेळी होईलच असे नाही.. आपल्याला माहित असलेली सुंठ ही तर अनेक आजारांवरचे औषध आहे, पण पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला नेहमीच उपयुक्त ठरेल असे नाही, तसेच उन्हाळ्यात ती वापरु नये हे अधिक योग्य.. म्हणजेच एका नेहमीच्या औषधाचा वापर करताना पण अशा अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते.. आता ह्याच उदाहरणात २ भाग अले, एक म्हणजे सुंठ अनेक आजारात काम करते(ह्यात आजाराचे डायग्नोसिस येतंच..) अन दुसरे म्हणजे, पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला उपयुक्त ठरेलच असे नाही (म्हणजेच आजारी व्यक्तीनुसार उपाय अन अपाय वेगळे असू शकतात).. ह्याच्या जोडीला ऋतूंचाही विचार केला जातो..

आता आपण काही शब्दांचा उल्लेख जो मागच्या लेखात आला होता त्याबाबत थोडी सविस्तर माहिती पाहुया..

 • देहप्रकृति – आपली जडणघडण, आपल्या काही सवयी, आवडीनिवडी इतरांपेक्षा भिन्न असतात.. कुणी खुप बारीक असते, तर कुणी त्याच वयाचं त्याच घरातलं असूनही जाड असते.. कुणाला खेळायला भरपूर आवडते तर कुणाला शांत एका जागेवर बसून वाचायला आवडते.. कुणी चटकन संतापते तर कुणी किती मारले, ओरडले तरी उलटून उत्तर देत नाही.. कुणाला खुप गोड आवडते तर कुणाला तिखट.. कुणी एकपाठी असते तर कुणी कितीही वेळा सांगूनही एखादी गोष्ट लगेच विसरुन जाते.. काहींची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, तर काहींची मेमरी शार्प असते.. कुणाला जेवायला १ तास पण कमी पडतो तर कुणी १०-१५ मिनिटात सगळे उरकून निवांत बसलेले असतात.. कुणाची भूक कमी असते तर काही जण लागोपाठ २ लग्नात भरपेट जेऊ शकतात.. अन कितीही आग्रह झाला तरी त्यांना त्रास होत नाही.. हे अन असे कितीतरी फरक आपण पाहत असतो.. हे फरक आपल्या देहप्रकृती अन मानस प्रकृती मुळे असतात.. प्रकृती ही जन्मतः ठरते, अन आयुष्यभर कायम राहते.. काही सवयी बदलत जातात पण मूळ गुणधर्म, स्वभाव सहसा बदलत नाही.. झालेला आजार अन ही प्रकृती ह्यांचा संबंध औषध देताना वैद्याला नेहमी विचारात घ्यावा लागतो.. जेव्हा नॉर्मल काय आहे हे समजते तेव्हा abnormal/ subnormal काय हे शोधता येतं.. काही उपाय हे विशिष्ट प्रकृतीप्रमाणे बदलावे लागतात किंवा टाळावे लागतात (जिथे ते अपाय ठरू शकतात हे वैद्याला माहीत असते तिथे ते टाळले जातात..). अन ह्याच कारणामुळे एकाला सूट झालेलं / लागु पडलेलं औषध हे दुस-याला लागू पडेलच असे नाही…
 • ह्या देहप्रकृतिला अनुसरुन, तसेच ज्या घरात आपण वाढतो, ज्या प्रदेशात आपण राहत असतो त्याप्रमाणे आपले राहणीमान वेगवेगळं असते.. आपल्या खाण्यातल्या भाज्या, भात, पोळी ह्यासारख्या घटकांमधील भिन्नता ही पण ह्या सगळ्या गोष्टींवर ठरत असते.. अन बदलतही असते.. जिथे जे उपलब्ध असेल ते खाण्याकडे आपल कल असतो.. राहणीमान, त्यात होणारे बदल हे सारे डायग्नोसिस करताना लक्षात घेणे आवश्यक ठरते, कारण काही आजार हे राहणीमानातल्या काही गोष्टी अचानक बदलल्याने झाले असू शकतात.. त्तसेच जुना आजार नव्या राहणीमानात पुन्हा डोके वर काढू शकतो.. ह्याशिवाय उपाय सुचवताना जे मूळ कारण शोधले जाते त्यातही अमुक एक हवामान, राहणीमान सूट न होणे हेही एक कारण असू शकते.. त्यामुळे आजाराचे नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत सहसा उपाय करु नये.. (सहसा ह्यासाठी म्हटले की काही आजारात वा काही आजारांच्या इमर्जन्सी मधे कारण शोधण्यापूर्वी उपाय आवश्यक ठरतो, अन त्यासाठी डॉक्टर/ वैद्य ह्यांचे ज्ञान अन अनुभवच उपयुक्त ठरतो..)
 • आयुर्वेदातला एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात आधी आजाराचे कारण शोधणे.. असा स्पष्ट उल्लेख ग्रंथात येतो की आधी आजाराचे कारण शोधावे, त्याचे योग्य ते डायग्नोसिस करावे, त्याबरोबर आजारी व्यक्तीचे सखोल परिक्षण करावे अन मग औषध अन उपायाकडे वळावं.. म्हणून “आयुर्वेद हा कुठलाही आजार समूळ नष्ट करणा-या चिकित्सेला श्रेष्ठ मानतो.” अन लोकांमधेही हा समज आढळतो की आयुर्वेदाने आजार मूळासकट काढून टाकला जातो.. पण ही आजार होण्याची कारणं २ प्रमुख प्रकारची असतात.. एक म्हणजे शरीराबाहेरचे कारण, दुसरे शरीरांतर्गत होणारा बिघाड.. दोन्ही कारणांचा विचार करुनच डायग्नोसिस होते, अन औषध देतानाही दोन्ही कारणांचा आधार घेतला जातो… हे असे का? एक साधा प्रश्न, घरात प्रत्येक जण सारखेच पदार्थ खात असतात, सगळे जण एकच वातावरणात राहत असतात तरीही साथीचे रोग घरातल्या सगळ्यांना होतातच असे नाही.. नुसते इम्युनीटी हे उत्तर दिले म्हणजे सगळे संपत नाही.. एखाद्याची इम्युनिटी का चांगली असते, एखाद्याची का कमी असते? इम्युनिटी वाढवता येते का अन येत असेल तर कशी? हेही प्रश्न तेवढेच महत्वाचे… म्हणजे जेव्हा शरीराबाहेरचे कारण (व्हायरस, bacteria यासारखे micro organisms, हवामान इत्यादी) हे सारखे असले तरी आजारी सगळे पडत नाही.. ह्यावरुन हे तर नक्की स्पष्ट आहे की शरीरामधेही काही कारण असे असेल ज्यामुळे विशिष्ट व्यक्तीलाच एखादा आजार होत असेल… अन हे कारण शोधणे हा आयुर्वेदातला महत्वाचा भाग आहे.. अन आपण सल्ले सुचवताना ह्याच भागाकडे साफ दुर्लक्ष करतो, पेपरमधे येणा-या कॉलममधेही हेच होते.. अन म्हणून कधी कधी एखाद्याला उपयुक्त असलेलं औषध दुस-याला लागू होत नाही.. तर उलट अपायच करते.. ह्यासाठी शरीराबहेर घडलेलं कारण अन शरीरात झालेला बिघाड, असे दोन्ही पाहणे आवश्यक अन महत्वाचे… तेव्हाच आजार समूळ नष्ट होतो… अन्यथा टेक्निशिअनगिरी……

ह्यासारखे अजून काही महत्वाचे मुद्दे पुढच्या लेखांमधे येत राहतील.. असे अजून काही भाग आहेत डायग्नोसिच्या संदर्भातले ज्यामुळे उपचारात फरक येतो, अन एकच औषध २ व्यक्तींना देता येतेच असे नाही हे ठरते… जमेल तसे त्यावरही सविस्तर लिहीत राहीन…

 
2 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 8, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , ,

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)

कधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात..  अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन जातात.. मी पण एखादे औषध घेतो / घेते म्हणजे ते दुस-याला लागू पडेलच असे नाही.. जर सगळे एवढे सोप्पे असते तर डॉक्टरकी करण्यात कुणी एवढी वर्षे का घालवली असती? डॉक्टर ह्या पदवीची अन शिक्षणाची आवश्यकताच काय? म्हणून डॉक्टरला / वैद्याला त्याचे काम करु द्या अन आपण आपले काम चोख करुया.. (अर्थात औषध घेण्याचे अन पथ्य पाळण्याचे.)

अशावेळी मला माझ्या आदरणीय नानल सरांचे एक वाक्य नेहमी आठवते… ते म्हणतात की, “कुठलाही शब्द वापरताना, कुठलेही वाक्य लिहिताना आणि कुठलाही उपाय सुचवताना त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते..  तशी जबाबदारी आपण घेणार असू तरच लिखाण करावे अन चिकित्सा करावी”.. आजही किती महत्वाची आहे ही गोष्ट… उद्या काहीही वेगळे / विपरीत झाल्यावर जर आपण त्याची जबाबदारी नाकारणार असू तर ते योग्य नाही.. आपण सुचवलेला उपाय चूक ठरु शकतो ह्याची कल्पना आपल्याला असते का? निश्चितच नसते.. कारण आपण स्वतः तेच औषध घेतलेलं असते, किंवा अजून कुणाला ते घेताना पाहिलेले वा ऐकलेले असते.. पण तरीही एखाद्यावेळी काही वेगळे झाले अन त्याला ते औषध लागू नाही पडले अन काही अपाय झालाच तर आपण घेणार आहोत का त्याची जबाबदारी?? जो अपाय झालाय तो आपण दूर करु शकणार आहोत का?? जर हो, तर खुशाल सल्ले द्या, अन त्याची योग्य ती जबाबदारी घ्या.. पण जर हे जमणार नसेल तर मग उपाय सुचवताना सावधान!! आपल्या नकळत आपण कुणाला तरी अजून त्रासात टाकू शकतो, एखाद्या गंभीर अपायाने.. एक छोटेसं उदाहरण देते, एखाद्याला डायबेटीसचा त्रास आहे अन आपण त्याला आपल्या ऐकीवातले नेहमीचे उपाय ’कारल्याचा रस’ वगैरे सुचवले तर?? आपल्याला असे वाटते की आपणही घेतोच आहोत, अन आपलीही शुगर कंट्रोल मधे आहे.. मग त्या व्यक्तीलाही फायदाच होईल.. पण अशावेळी हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की जर त्या व्यक्तीला अन्य काही पोटाचे आजार असतील, Gas मुळे पोटफुगी होत असेल, शौचाला साफ़ होत नसेल वा डायबेटीसबरोबरच संधिवातही असेल तर त्या व्यक्तीला कारली हा उपाय सुचवणे म्हणजे अपायच.. कारण त्यामुळे वात वाढून संधिवाताचा जोर वाढू शकतो.. ज्याचे वजन डायबेटीसमधे कमी झालेय त्याला पण कारल्याचा रस चालणार नाही.. मग अशावेळी अपाय आपण सुचवलेल्या उपायाने झालाय हे आपण स्वीकारत नाही अन ती व्यक्तीच योग्य ते पथ्य पाळत नसेल असा निष्कर्ष आपल्या सोयीनुसार सर्रास काढतो.. किंवा काहीवेळा असेही करतो की त्याच व्यक्तीला डायबेटीससाठी एक उपाय सुचवतो अन संधिवातासाठी दुसरा, जे कदाचित परस्परविरोधी असू शकतात.. पण आपल्याला माहीत नसते..

आता प्रश्न येतो की हे असे का होते? एकाला उपाय ठरलेली गोष्ट दुस-याला त्याच आजारात अपाय का ठरते?? ह्याचे कारण प्रत्येकाची देहप्रकृती, आजाराचे स्वरुप, कालावधी, त्यातली कॉंप्लिकेशन्स, आधीच झालेला एखादा आजार, राहणीमान, जेवणाच्या सवयी, व्यायाम अन खेळ ह्यांचा समावेश, मानसिक जडणघडण ह्यासारख्या अनेक गोष्टी दोन व्यक्तीत वेगवेगळ्या असू शकतात..

जसे लहानपणापसून आपल्याला गोड आवडत असेल तर आपल्या भावाला वा बहिणीला तिखट आवडत असते.. आपली अन इतरांची झोप कमीजास्त असते.. आपण कितीही मोठ्या संकटाला किंवा आजाराला सहज सामोरे जात असू, पण दुसरी व्यक्ती त्याच आजारात कुढून जाऊ शकते.. हतबल होऊ शकते..

आयुर्वेदात ’योग्य चिकित्सा’ म्हणजे काय हे सांगताना अतिशय महत्वाचा संदर्भ मिळतो, तो म्हणजे, तीच श्रेष्ठ चिकित्सा ज्यामुळे आजार तर बरा होतोच पण अन्य आजार वा अन्य उपद्रव (कॉंप्लिकेशन) उद्भवत नाही.. (खरेतर liver toxicity सारखे known side effects असलेली आधुनिक औषधे ह्या व्याख्येत कशी बसणार कुणास ठऊक?)… म्हणजेच उपाय सुचवताना आपल्याला हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या उपायाने एखाद्याला अपायही होऊ शकतो, अन जर अपाय झाला तर ती चूक त्या व्यक्तीची / औषधाची नसून आपलीच आहे.. अशावेळी आपल्या त्या औषधाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.. कुणाला द्यावे ह्यापेक्षा कुणाला देऊ नये हे सगळ्यात आधी लक्षात ठेवले पाहिजे.. हा वैद्यकीय चिकित्सेला महत्वाचा नियम आहे..

आपण अशावेळी काय केले पाहिजे, पहिले म्हणजे जर आपल्याला औषधाची संपूर्ण माहिती नसेल तर कुणालाही फुकटचे सल्ले न देता वैद्याकडे पाठवून योग्य तो उपाय करायला लावला पाहिजे किंवा त्या औषधाची, आजाराची संपूर्ण माहिती करुन घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे..

काही जणांना दुकानात जाऊन तक्रार सांगून औषध आणायचीही सवय असते.. तीही कितीतरी वेळा हानीकारक ठरु शकते.. कारण एक तक्रार ही अनेक आजारात समान असते.. अन अशावेळी जर योग्य डायग्नोसिस झाले नाही तर भलतेच औषध आपल्याकडून घेतले जाते.. त्याचा योग्य तो परिणाम होत नाही.. अन आयुर्वेदिक औषध उशीरा रिझल्ट देते ह्या अजून एका समजामुळे आपण वाट पहात राहतो, अन आजार अजून गंभीर बनत  जातो… कदाचित सुरुवातीलाच डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार केले असते तर लवकर रिझल्ट मिळाले असते… पण आपल्याच सवयी आपल्याला त्रासदायक ठरतात.. अन लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो..

आयुर्वेदिक औषधाला सुद्धा साईड इफेक्ट्स असतात, जर अयोग्य व्यक्तीला, चुकीच्या आजारात अथवा चुकीच्या प्रमाणात दिले गेले तर… नीट डायग्नोसिस न होता औषध दिले तरी त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात.. ज्या औषाधाने जो रिझल्ट अपेक्षित आहे तो न दिसता जे काही अपाय दिसतात ते म्हणजे “साईड इफेक्ट्स”.. अन ह्यात चूक आयुर्वेदाची निश्चितच नाही, तर ते उपाय सुचवणा-या व्यक्तीची आहे.. मग भले ती वैद्य असो वा सामान्य माणूस (जो इतरांना उपाय सुचवतो)…

देहप्रकृती, राहणीमान, मानसिक जडणघडण, मानसिक प्रकृति, ह्यासारख्या काही शब्दांची सविस्तर माहिती, तसेच अपाय का होऊ शकते ह्याचीही काही कारणं ह्या शब्दांशी संबंधित असतील ती पण विस्ताराने पुढच्या भागात देते..

 
3 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 5, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , ,

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख – १)

आयुर्वेद हा शब्द कुठल्याही ग्रुपच्या, नातेवाईकांच्या गप्पांमधे आला की २ गोष्टी अपोआप सुरु होतात, एक म्हणजे आपल्याला माहीत असलेले मोजके उपाय दुस-याला सुचवायला सुरुवात करणे अन दुसरे म्हणजे आपल्याला असलेली अर्धवट माहिती छातीठोकपणे इतरांना पटवून देणे, तीही नातेवाईक वा मित्रांच्या संदर्भात ऐकलेली.. पण खरेच कधी जाणून नाही घ्यावेसं वाटत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? तुळस, ओवा, हिंग असले घरगुती उपचार म्हणजेच फक्त आयुर्वेद का? की सगळे उपाय करुन झाल्यावर राहिलेला उपाय म्हणजे आयुर्वेद? ज्याप्रमाणे रुढी अन शास्त्र ह्यामधे अनेकांचा गोंधळ असतो, तसेच काहीसे हल्ली आयुर्वेदाच्या बाबतीत दिसून येते..

आयुर्वेद म्हणजे नक्की  काय ह्याबद्दल आजवर जेवढे काही समजलंय तेवढे ह्या लेखमालेतून इथे ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.. आयुर्वेदाबद्दलचे समज, गैरसमज अन सत्य हे सारे स्पष्ट करणे हा ह्या लेखमालेचा उद्देश.. पहिल्या लेखात आपल्या मनात असलेले समज काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. उत्तरे हळुहळु पुढच्या लेखांमधे येतील.. सामान्यतः जे काही प्रचलित समज लोकांमधे आढळतात त्याचा उल्लेख पुढे केला आहे.. ह्यासारखे अजूनही काही समज आढळतात, त्यांचा उल्लेख पुढच्या लेखांमधे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने येईल.. ह्यापैकी प्रत्येक समज वा गैरसमज अन सत्य ह्याचे सविस्तर विश्लेषण ह्यानंतरच्या लेखांमधे असेल, प्रत्येक समजासाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे.. इथे सर्वसामान्य विषयांची माडणी असेल, कुणाचेही वैयक्तिक अनुभव वा विशिष्ट रुग्णांचे अनुभव ह्याचा समावेश नाही..

-> कधी कधी आपल्या नकळत आपण कुणालातरी काहीतरी उपाय सुचवतो.. मला माहीत आहे ते औषध, मागे पण कितीतरी जणांना दिले आहे ना ते अशा भ्रमात अनेकदा आपण फुकटचे सल्ले देत असतो.. अन ते अपाय ठरु शकते ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते.. पण जेव्हा एखाद्याला अपाय होतो, आपल्याला प्रश्न पडतो की मागच्यावेळी एकाला हाच उपाय सांगितला होता तर त्याला आराम पडला, मग आता का असे उलट झाले?  अन अपाय झालाच तर त्याचे खापर अकारण आयुर्वेदाच्या माथी… पण खरेच हे असे का झाले ह्याचा शोध घेता येणं शक्य आहे..

-> आजवर कायम ऐकलेली गोष्ट म्हणजे “आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात”.. हा प्रचार कुणी अन का सुरु केला हे शोधत बसणे शक्य नाही.. पण हे खरे आहे का?? तसाच अजून एक ठाम असलेला समज, “आयुर्वेदिक औषधाला एक्स्पायरी नसते”.. कधी एखादी संहिता (आयुर्वेदाची) उघडून पाहिली आहे का? त्यात काय सांगितले आहे नेमके ते शोधले का?? आत्ता उल्लेख केलेले हे दोन समज की गैरसमज??

-> Practice करत असताना सामान्यपणे जे प्रश्न रुग्ण नेहमी विचारतात त्यापैकी एक म्हणजे, “तुम्हाला नाडी परिक्षा येते का?” जणू केवळ नाडी परिक्षा येणं म्हणजे आयुर्वेदात पारंगत अशी काहीशी कल्पना असते…

-> आयुर्वेद म्हणजे केवळ औषधी उपचार अशीही समजूत असते.. आयुर्वेदात सर्जरी पण आहे का? हा प्रश्न तर हमखास ठरलेला… पण आयुर्वेदात शस्त्रचिकित्सेचे वर्णन आहे, नव्हे एक पूर्ण संहिता ’शस्त्रचिकित्सा’ ह्या वैद्यकीय अंगाची माहिती देते हे ऐकून आपल्या निश्चित नवल वाटले असेल…

-> आयुर्वेदात क्वीक रिझल्ट्स नसतात हा तितकाच ठाम समज(?).. आयुर्वेदिक औषधं उशीरा काम करतात पण कायम स्वरुपी आराम मिळतो असली वाक्यं सर्रास ऐकू येत असतात.. पण त्रिभुवनकीर्तीसारखी गोळी १-२ तासात ताप पूर्ण कमी करते हे कधी पाहिले जात नाही..

-> वैद्याकडे गेले की काय खायचे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच यादी मोठी.. सगळे आवडते पदार्थच बंद करायला सांगितले आहेत.. काय सुख मिळते हे करुन कुणास ठाऊक.. ह्यासारखी वाक्यं पण घरोघरी ऐकू येतात..

-> भस्म – हा तर गाजलेला विषय.. इतर देशात भस्मांचे विषारी परिणाम सांगितले गेले अन त्यामुळे आपणही ते खरे मानून भस्म असलेली औषधं म्हणजे विषच असा समज करुन घेतला.. भस्म असलेली औषधं घेतल्याने किडनी फेल होते असेही आपण वाचतो.. पण हे किती खरे आहे? अन कुठल्या भस्मामुळे हे होते? शुद्ध की अशुद्ध? भस्मं खरेच विषारी असतात का? त्याचे एवढे दुष्परिणाम असते तर आजवर ती वापरली गेली असती का?? आजही त्याचे तेच रिझल्ट मिळाले असते का जे हजार वर्षापूर्वी मिळत होते?? मग नक्की खरे काय??

-> आयुर्वेदातली औषधे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेली असतात का? संशोधन होणे गरजेचे आहे का? असेही प्रश्न आपल्या मनात असतात.. एक साधा विचार आहे की ज्या आयुर्वेदात जवळपास हजाराहून अधिक वनस्पतींचे वर्णन, त्याचे गुणधर्म, त्याचे आजारातील उपयोग सांगितले गेले आहेत ते हजार वर्षानंतर आजही तसेच सिद्ध होतात.. मग हे गुणधर्म, हे उपयोग प्रयोगाशिवाय झाले असेल का? संशोधनाशिवाय झाले असेल का? काही निश्चित आधार, सिद्धांत असल्याशिवाय एवढ्या रोगांवर एवढे उपाय सांगितले गेले असतील का?? काय विचार असेल ह्या सगळ्यामागे??

->आयुर्वेदात एड्ससाठी, Cancer साठी किंवा स्वाईन फ्लूसारख्या नव्या आजारांसाठी काही उपाय आहे का? हा प्रश्न कुठलाही नवीन आजार मोठ्या प्रमाणावर पसरु लागला की हमखास वैद्यांना विचारला जातोच… “डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे, पण म्हटले की आधी आयुर्वेदात काही उपाय आहे का, अन असतील तर करुन पाहावे”.. अशीही वाक्यं नवीन नाहीत… अशा स्थितीत रुग्ण आधीच गोंधळलेला असतो.. त्यामुळे लास्ट होप म्हणून हा एक समज मनात निर्माण झालेला असतो…

-> इंटरनेट, आयुर्वेदिक उपाय असलेली सामान्य वाचकांसाठी असलेली पुस्तकं वाचून आलेला रुग्ण तर ’पंचकर्म’ ह्याबद्दल प्रश्न विचारणार हे तर माहीतच असते.. ’तुम्ही पण करता का पंचकर्म?’ किंवा मला ते टीव्हीवर दाखवतात ते पंचकर्म करुन घ्यायचेय.. तुमच्याकडे सोय आहे का? किंवा पंचकर्म नाही केले तर माझा आजार लवकर कसा बरा होईल? आमच्या नातेवाईकांनी ह्या आजारात पंचकर्मच करुन घेतले तेव्हा आराम आला.. ही असली वाक्यं अशा थाटात त्या वैद्याला ऐकवली जातात की जसे काही वैद्याला पंचकर्म हा शब्दच माहीत नाहीये अन आपणच तो त्याला सांगतोय.. पण पंचकर्म म्हणजे नेमके काय? केवळ शेक, मालिश अन ती टीव्हीमधे दाखवतात डोक्यावर तेल सोडतात ते म्हणजे पंचकर्म का? अन पंचकर्म आपल्याला मानवेल का? ते आपल्या देहप्रकॄती अन आजाराच्या अवस्थेनुसार योग्य आहे की नाही हे प्रश्न का नाही येत कधी… कारण पंचकर्माची खरी माहिती आपल्याला नसतेच.. जे काही माहीत असते ते कुणाकडून तरी ऐकलेले किंवा नेटवर वा टीव्हीवर पाहिलेले… मग नेमके काय आहे हे पंचकर्म??

-> लहान मुलांसाठी काही टॉनिक आहे का आयुर्वेदात?? किंवा भूक लागेल असे काही औषध?? हल्ली तो / ती काही खातच नाही.. त्यामुळे तब्येत सुधारत नाही.. एखादे टॉनिक घेतल्यावर तब्येत सुधारेल ना त्याची / तिची?? १२ वर्षापर्यंत वयोगटातील मुलांच्या आईवडिलांचे हे प्रश्न नेहमी असतात… पण वयोगटानुसर ह्या प्रश्नांची उत्तरेही वेगळी असतात.. कारण मूळ समस्या वेगळी असते.. पण आयुर्वेदिक टॉनिकमुळे तब्येतीत फरक पडेल असा एक प्रचलित समज दिसतो… हा समज की गैरसमज?

ह्या अन अशा अजून काही समज – गैरसमजांवर काही सविस्तर लिहावे असे वाटले.. आयुर्वेद, त्याचा उद्देश अन त्यातले सत्य समोर आणावं असे वाटले म्हणून ही लेखमाला लिहायला सुरुवात करते आहे.. अजून काही शंका पुढच्या लेखांमधे समाविष्ट होत जातील…

 
5 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 1, 2009 in आयुर्वेद

 

टॅग्स: , , , , ,

११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ३

(भाषण तिसरे – हिंदूधर्म- पुढचा भाग
आधीचा भाग –
https://medhasakpal.wordpress.com/2009/09/15/११-सप्टेंबर-–-शिकागो-सर्व/)

मी येथे उभा आहे. डोळे मिटून मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करु लागलो – ‘मी ‘मी’ ‘मी’ – तर माझ्यासमोर कोणती बरे कल्पना उभी राहते? हीच की हा देहच मी होय. तर मग, पंचमहाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात, ‘नाही’. मी देहात वसणारा ‘आत्मा’ आहे, मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामधे आहे, परंतु ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळीही मी विद्यमान राहीन, आणि हा देह धारण करण्यापूर्वीही मी होतोच. आत्म कुण्या पदार्थापासून सृष्ट झालेला नाही. कारण ‘सृष्टी’ शब्दाचा अर्थच आहे – भिन्न भिन्न द्रव्यांचा संयोग. आणि असा संयोग म्हटला की केव्हा ना केव्हा तरी त्यांचा वियोग हा ठेवलेलाच. अतएव, आत्मा जर सृष्ट झाला असेल तर तो नाश पावणार हे नक्कीच. म्हणून आत्मा सृष्ट पदार्थ नव्हे. कुणी कुणी जन्मापासूनच सुखात लोळत असतात, सुंदर-सुदृढ शरीर नि उल्हास-उत्साहपूर्ण मन त्यांना जन्मतःच लाभलेले असते, अभाव म्हणून कशाचाच नसतो. तर दुसरे कुणी आजन्म दुःखात पिचत असतात, – कुणाला हात नसतात, कुणाला पायच नसतात, तर कुणी वेडसरच जन्मतात आणि आपल्या भारभूत आयुष्याचा एक एक दिवस कसा तरी कंठीत असतात. हे सर्वच जण जर सृष्ट झाले असतील तर, हे सर्व जर त्या एका न्यायशील आणि दयामय ईश्वरानेच सृष्ट केले असतील तर कुणी सुखी अन कुणी दुःखी असे का? का बरे भगवंताने असा पक्षपात करावा? तुम्ही म्हणाल, “जे या जन्मी दुःख भोगत आहेत ते परजन्मी सुखी होतील.” पण म्हणून काय झाले? दयामयाच्या व न्यायवानाच्या राज्यात का बरे एकजण तरी दुःखी असावा? आणि दुसरे असे की, एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील या विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. उलट ह्यात एखाद्या सर्वशक्तिमान, स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुर व्यवहार मात्र दिसून येतो. करिता, हे स्वीकारणे भाग पडते की, मनुष्य सुखी वा दुःखी जन्मण्यापूर्वी अशी बहुविध कारणे घडली असली पाहिजेत की ज्यायोगे तो परिणामी सुखी किंवा दुःखी झाला आहे. आणि ती कारणे म्हणजे त्याचीच सारी पूर्वकर्मे होत. बरे पण, माणसाच्या शरीराची व मनाची घडण त्याच्या पितृ-पितामहादींच्या शरीरमनानुरुप होत असते असे म्हणून, आनुवांशिकतेच्या आधाराने वरील प्रश्नास समर्पक उत्तर देता यावयाचे नाही काय? हे अगदी स्पष्टच आहे की, जीवनस्रोत जड आणि चैतन्य अशा दोन धारांनी प्रवाहित होत असतो. जड आणि जडाचे विकारच जर आत्मा, मन, बुद्धी वगैरेंचे कार्य करु शकत असतील तर मग आणखी एक स्वतंत्र आत्मा मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु जडातून चैतन्यशक्ती उद्भूत झाली आहे असे सिद्ध करण्यास काहीच प्रमाण नाही. आणि म्हणूनच, एका जड पदार्थापसून सारे काही सृष्ट झाले असे स्वीकार करतो म्हटल्यास, एक मूल चैतन्यच समग्र सृष्टिकार्य चालवीत असते हे स्वीकार करणेही अर्थातच तर्कसंगत, नव्हे सर्वांच्याच दृष्टीने वांछनीयही होऊन बसते. परंतु येथे या विषयाचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही.

मानवशरीरात पितृ-पितामहादींच्या ब-याचशा प्रवृत्ती आनुवांशिकतेने संक्रामित होत असतात ही गोष्ट अर्थातच आपण कधीही नाकबूल करु शकणार नाही. परंतु त्याचबरोबर हेही विसरुन चालणार नाही की, केवळ शारीरिक प्रवृत्तींखेरीज प्रत्येक जीवात्म्याच्या स्वतःच्याही काही विशिष्ट प्रवृत्ती असतात. जो आत्मा ज्या विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असतो, तो ठीक तदनुरुप शरीराचाच आश्रय घेऊन स्वतःच्या प्रवृत्तींनुसार कार्य करण्यास समर्थ होतो. परंतु आत्म्याच्या त्या त्या प्रवृत्तीही परत पूर्वी केलेल्या कुण्या कर्मामुळेच बनत असतात. विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असलेला आत्मा आपल्या प्रवृत्तींना उपयोगी अशाच देहात जन्म घेतो, कारण दोन समान किंवा अनुरुप गोष्टींचाच संयोग होत असतो असा नियम आहे. हे आधुनिक विज्ञानालाही संमत आहे. कारण, विज्ञान म्हणते की प्रवृत्ती सवयीने बनते, व सवय पुनरावृत्तीचे फल होय. म्हणून, कोणत्याही नवजात बालकाच्या प्रवृत्ती त्याने पुनः पुनः आचरलेल्या कर्मांचीच फळे होत. आणि ज्याअर्थी या प्रवृत्ती त्याने या जन्मात कमवणे शक्य नाही त्याअर्थी त्या त्याच्य मागील जन्मांतूनच आलेल्या असल्या पाहिजेत असे म्हणणे भाग पडते.

परंतु, येथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. समजा की पूर्वजन्म आहे. पण मग त्या पूर्वजन्माचे काहीच कसे स्मरण आपल्याला राहू नये? या शंकेचे समाधान करणे अर्थातच विशेष अवघड नाही. सध्या मी इंग्रजीतून बोलत आहे. ती काही माझी मातृभाषा नव्हे. खरे पाहिले असता मातृभाषेतील एक देखील शब्द सध्या माझ्या मनात हजर नाही. पण मी जर आठवण्याचा प्रयत्न करीन तर तत्क्षणी ते माझ्या स्मृतिपटलावर चमकू लागतील. यावरुन हेच दिसून येते की, मनःसागराच्या केवळ पृष्ठभागावरच जे काय हेलकावत राहते त्याचाच फक्त आपल्याला बोध होत असतो. आणि आपली पूर्वार्जित ज्ञानराशी त्याच समुद्राच्या अगाध गर्भात दडलेली असते. प्रयत्नपूर्वक साधनेद्वारा तिला वर आणता येते. आणि मग, याच काय पण पूर्व पूर्व जन्मांची देखील संपूर्ण स्मृती आपल्या अंतःकरणात जागृत होईल.

पूर्वजन्मासंबंधी हे साक्षात प्रमाण होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात ताडून बघून पडताळा मिळाल्यानंतरच कोणत्याही मताची वा वादाची संपूर्ण सिद्धता होत असते. आणि ऋषिगण समस्त जगतासमोर आव्हानपूर्वक घोषणा करीत आहेत की, “अथांग स्मृतिसागराच्या खोल खोल प्रदेशाचा ठाव कशा रीतीने घ्यावा हे गूढ आम्ही उकलले आहे.” त्यांचे अनुकरण करुन यथोचित साधना करा, तुम्हालाही गतजन्मीच्या सा-या घटना आठवतील.

सारांश, आपण आत्मा आहोत असा हिंदूंचा विश्वास आहे. “शस्त्र त्या आत्म्याला छिन्न करु शकत नाही, अग्नी दग्ध करु शकत नाही, जल आर्द्र करु शकत नाही, आणि वायु शुष्क करु शकत नाही !” हा आत्मा एक असे वर्तुळ आहे की ज्याचा परिघ कुठेच नाही परंतु ज्याचे केंद्र प्रत्येक देहामधे अवस्थित आहे. आणि त्या केंद्राचे एका देहातून दुस-या देहात गमन म्हणजेच मृत्यू. त्याचप्रमाणे हा आत्मा जडाच्या नियमांच्याही अधीन नाही. तो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव आहे. परंतु कुण्या अचिंत्य कारणाने कुणास ठाऊक, तो जडाशी बांधला गेला असून स्वतःला जडच समजत असतो. प्रश्न उद्भवतो – हा विशुद्ध, पूर्ण नि विमुक्त आत्मा जडाच्या खोड्यात अडकून त्याचा दास बनावाच का? पूर्ण असूनही आपण अपूर्ण आहोत असे त्याला वाटावेच कसे? आपल्याला असे सांगण्यत येते की या प्रश्नाची यथातथ्य मीमांसा करण्यास असमर्थ म्हणून हिंदू त्या प्रश्नाला साफ बगल देऊन म्हणतात की असला प्रश्नच मुळी संभवत नाही ! कुणी कुणी पंडित आत्मा, जीव आणि त्या दोघोंच्या मधे पूर्णप्राय (जवळजवळ पूर्ण) सत्ता यांचे अस्तित्व कल्पितात व त्यांना नानाविध बोजड शास्त्रीय संज्ञा देऊन वरील प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितात. पण संज्ञांची खैरात म्हणजे काही उत्तर नव्हे, कारण संज्ञांच्या सरबत्तीनंतरही प्रश्न होता तसाच शिल्लक उरतो. जो पूर्ण, त्याची पूर्णता अगदी लेशभरसुद्धा ढळुच कशी शकते? जो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव, त्याच्या त्या स्वभावाचा अणुमात्रदेखील व्यतिक्रम होऊच कसा शकतो? हिंदू या बाबतीत सर्वांपेक्षा अधिक सरळ आणि सत्यवादी आहे. फोल तर्कयुक्तीच्या मदतीने उत्तर देण्याचा तो आवही आणत नाही, अथवा उत्तर दिले म्हणून आपले पांडित्यही मिरवू इच्छित नाही. अगदीही न कचरता वरील प्रश्नाला तो उत्तर देतो – “हे मला माहीत नाही. हा पूर्ण आत्मा आपल्या अपूर्ण कसा मानू लागला आहे, जडाच्या नियमांच्या अधीन कसा समजू लागला अहे, हे मला माहीत नाही.” परंतु वस्तुस्थिती ही अशीच आहे एवढे मात्र निर्विवाद. प्रत्येकजण स्वतःला देहरुपी समजत असतो. हे असे का, आत्मा ह्या देहात का बरे आला आहे, याचे विवरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. ‘ही सारि ईश्वरची इच्छा’ असे म्हणूनही या कूट प्रश्नाचा निकाल लागण्यासारखा नाही. कारण, हिंदू जे म्हणतो की ‘मला माहीत नाही’, त्यापेक्षा ह्या उत्तराने तरी प्रस्तुत रहस्यावर अधिक प्रकाश तो कोणता बरे पडतो?

असो, तर ह्यावरुन हेच निष्पन्न होते की, मनुष्याचा आत्मा अनादी, अमर, पूर्ण आहे आणि एका देहातून दुस-या देहात जाण्याचे नावच मृत्यू होय. आपली वर्तमान अवस्था आपल्या गतजन्मांचे फल असून भावी अवस्था वर्तमान कर्मांचे फल होय. आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत जन्म आणि मृत्यूच्या अखंड फे-यात अविरत भ्रमत असतो.

(ह्या भाषणाचा पुढील भाग “११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ४” मधे टाईप करेन… )

 

टॅग्स: , , , , , , , ,

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठला, तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥

घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥

— गीतकार – ग. दि. माडगुळकर
— गायक – सुधीर फडके

(नितांत सुंदर असे हे गाणे आहे.. कितीही निराश मनस्थिती असली तरी हे गाणे ऐकताना पुन्हा नवा उत्साह, नवी प्रेरणा मिळते.. मन आपोआप शांत होते… हे गाणे सैरभैर मनस्थितीत पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.. एक आठवण म्हणून नेहमी समोर असावे, ह्यासाठी ब्लॉगवरच ठेवतेय..)


 
6 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2009 in खास गाणी

 

टॅग्स: , ,