RSS

दैवी संपत्ती २ (अर्जुन विषाद ७)

02 सप्टेंबर

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ १६-२ ॥

(भगवद्गीता अ. १६)

अहिंसा – शरीर, मन अन वाचा ह्या तिन्हीने हिंसा न करणे.. दुसर्‍याला इजा होईल असे कुठलेही शारीरिक, मानसिक वा वाचिक काम न करणे म्हणजे अहिंसा.. शारीरिक अहिंसा ही संकल्पना सहज समजण्याजोगी आहे.. मानसिक अहिंसा म्हणजे मनातसुद्धा कुणाच्या नाशाबद्दल किंवा घाताबद्दल विचारही न येणं.. कुणाचे काही वाईट व्हावे असा साधा विचारही न येणं म्हणजे मानसिक अहिंसा.. अन आपल्या शब्दानेही दुसर्‍याला न दुखावणे म्हणजे वाचिक अहिंसा.. ह्या तीनही प्रकारच्या अहिंसा सहज साध्य असलेली व्यक्ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली.. स्वतः अपरंपार दुःख सोसून, समाजाकडून उपेक्षा सहन करुनही सर्वांचे कल्याण होवो अन सर्व जण सुखी होवोत अशा भावनेचं अत्युच्च असे पसायदान मागितले… शब्दात तर हिंसा, द्वेष नव्हताच, पण मनातही कुठला राग, कुणाबद्दल वाईट विचार नव्हते…

सत्य – खोटे बोलावे की नाही? नेहमी खरेच बोलावे का? जर कधी खोटे बोलायची वेळ आली तर काय करायचे? खोटे बोलावे लागले तर कधी बोलावे?? हे आपल्याला पडणारे नेहमीचे प्रश्न… “ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् | “ हे सूत्र आयुष्यभर समोर ठेऊन आचरण केले तर सगळे प्रश्न कसे सोप्पे होऊन जातात.. आपल्या प्रत्येक कृतीला व्यापकत्व येते… खोटे बोलावेच लागले तर ते ह्या सूत्रापैकी कुठल्याही भागासाठी असेल तर ते योग्य ठरते.. पण त्याला धर्माची जोड असावी.. अधर्मासाठी कधीही खोटे बोलु नये.. पण धर्माने वागताना जर कुणाचे रक्षण करायचे असेल, दुष्कृत्यांचा नाश करायचा असेल तर जरुर खोटे बोलावे.. पण आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलावे लागले तर मात्र परिणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवावी.. मग फटके बसणारच आहेत… मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे सत्वशुद्धी, अन योगव्यवस्थिती प्राप्त झाली असेल तर मग कधी अन कुठे खोटे बोलावे ह्याचा निर्णय दुसर्‍यावर सोपवायची वेळ येत नाही.. आपली प्रत्येक कृती ही समाजहिताची असेल, धर्माला अनुसरुन असेल तर मग लौकीक जगातील सत्य असत्याच्या व्याख्या पडताळत बसायची गरज नाही पडत.. तत्क्षणी आतून जाणीव येते अन आपल्याकडून योग्य ते कार्य करून घेतले जाते, योग्य ते वदवून घेतले जाते.. एखाद्या अशा प्रसंगात आपल्याला नंतर असे वाटून जाते, कसे कोण जाणे कुठली हिम्मत आली अन मी ती वाक्यं बोलून गेलो… ती वाक्यं वदवून घेतलेली असतात..

अक्रोध – क्रोध हा सहा रिपुंपैकी एक.. अक्रोध ही अवस्था नेमकी काय? क्रोध का येतो? जेव्हा आपण इच्छिलेली एखादी गोष्ट प्राप्त होत नाही तेव्हा, जेव्हा आपली कामना / इच्छा / वासना / आकांक्षा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध येतो.. समोरची व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही तेव्हा क्रोध येतो… आपली किम्मत कमी झाली की काय असे तीव्रतेने वाटु लागते तेव्हा चीडचीड सुरु होते, अन मग प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागतो.. आपल्याल हवे तसे घडत नसेल तेव्हा राग येतो.. आपले एखादे काम वेळेवर नाही झाले की राग येतो… पण अशावेळी कधी उलट विचार करुन पाहिलाय का?? मला हवे तेव्हा ते काम नाही झाले म्हणजे ती वेळ योग्य नव्हती.. किंवा माझ्याकडून काहीतरी कमी पडले असेल किंवा त्यावेळेला ते काम पूर्ण होतान आपल्याही नकळत आपल्याला अजून एखाद्या अनपेक्षित संकटाला सामोरे जावे लागणार असेल, अन ती वेळ टळण्यासाठी ती गोष्ट त्यावेळी नसेल झाली… एक साधे उदाहरण पाहुया, कधी बॅंकेत काही काम करायला गेलो असू अन बराचवेळ रांगेत थांबुनही ते त्यादिवशी नसेल झाले.. अन दुसर्‍या दिवशी तिथे गेल्यागेल्याच ते लगेच पूर्ण झाले.. कदाचित असेही घडले असेल की आदल्या दिवशीचा अधिकारी भ्रष्ट असेल अन आजचा अधिकारी भ्रष्ट नसेल, त्यामुळे आपलेही काम नियमात राहून झाले.. कुठेही आपल्याला चुकीचे काही करावे लागले नाही… असा विचार कधी करुन बघतो का आपण?? कधीतरी येतो असा विचार पण जेव्हा दुसरा कुणीतरी त्या आदल्या दिवशीचा अनुभव येऊन आपल्याला सांगतो तेव्हा.. त्यावेळी जाणवते की बरे झाले काल आपण घरी आलो ते… तोवर आपली चीडचीडच चालु असते… आपण आदल्या दिवशी काम नाही झाले ह्याच गोष्टीला शिव्या देत राहतो..

जेव्हा आपण दुसर्‍यावर रागावतो तेव्हा आपण असा विचार करतो का की त्याचीही काही बाजु असेल, तोही कुठल्यातरी काळजीत असेल, त्याचेही काहीतरी बिनसले असेल?? नाही आपण आपला सगळा राग बाहेर येईपर्यंत अशा विचारात कधीच जात नाही… पण राग येतोय हे लक्षात येताक्षणीच जर ही गोष्ट ध्यानात घेतली की समोरच्याचीही तेवढीच तातडीची अडचण असेल, तोही कसल्यातरी विवंचनेत असेल तर मग आलेला राग कुठल्या कुठे निघून जाईल… पण राग आल्यावर त्या रागाने आपली सूत्रं त्याच्या ताब्यात घेतली की मग नंतरच्या सारवासारवीला तितकासा अर्थ उरत नाही.. प्रत्येक क्षणी जेव्हा मनात समोरच्याचा विचार स्वतःच्याही आधी येतो तेव्हा राग जास्त त्रास नाही देत.. उलट आपली समजून घेण्याची भूमिका वाढत जाते… मग रागाची तीव्रता कमी होत जाते, अन राग उफाळून येण्याचे प्रसंगही कमी होतात.. ह्यानंतर अक्रोध अवस्था नुसतीच शब्दात समजत नाही तर अनुभवताही येते….

त्यागः – भौतिक सुखांचा त्याग करुन संन्यास घेणे म्हणजे त्याग अशी काहीशी अर्धवट कल्पना आपल्या मनाची झालेली असते.. त्याग नक्की कसला करायचा? ह्यासाठी आपल्यात चांगले काय आहे अन वाईट काय आहे हे समजून घेतले पाहिजे… वाईटाचा त्याग सर्वात आधी करावा.. अतिरिक्त वासनांचा त्याग करावा.. इंद्रियाच्या अवास्तव कामनांचा त्याग करावा… मग त्यानंतर चांगल्या कर्मातील अहंकाराचा, कर्तेपणाचा त्याग करावा.. ह्यामुळे फलाचाही त्याग आपोआप होतो.. अन सगळ्यात शेवटी देहबुद्धीचा त्याग करावा… अन देहबुद्धीचा त्याग हा फक्त समर्पण भावनेतूनच होऊ शकतो.. कर्म, भक्ती अन ज्ञान तीनही मार्ग देहबुद्धीचा त्याग करायलाच लावतात.. हा त्याग विशेष महत्वाचा, कारण ह्या त्यागानंतर द्वैत काही उरतच नाही…. निव्वळ आत्मबुद्धी राहते.. देहबुद्धीचा त्याग म्हणजे, जी सगळी कर्मे अन बंधने आहेत ती ह्या देहाला आहेत ही जाणीव घेणे अन त्या बंधनापासून अलिप्त होत जाणे… कमळाच्या पानवरील थेंबासारखे…

शांतिः – आयुष्यातला असा एखादा प्रसंग समोर आणा ज्यात पूर्ण हतबल झालो आहोत.. कुठलाच पर्याय समोर दिसत नाहीये.. काहीच उत्तर सापडत नाहीये.. मदतीला कुणीच जवळ नाहीये… अन विचार करुन करुन डोके पार भांडावून गेलेय… तहानभूक पुरती विसरुन गेलोय.. अन अशी स्थिती काही दिवस टिकून आहे… अशावेळी अचानक एखादी व्यक्ती तिथे येते, काहीतरी उपाय सुचवते, अन तो लागूही होतो.. बघता बघता त्या समस्येतून आपण कधी बाहेर आलो आपल्यालाही कळत नाही… दिवसरात्र चिंतेने हैराण असतो आपण अन ज्यादिवशी ती हतबलता संपते, उत्तर सापडते त्यादिवशी किती निश्चिंत होतो.. किती वेगळेच समाधान मिळते… ती मनाची शांतता न दाखवता येत, ना शब्दात सांगता येत… फक्त अनुभवत राहाविशी वाटते… आपली ही स्थिती तेव्हा येते जेव्हा आपण संकटातून बाहेर असतो.. पण जर एखाद्या व्यक्तीला आलेली प्रत्येक परिस्थिती सारखीच वाटत असेल तर ही शांति अंतःकरणात कायम राहते… दुःख अन सुख हेच जेव्हा समान वाटू लागते तेव्हा ते देणारे प्रसंगही सारखेच वाटून जातात… अन असे कितीही प्रसंग आले तरी तारणारा ‘तो’ आहे ही जाणीव अंतःकरणात भरुन राहिली असेल तर मन सैरभैर होतच नाही… कुठल्याही संतांचे चरित्र पहा.. हीच शांति आढळेल….

अपैशुनम् – कुणाचीही निंदा न करणे.. किती कठीण गोष्ट सांगितली आहे ना.. आपल्या रोजच्या बोलण्यात सुद्धा आपण कुणाची तरी निंदा करत असतोच.. विशेषतः जी व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही तिचे दोष तर सगळ्यात आधी शोधत असतो… अन बाहेर कुठे बोलून नाही दाखवली तरी मनातल्या मनात त्या व्यक्तीची निंदा कितीतरी वेळा केलेली असते… काय मिळते निंदेने?? माहित नाही… कुणाकडेच ह्याचे उत्तर नाही.. अन तरीही असली निरुद्देशीय गोष्ट आपण दिवसातून दहावेळा तरी करत असतो.. आपल्यापैकी कुणीच असे नाही की ज्याने कधी दुसयाला शिव्या दिल्या नसतील.. कुणाला नावे ठेवली नसतील… पण हे करुन काय साध्या झालेय ह्याचे उत्तर मात्र आपल्यापाशी नाही, कारण अस प्रश्न कधी स्वतःला विचारलाच नाही आजपर्यंत…. हरकत नाही.. आता विचारून बघा, काय उत्तर येतेय?? वेळेचा दुरुपयोग ह्याशिवाय हातात काही लागत नाही.. आपल्या आयुष्यातल्या शिव्या देण्यालायक माणसासाठी आपण आपल्या चांगल्या वेळेचा केलेला दुरुपयोग… त्याचे काय वाईट झाले आपल्या शिव्या खाऊन?? काहीच नाही… ना त्याचा वेळ वाया गेला ना त्याच्या वागण्यात काही फरक पडला.. मग असे असतानाही आपण का कुणाची निंदा करत बसतो?? सवय, हेच एकमेव उत्तर आहे ना… मग ही सवय बदलता येईल का? एखाद्या माणसाची निंदा करण्यापूर्वी, त्याला शिव्या देण्यापूर्वी त्याने केलेली एखादी जरि चांगली गोष्ट आठवली तर आपल्या तोंडातून वाईट शब्द तर नाहीच निघणार पण मनात पण त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार नाही येणार… कधीतरी हे पण करुन बघायला काय हरकत आहे ना…

दया – अकारण रागवायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही हे जर बदल स्वभावात होत गेले तर मग दया सहज उत्पन्न होते.. ती निर्माण करावी लागत नाही… जेव्हा स्वतःपेक्षा दुसयाचा विचार आधी केला जातो तेव्हा दयाभाव आपोआप जाणवतो… माणुसकी हा शब्द अन त्यातला भाव फक्त माणसांनाच लाभला अहे.. मग जन्मतः मिळालेला हा दयाभाव कमी कमी का होत जातो?? वयाबरोबर वाढत का नाही?? आपण एवढा आत्मकेंद्रित विचार का करतो नेहमी?? एखाद्यातरी प्रसंगात आपल्या मनात आधी समोरच्याबद्दल दयाभाव उत्पन्न झाला तर तो माणूस म्हणून जगतानाचा खरा क्षण.. समोरचा रागावून शिव्या जरी देत असेल तरी त्याला आधी शांत करुन खरी परिस्थिती समजून घेतली तर समोर असलेली एक व्यक्ती बदलु शकते.. कदाचित तिच्या अडचणीतून तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला निवडले गेले असावे, अन त्यासाठी केवळ तिचा राग आपल्यासमोर निघत असावा हा असा विचार करुन पाहिला तर मग मनात दया निश्चितच येते..

अलोलुप्तम् – इंद्रियांना विषयांचा उपभोग घेऊ देताना त्यात आसक्ती न बाळगणे… हे कसे शक्य आहे?? इंद्रियांना विषयात जाऊ पण द्यायचे अन आसक्ती पण नाही ठेवायची?? खुप विचित्र अन अवघड आहे हे… असेच वाटते ना वाचताना… एक उदाहरण पाहुया, काही लोक सकाळी एक फेरफटका मारायला जातात.. त्यापैकी एकजण एक कुत्रा घेऊन त्याला फिरवायला नेत असते… त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतोच अन त्याचा एक भाग त्या कुत्र्याच्या मालकाच्या हातात असतो… अशावेळी त्या कुत्र्याला एखादे हाड किंवा त्याच्या आवडीचा तत्सम पदार्थ दिसला तर ते एवढे प्रयत्न करते तो पदार्थ मिळवायचा की प्रसंगी मलकाला पण स्वतःच्या वेगाने पळवते… अन रस्त्यात कितीही घाणीत असलेला तो पदार्थ मिळवते… वास्तविक पट्टा असूनही अन तो पट्टा मालकाच्या हाती असूनही ते कुत्रं मालकाला स्वतःच्या वेगाने पळवते… आपल्या इंद्रियांचे पण त्या कुत्र्यासारखंच वागणे असते.. दिसले हाड की पळाले त्यामागे, दिसले आवडते विषय की धावले तिथे… अन अशावेळी आपण विसरतो की ह्या इंद्रियांना पण एक पट्टा आहेच अन त्याचा एक भाग आपल्याच हातात आहे.. अन तो पट्टा म्हणजेच सारासार विवेक… त्या कुत्र्यामागे आपण पळण्याऐवजी त्या कुत्र्याचा पट्टा घट्ट धरुन त्याला घरी आणून योग्य ते खायला घालणे अधिक योग्य.. तसेच त्या इंद्रियांना पळण्यापासून परावृत्त करुन त्यांच्यासाठी जे योग्य असेल ते करायला लावणे जास्त चांगले ना…
आता पुढचा भाग येतो तो म्हणजे, इंद्रिय आपले कसे ऐकणार?? ती चंचल असतात.. त्यावर नियंत्रण कसे ठेवणार?? खरे सांगायचे तर हे असले प्रश्न म्हणजे स्वतःची सोय बघणे आहे.. आपल्याला काही करायचेच नसते तेव्हा हे असले निरर्थक प्रश्न पडतात.. अन तेही प्रयत्न न करता पडलेले… घरी एखादे लाहन मूल ऐकत नसेल, हट्ट करत असेल, जेवत नसेल तर काय करतो आपण?? आधी प्रेमाने समजावतो, तरी नाही ऐकले तर सरळ २ धपाटे घालतो अन जेवायला बसवतो, अगदी त्याची नावडती भाजी असली तरी.. अन ती खाताना त्याच्या डोळ्यांना लागलेल्या धारांकडेही आपण दुर्लक्ष करतो.. कारण त्या मुलासाठी काय चांगले ते आपल्याला माहीत असते.. जर त्या लहान मुलाला पण दटावून आपण जेवायला लावतो, प्रसंगी २ धपाटे पण घालतो मग आपल्या इंद्रियांचे, मनाचे एवढे फाजील लाड का पुरवतो???? ज्याचे त्याने उत्तर शोधावे….

मार्दवम् – जिथे नम्रता असते तिथे मृदूता / मार्दव असतेच.. पण हल्ली नम्रता म्हणजे शब्दकोशात शिल्लक असलेला शब्द असे वाटावे एवढी दुर्मिळ होत चालली आहे… वृथा अभिमान, कर्तेपणा गळून पडतच नाही ना… प्रत्येक गोष्टीत कर्तृत्वाचे झेंडे असतातच आपल्या हातात.. मग ते हात दुसयासमोर नम्र होणार कसे?? कधीतरी भूतकाळातले ते झेंडे खाली ठेवून, विसरून जगून पहावे, मग ती मृदुता जाणवते… प्रत्येकातच असते.. पण आत दडवून टाकलेली.. काहींनी उद्धटपणाच्या आवरणात, तर काहींनी अभिमानाच्या कवचात दडवलेली असते…

र्‍हीः – खरा अर्थ अहे लाज / लज्जा.. पण लाज कसली वाटते?? आपल्याला कसली वाटते?? देवासमोर हात जोडायची, आई वडिलांना मान द्यायची, गुरुजनांचा आदर करायची??? की अजून कसली?? काहींना स्टेटस जपत जगताना काही वेगळे मोकळे वागवे लागले की लाज वाटते.. मी एवढ्या मोठ्या पदाला आहे, एवढी लोकं मला ओळखतात मग मी इतर लोकांसारखे वागलो तर मला ओळखणारे काय म्हणतील ह्यामुळे लाज वाटते.. आपण जेवढे मुखवट्यामागे लपून वावरु तेवढी लाज वाटण्याची आपली कारणे पण भिन्न असणार.. अन सगळे मुखवटे पूर्ण भिरकावून देऊन जसे आहोत तसे जगु शकु तेव्हा एकाच गोष्टीची लाज वाटेल ती म्हणजे अधर्माचरण, अनिती… न्यायाला सोडून काहीही वागलो तर लाज वाटेल… बाकी कसलीच नाही…

अचापलम् – व्यर्थ, निरर्थ चंचलता.. निष्कारण काहीतरी उद्योग करत वेळ वाया घालवत राहणे, म्हणजे चापलम्.. अन त्याविरुद्ध मनाची स्थिर स्थिती म्हणजे अचापलम्… मिळालेय किती असे आयुष्य? जास्तीत जास्त १०० वर्षे.. त्यात पण सुरुवातीची अन शेवटची काही वर्षे आपल्या हातात नसतात.. मग जे काही मधले उरले सुरले मिळतेय ते वाया का घालवा?? एखादी आवडती वस्तु फेकून द्यायचे पण किती जीवावर येते आपल्या.. अन आयुष्यातला अनमोल वेळ कितीतरी गोष्टीत वाया घालवत असतो आपण… जसे आवडती वस्तु जपून जपून वापरतो तसे आयुष्य सत्कारणी लावून जगायला काय हरकत आहे… अन वेळ घालवण्याएवढा असेलच आपल्याकडे तर तो दुसयाच्या हितासाठी का घालवू नये?? त्यात समाधान तरी नक्की मिळेल.. सुख अन समाधान ह्यातला नेमका अर्थ अन फरक आपण ओळखु लागलो तरी जगणे सर्थकी लागु शकते… आपल्याला ज्यात सुख वाटतेय त्यात समाधानही मिळतेय का ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याला मिळत असेल त्याच्यात अचापलम् नेहमी असते….

(अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ १६-२ ॥

अर्थ – काया-वाचा-मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे.)

ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु |

 
2 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 2, 2009 in भगवद्गीता

 

टॅग्स:

2 responses to “दैवी संपत्ती २ (अर्जुन विषाद ७)

  1. nileshsakpal

    सप्टेंबर 2, 2009 at 16:35

    मेधा, तुझ्या लिखानातील प्रवाहीपणा वादातीत आहे.. त्यातील साध्या सोप्या भाषेतील श्लोकाचा अर्थ अन तेवढीच समर्पक गुंफलेल्या उदहरणांची घातलेली सांगड वाचनास प्रवृत्त करते! आणखी असेच लिखान उत्तरोत्तर येत राहावे..

     
  2. Baba

    सप्टेंबर 9, 2009 at 05:43

    It will take time to read this article. But I scanned it. I think your deep thinking is getting reflected in every word. All these qualities are well explained in Adhyay 13. And surprisingly all these qualities, if one has to see in a single person other than Shrokrishna is Shri Dnyaneshwar Mauli. He has defined every quality in a different angle. e.g Dayaa, Ahimsaa etc These meanings are not traditinally used meanings. We are proud of you for such innovative thinking. I suggest politely to increase the thoughtlessness, A-man Avastha. You may get some different treasure. You may experience SwantSukh.
    Baba

     

यावर आपले मत नोंदवा